आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - पावसासाठी चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुवारच्या पावसाने दिलासा मिळाला. १३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी झाली असून त्यामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीनच्या एकूण क्षेत्राच्या १०० टक्के पेरणी झालेली आहे. गेल्या २० दिवसांपासून पाऊस नव्हता तसेच ऊन चांगलेच तापत असल्याने जमिनीला भेगा पडत होत्या. यामुळे हाती येणाऱ्या पिकांची नासाडी होण्याची शक्यता बळावली होती. गुरुवारी झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी दिल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दिवसभर पावसाची रिपरिप : शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. दुपारी थोडावेळ घेतलेल्या विश्रांतीनंतर सायंकाळी साडेचार वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. पाच,साडेपाच वाजताच्या सुमारास चांगला पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. ढगांचा गडगडाट, विजाही चमकत होत्या. गुरुवारच्या पावसाने शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा जागवला आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी होते. नदी, नालेही भरून वाहिले.
गेल्या पंधरा-वीस दिवसात पावसाने दडी मारल्याने पिकांना पावसाची नितांत आवश्यकता होती. हा पाऊस आणखी लांबला असता तर नुकसान खूप जास्त राहिले असते. परंतु बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या चांगल्या पावसामुळे पिके वाचण्याची शक्यता वाढली आहे.
२० ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
सध्या अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी पहाटेपासून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. १६ ते २० ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात वीज पडणे, अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने नदी, नाल्या काठी वरील गावांना तसेच शहरी भागात पुराचा प्रभाव असलेल्या वस्तींना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नदी, नाले, तलाव,बंधाऱ्यात पोहण्याचे धाडस नागरिकांनी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१६ ऑगस्टला झालेला पाऊस
जिल्ह्यामध्ये अकोला ८.८ मिमी, बार्शीटाकळी १६.६ मिमी., अकोट ३.२ मिमी., तेल्हारा २.५ मिमी., बाळापूर १५.१ मिमी., पातूर १३.६ मिमी., मूर्तिजापूर ८.७ मिमी.. या पावसाळ्यामध्ये अकोट आणि तेल्हारा तालुक्यावर पावसाची अवकृपा दिसत आहे. त्या भागाला अद्याप चांगल्या पावसाची गरज आहे.
२० ते ३० टक्के नुकसान आधीच
सोयाबीनला तसेच कापसाला पात्या येण्याचा काळ असताना पावसाची नितांत आवश्यकता होती. अगदी त्यावेळी पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळणार आहे. परंतु पावसाअभावी २० ते ३० टक्के पिके हातची गेली आहेत. यापुढे होणारा पाऊस रब्बीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
- डॉ. एस. एम. खाकरे, कृषी विद्यावेत्ता डॉ. पंदेकृवि.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.