आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा ठिय्या; अंबड रोड रात्री एक वाजेपर्यंत बंद, औरंगाबाद मार्गावरही दीड तास खोळंबली वाहतूक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आहे साडेचारशे वर्षांपूर्वी निर्मित जालना येथील मोती तलाव. अरबी समुद्रातील महा वादळामुळे या तलावावर ढगांचे आच्छादन पसरले आहे. हे ढग जणू आग आणि धुराच्या लोटांसारखे भासत आहेत. छाया : ज्ञानेश्वर गिराम - Divya Marathi
हा आहे साडेचारशे वर्षांपूर्वी निर्मित जालना येथील मोती तलाव. अरबी समुद्रातील महा वादळामुळे या तलावावर ढगांचे आच्छादन पसरले आहे. हे ढग जणू आग आणि धुराच्या लोटांसारखे भासत आहेत. छाया : ज्ञानेश्वर गिराम

जालना - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांबरोबरच मालमत्तांचेही अतोनात नुकसान होत आहे. दरम्यान, रविवारी रात्री पावसाने ठिय्या दिल्याने अंबड रोडवरील पूल वाहून गेला. या मुळे रात्री १ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी तर औरंगाबाद महामार्गावरील टोल नाक्याजवळील तलावातूनही पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री १२ वाजेच्या सुमारास एका बाजूची वाहतूक सुरळीत झाली. शहरातील विविध भागांमध्ये घरातही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.  जालना शहरात सायंकाळी ६ वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत होती. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठेत पाणी साचले होते. या पाण्यामुळे बाजारातही चांगलीच गोंधळ झाला होता. दरम्यान, कन्हैयानगर भागातील गायत्रीनगर परिसरातील काही घरांमध्ये पाणी घुसले होते. 

कदीम ठाण्याचे एका बाजूचे छत कोसळले 
तसेच कदीम ठाण्याचे एका बाजूचे छतही कोसळले. सुदैवाने काही दुर्घटना झाली नाही. उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे बंधारा ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.  अंबड रोडवरील पुलाचे काम सुरू असून, हा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. पावसाचे पाणी परिसरातील माऊली नगरसह विविध भागातील घरांमध्ये शिरले होते. बाजारपेठेतही पाणी घुसल्यामुळे खरेदी करणाऱ्यांसह व्यापाऱ्यांना अनेक अडचणी आल्या. 

चोवीस तासांत ४.५८ मिमी पावसाची नोंद
जालना जिल्ह्यामध्ये ४ नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या मागील चोवीस तासांमध्ये सरासरी ४.५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  सरकारने त्वरित मदत करण्याची मागणी केली. 

जिल्ह्यातील आकडेवारी 
जालना १२.७५ (६५५.४०), बदनापूर २०.२० (८२८.८०), भोकरदन २.२५ (११०८.३७),  जाफराबाद १.४० (८०३.६०), परतूर निरंक (७८१.४५), मंठा निरंक (६३५.२५), अंबड निरंक (९४७.४४), घनसावंगी निरंक (७३७.७५) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मि.मी. एवढी असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८१२.२६ मिमी एवढा पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...