आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
गेल्या दीड महिन्यापासून पावसामुळ दडी मारली होती. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे साडे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ देखील खुंटली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाची अपेक्षा होती. आॅगस्ट महिन्यातील पंधरा दिवस कोरडे गेल्याने खरिपाचा हंगामच धोक्यात आला होता. मात्र, गुरुवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत,जामखेड या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. नगर शहर व परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे ग्रामीण भागात नद्या, आेढ्यांना पाणी आले आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा झालेला पाऊस कमी आहे. गेल्या वर्षी या कालावधीत जिल्ह्यात ५७ टक्के पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाच्या ५ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचे उद्दिष्ट होते. पावसाअभावी मात्र हे उद्दिष्ट साध्य होते की नाही, अशी शंका होती. मात्र, या पावसाने दिलासा दिला.
राहुरीत दीड तास जोरदार पाऊस
प्रदीर्घ विश्रांती नंतर गुरूवारी राहुरीत आगमन झालेल्या आश्लेषा नक्षत्राच्या धुवांधार पावसाने राहुरीच्या आठवडे बाजाराला धो-धो धुतले. बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली. या पावसाचा जोर मोठा असल्याने नगर मनमाड राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. राहुरीत गुरूवारच्या आठवडे बाजाराला प्रारंभ होताच पावसाला सुरुवात झाली. हा धुव्वाधार पाऊस दीड तास सुरू राहिल्याने बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले.दुपारनंतर पावसाच्या सरी मंदावल्या पावसाचे साचणारे पाणी वाहुन जाण्याची पुर्व व्यवस्था राहुरी नगर परिषद प्रशासनाकडुन झालेली नसल्याने साचलेल्या पाण्याच्या प्रवाहात काही शेतक-यांचा भाजीपाला वाहुन गेला. शनी मंदिराच्या नव्याने जिर्णोधार होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्तंभ परिसरात साचलेल्या पाण्यामुळे या भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. साचलेल्या पाण्याच्या भितीने भागिरथी तनपुरे कन्या शाळेच्या मुलींना शाळा सुटल्यानंतर बाजार पेठेतुन मार्ग काढणे मुश्किल झाले होते.
पिकांना जीवनदान
श्रीरामपूर- अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारी शहरासह तालुक्यात सर्वदूर श्रावण सरी बसरल्या. सकाळपासून सुरू असलेला संंततधार पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दिवसभर पावसाने उघडीप घेतली नाही. त्यामुळे रस्त्यासह सखल भागात पाणी साचले होते या पावसाने खरिप पिकांना जीवदान मिळाले आहे. जून व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर शेतकर्यांनी सोयाबीन, कपाशी, तुर, उस तसेच इतर खरिप पिकांची लागवड केली. परंतू त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके धक्यात आली होती. उत्तर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणातून गेल्या आठवड्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. परंतू तालुक्याच्या पुर्व भाग वगळता आवर्तनाचे पाणी शेतकर्यांपर्यंत पोचले नव्हते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आज दिवसभर सुरू असलेल्या सुमारे एक इंच पावसाने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. किमान खरिप पिके वाचली तरी काही पैसे पदरी पडतील या आशेने शेतकरी आनंदून गेले.
संगमनेरात संततधार
संगमनेर - गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजाला गुरुवारी पाऊसाने दिलासा दिला. तासभराच्या मुसळधार पावसानंतर दिवसभर संततधार सुरुच होती. तालुक्याच्या अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने पिवळट झालेल्या आणि दुबार पेरणीचे संकट आेढावलेल्या शेतशिवाराला हिरवा शालू परिधान करण्यास या पावसाची मदत मिळेल.
पावसाळा सरत असतांना सुरुवातीला हजेरी लावणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसला होता. शेतकऱ्यांनी केलेल्या खरिपाच्या पेरण्या वाया जाण्याच्या स्थितीत होत्या. पाऊस जर झाला नाही तर मात्र शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आेढावणार असल्याचे स्पष्ट होते. शेतातील पिके पाऊसाअभावी जळु लागल्याने शेतकऱ्यांनी पिकाच्या आशा सोडून दिल्या होत्या. मात्र गुरुवारच्या पाऊसाने पठार भाग, आश्वी, धांदरफळ, तळेगाव पट्ट्यातील या पिकांना काही प्रमाणात संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. शहरातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभरापेक्षा अधिक वेळ मुसळधार बरसणाऱ्या पाऊसाने रस्ते िचखलमय करुन टाकले. . दुपारी जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे नागरिक आणि शाळकरी मुलांना पावसाचा सामना करावा लागला. भंडारदरा, निळवंडे धरणातील पाण्यासाठ्यात मोठी वाढ झाली मात्र लाभक्षेत्रातील पिकांना पावसाची प्रतीक्षा होती, ती गुरुवारी आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दुर झाली.
कर्जतला पावसाची हजेरी
कर्जत- कर्जत तालुक्यात मागील दिड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. बुधवारी सायंकाळपासून वरुणराजाने हजेरी लावत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. गुरुवारी दिवसभर कर्जत शहर आणि तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या.
जनजीवन विस्कळीत
मिरजगाव - मिरजगाव परिसरात गुरुवार दि. १६ रोजी सकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली त्यांनंतर दुपारी तीन नंतर मात्र चांगलाच जोर धरला. या पावसामुळे मिरजगाव परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाची दिवसभर संततधार सुरु होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे परिसरातील खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आजच्या पावसाने मिरजगावमधील जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले. तर जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. त्यातच दुपारी पावसाने जोर धरल्याने शाळकरी मुलांचे चांगलेच हाल झाले.
दिवसभर रिमझिम
जामखेड- जामखेड शहरासह तालुक्यात गुरूवारी दिवसभर रिमझिम स्वरूपात पाऊस झाला. पावसाअभावी तालुक्यातील खरीप हंगाम पुर्ण वाया गेल्यानंतर खरीपाची जी थोडी पिके तग धरून होती. त्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शेतक-यांना रब्बी पिकाची आशा लागली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.