आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाच्या बेपर्वाईचे बळी : तलाठ्याच्या इशाऱ्यानंतर तासाभरात फुटले तिवरे धरण, 13 ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - चिपळूण परिसरात झालेल्या जाेरदार पावसामुळे तिवरे धरण मंगळवारी काठाेकाठ भरले. तलाठ्याकडून परिसरातील गावात सतर्कतेचा इशारा रात्री ८.३० च्या सुमारास देण्यात आला. मात्र, ही सूचना सर्वांपर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच म्हणजे रात्री ९.३० च्या सुमारास धरणाचा बंधारा फुटून परिसरातील सात गावांमध्ये पाणी शिरले. यात १२ घरे वाहून गेल्याने त्यांचे संसार उद‌्ध्वस्त झाले, तर २४ माणसे वाहून गेली. यापैकी १३ जणांचे मृतदेह बुधवारी सायंकाळपर्यंत हाती लागले, तर उर्वरित ११ जणांचा शाेध सुरू हाेता. 


या धरणाला दोन वर्षांपूर्वीच गळती लागली होती. २०१८ मध्ये या गळतीत आणखीच वाढ झाली होती. परिणामी धरणाच्या मुख्य गेटजवळ भगदाड पडले होते. त्याच्या दुरुस्तीचीही मागणी लोकांनी केली होती. स्थानिक खासदार विनायक राऊत यांनीही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत संबंधित विभागाला धरणाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले हाेते, मात्र हे काम पुढे सरकले नव्हते. यामुळे पावसामुळे धरण फुटून निष्पापांना जीव गमावावा लागला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांतून प्रशासनाविराेधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


असे आहे तिवरे धरण
हे धरण चिपळूणपासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणाची लांबी ३०८ मीटर असून उंची २८ मीटर आहे. धरणाची साठवण क्षमता २.४५२ दलघफू किंवा ०.०८ टीएमसी आहे. २०१२ मध्ये धरणाचे बांधकाम पूर्णत्वास गेले होते. २००४ मध्ये धरणातील गाळ उपसण्यात आला होता. प्रशासनाने २ जुलैला दिलेल्या अहवालानुसार हे धरण २७.५९ टक्के भरले होते. या धरणातील पाणी पुढे जाऊन वाशिष्टी नदीला जाऊन मिळते.


अधिकारी म्हणतात, मे महिन्यातच दुरुस्ती केली हाेती
धरणाचा काही भाग खचल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी मिळाल्या होत्या. यामुळे पावसाळ्याआधीच त्याचे काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. १९ आणि २० मे रोजी स्थानिक नागरिकांसमोरच प्रशासनाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते, असा दावा जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी केला आहे.


वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, एसआयटी करणार चौकशी : मंत्री महाजन
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली. उच्चस्तरीय समिती नेमून या घटनेची चौकशी करू. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. 
- आपत्तीग्रस्तांना चार महिन्यांत पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा करतानाच या  घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमणार असल्याचेही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले.


कसे फुटले धरण
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्णपणे भरून वाहत होते.
पाण्याचा प्रवाह धरणाच्या भिंतींना धडका देत होता. यामुळे धरणाच्या भिंतीस तडा गेला. 


रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास भिंत ढासळून धरण फुटले. यामुळे त्यातील भराव १२५ ते १५० मीटरपर्यंत वाहून गेला.

बातम्या आणखी आहेत...