आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- शुक्रवारी झालेल्या श्रावणातील पहिल्याच पावसाने एका दिवसात पावसाच्या सरासरीचा आकडा दुपटीवर पोहोचला. या पावसामुळे ४४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे शेतकरी तर सुखावलाच शिवाय उद्योग, व्यवसाय, पर्यटन क्षेत्र व बाजारपेठेवरील दुुष्काळाच्या सावटाचे रूपांतरही उत्साहाच्या वातावरणात झाले.
जून व जुलै या हमखास पावसाच्या दोन महिन्यांत पावसाने सर्वाधिक खंड दिला. त्यामुळे ३४४ गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कोरडवाहू क्षेत्रातील मका, सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके जळायला लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले होते. मात्र, शुक्रवारी मराठवाड्यातील १८९ मंडळांत ६५ ते १३० मिमीपेक्षा जास्त म्हणजे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जळू लागलेल्या खरीप पिकांना संजीवनी मिळाली. मराठवाड्यात ४९ लाख १० हजार ९१४ हेक्टरपैकी ४४ लाख ५४ हजार ७०४ हेक्टरवर प्रत्यक्षात खरीप पेरणी झाली आहे. परिणामी कृषी बाजारात शुकशुकाटाऐवजी आता खते, कीटकनाशके खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.
नुकसानीचे पंचनामे करा
अडीच महिन्यांतील खंड, काही तासांत पडलेला पाऊस याच्या नोंदी महसूल व कृषी विभागाने घेतल्या आहेत. हवमानातील बदल, पर्जन्यमानाचा अभाव, ढगाळ वातावरण, कीड व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे खरीप पिकांबरोबरच फळबाग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरडवाहू पिके होरपळून निघाली आहेत. पावसाने कितपत सुधारणा होईल व उत्पादन किती हातात येईल याचा भरवसा नाही. नुकसान अटळ आहे. याचे तातडीने पंचनामे करून नोंद घेतली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.