औरंगाबाद / मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची धुवाधार बॅटिंग; शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या

बीड जिल्ह्यातील डोंगरगण गावात भिंत कोसळून चार जण जखमी

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 25,2019 10:18:00 AM IST

औरंगाबाद - मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत साेमवारी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तर पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावून हॅट््ट्रिक साधली. दरम्यान, आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे सोमवारी पहाटे भिंत कोसळून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले, तर केज नगर पंचायतीच्या कचरा डेपोची संरक्षण भिंतही सोमवारी पहाटे पावसात कोसळली आहे.


सोमवारी पहाटे बीड जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. ११ पैकी परळी वगळता दहा तालुक्यांत पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १६.९ मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६.८९ टक्के एवढा पाऊस झाला आहे . केज तालुक्यातील तीन महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली असून याच तालुक्यातील केज- कळंब मार्गावरील पर्यायी पूलही वाहून गेला. आष्टी तालुक्यातील कडा परिसरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. डोंगरगण येथे घराची विटांची भिंत घरातील सदस्यांच्या अंगावरच ढासळली. यात हरिभाऊ यमाजी साबळे (७०), आदित्य बाबासाहेब साबळे (१२) जयश्री बाबासाहेब साबळे (१५) आणि सविता बाबासाहेब साबळे (३८) असे चाैघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर केज येथील नगरपंचायतीने बीड रस्त्यावर केलेल्या कचरा डेपोची संरक्षण भिंत सोमवारी पहाटे पावसात कोसळली आहे.

लातूर : जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या सरी
लातूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी पहाटे आणि दिवसभरात मध्यम स्वरूपात पाऊस झाला. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही भागात अत्यल्प पाऊस पडला. उदगीर शहरातील कृष्ण नगर परिसरातील येनकी - मानकी रोडवरील शंकर भगवान वाघमारे यांचे पत्र्याच्या घराचे मोठे नुकसान झाले. रात्री दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस चालू झाल्याने धोंडू तात्या आश्रम शाळेची कंपाऊंडची भिंत शंकर वाघमारे यांच्या घरावर कोसळली. ज्यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वाधिक पाऊस हा शिरूर अनंतपाळ ४१ मिमी आणि निलंगा तालुक्यात २४ मिमी इतकी नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण १४ मिमी पाऊस झाला. दरम्यान सोमवारी सकाळी आणि दुपारच्या सुमारासही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

नांदेड : ११.६३ मिमी पाऊस
नांदेड जिल्ह्यात धर्माबाद वगळता उर्वरित १५ तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोमवारीही जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिले. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११.६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक ३८ मि.मी. पाऊस नांदेड येथे झाला. रविवारी रात्री उशिरा पावसाला प्रारंभ झाला. मध्यरात्रीपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले हाेते. सोमवारी नरसी, नायगाव येथेही पावसाने हजेरी लावली. भोकर, उमरी या तालुक्यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. भोकर येथे ३६ मिमी तर उमरी येथे २८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तथापि या तालुक्यांच्या सीमेवरील धर्माबाद येथे मात्र वरुण राजाने पाठ फिरवली.


हिंगाेली : पेरण्या सुरू होणार
जिल्ह्यात या वर्षीच्या मान्सून हंगामात प्रथमच सर्वदूर चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून या पावसामुळे काही भागांमध्ये शेतकरी पेरण्या करू शकणार आहेत. साेमवारी सकाळपासूनच मान्सूनच्या पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यात पाऊस झाला होता. परंतु हा पाऊस काही भागातच पडला होता. आज मात्र जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे तापमान कमाल २९ अंशावर पोहोचले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात पेरण्या होण्याची शक्यता बळावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


उस्मानाबाद : सलग तिसऱ्या दिवशीही लावली हजेरी
जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी सुरू झालेला पाऊस सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही बरसला. उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, पळपस परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. कळंब तालुक्यातील गावांमध्ये रविवारी रात्री जोरदार पावसाने मांजरा नदीला पाणी आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४० मंडळांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला. तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी तेर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

परभणीत पावसाची जाेरदार बॅटिंग
शनिवारनंतर दोन दिवसांची उघडीप दिल्यानंतर परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यांत सोमवारी (दि.२४) पहाटे पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र सायंकाळी पाऊस थांबला. सकाळी आठ वाजेपर्यंत ६.३३ मि.मी.ची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात २१ मिमी इतका नोंदला गेला. सोमवारी पहाटे अर्धाअधिक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यात सेलूत २१, मानवतमध्ये १६, पाथरी ९.३३, पूर्णा ५.६० तर परभणीत केवळ पाच मिमी पावसाची नोंद झाली. पालम, गंगाखेड, सोनपेठ व जिंतूर तालुक्यात पावसाने नाममात्र ही हजेरी लावली नाही. सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा रिमझिम स्वरूपात पाऊस सुरू झाला.

X
COMMENT