Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | rainfall in nagar district

नगरवर जलाभिषेक; श्रावणात शहरासह जिल्ह्यात रंगली मैफल झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची

प्रतिनिधी | Update - Aug 22, 2018, 12:16 PM IST

मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या जलधारांनी नगरचं रूपच बदलून टाकलं आहे. 'झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची...'

 • rainfall in nagar district

  नगर- मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या जलधारांनी नगरचं रूपच बदलून टाकलं आहे. 'झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची...' अशी गाणी ओठांवर खेळवणाऱ्या श्रावणसरींनी शहरवासीयांबरोबर शेतकऱ्यांनाही सुखावले आहे. अधूनमधून होणारे सूर्यदर्शन, आकाशात उमटणारी इंद्रधनुष्याची कमान, वातावरणातील आल्हाददायक गारवा, सगळीकडे पसरलेली हिरवळ असा सुरेख आणि सुरेल माहोल सध्या नगरकर अनुभवत आहेत.


  पंचमीचे घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस येत नाही आणि आला की भरभरून दान देतो, अशी जामखेड परिसरातील शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. यंदा बरोबर पंचमीला पावसाला सुरूवात झाली. परतीचा मान्सून रब्बी हंगामासाठी पोषक ठरतो, त्याचप्रमाणे तलाव, विहिरी व धरणे भरण्यासाठी या भीजपावसाचाच उपयोग होतो. यंदाही ते खरे ठरले आहे.


  जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सूर्यदर्शनच झाले नाही. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांना पावसाचा फटका बसला. त्यामुळे छत्र्या आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे लागले. जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. तुरळक पावसामुळे खरिपाच्या अवघ्या २५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. जुलैत पावसाची अपेक्षा होती. मात्र, जुलैत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरिपाच्या ५० टक्के देखील पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ऑगस्ट महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्यानंतर १६, १७ ऑगस्टला पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा पाऊस थांबला. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्क्यांच्या पुढे पेरण्या झाल्या असल्या, तरी बहुतेक भागात पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गावर होती. खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. सोमवारपासून (२० ऑगस्ट) पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.


  जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २१ ऑगस्ट अखेरपर्यंत ८८ टक्के पाऊस झाला होता. यंदा २१ अखेरपर्यंत ५८ टक्के पाऊस झाला. अकोले ९६ टक्के, संगमनेर ८६ टक्के, कोपरगाव ६८ टक्के, श्रीरामपूर ८४ टक्के, राहुरी ५३ टक्के, नेवासे ४२ टक्के, राहाता ६० टक्के, नगर ३८ टक्के, शेवगाव ६८ टक्के, पाथर्डी ४९ टक्के, पारनेर ४६ टक्के, कर्जत २५ टक्के, श्रीगोंदे ४२ टक्के व जामखेड ५८ टक्के पाऊस झाली. यंदा कुठल्याही तालुक्यात शंभर नोंद झालेली नाही. गेल्या वर्षी अकोले १०० टक्के, श्रीरामपूर १२४ टक्के, राहुरी १३९ टक्के, नेवासे १९३ टक्के, नगर १२० टक्के, शेवगाव १४० टक्के, पाथर्डी १०८ टक्के असा पाऊस झाला होता. पारनेर ९९ टक्के, श्रीगोंदे ९६ टक्के, जामखेड ८१ टक्के, राहाता ७२ टक्के, कोपरगाव ७० टक्के, संगमनेर ५७ टक्के पाऊस झाला होता. सर्वच छोटे-मोठे बंधारे पाण्याने तुडुंब भरले होते.


  धरणातील साठ्यांत वाढ
  पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नगर शहराला पाणी पुरवठा करणारे मुळा धरण ७० टक्के भरले आहे. भंडारदरा गेल्या आठवड्यात भरले, तर निळवंडे ८७ टक्के व आढळा धरण ४१ टक्के भरले आहे.


  नगर तालुक्यातील पाऊस
  गेल्या २४ तासात नगर तालुक्यातील नालेगाव येथे ९ मिलिमीटर, तर जेऊर १८, रुईछत्तीसी ३, कापूरवाडी ३, केडगाव ६, चास ५, भिंगार ५ , नागापूर ९, वाळकी ३, चिचोंडी पाटील ३१, सावेडी येथे १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.


  २४ तासांत १६ मिमी
  गेल्या २४ तासांत अकोले ५, संगमनेर ८, कोपरगाव १४, श्रीरामपूर १५, राहुरी १४, नेवासे २६, राहाता २७, नगर ९, शेवगाव ४६, पाथर्डी ३८, पारनेर २, कर्जत ५, श्रीगोंदे ६ व जामखेड येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Trending