आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद - शहरासह जिल्ह्यात शनिवारी(दि.३०) पुन्हा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आल्याने उकाडा कमी झाला. वादळाने रस्त्यांवर धुळीची लाट पसरली होती. दरम्यान, तेरसह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस झाला. वादळामुळे शहरातील वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला होता.
शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. मेघगर्जनेसह हलक्या पावसाचे थेंब पडले. त्यामुळे नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली. जोराच्या वादळाने आंब्याचे नुकसान झाले. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, तेर भागात मेघगर्जनेसह सरींची बरसात झाली. उस्मानाबादेतही सायंकाळी सहाच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या.
वीज गायब : वादळाला सुरुवात होताच शहरातील विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत केला. मात्र अन्य काही भागात उशिरापर्यंत अंधारच होता.
येरमाळ्यात तासभर कोसळला
शनिवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास येरमाळ्यासह परिसरात विजेच्या कडकडाटासह तासभर हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे पाणी साचले होते. दरम्यान, तेरखेड्यात गारांचा सडा पडला.
वीज कोसळल्याने झाडाने घेतला पेट
लोहारा | लोहारा शहरात शनिवारी झालेल्या मध्यम पावसादरम्यान शिवनगर येथील रमेश वचने-पाटील यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला होता. परंतु, शिवनगर येथील तरुणांनी धाव घेऊन मदतकार्य केल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसास सुरुवात झाली. या वेळी वादळी वारेही सुटले होते. या पावसादरम्यान शिवनगर येथील रमेश वचने पाटील यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास वीज कोसळली. त्यानंतर या नारळाच्या झाडाने पेट घेतला होता.
पारा येथे वीज कोसळून महिला ठार
वाशी | तालुक्यातील पारा येथे अवकाळी पावसात वीज कोसळून एक महिला ठार झाली. शनिवारी स्वत:च्या शेतात ज्वारीची सुगी करण्यासाठी महिला मजुरांना घेऊन गेलेल्या सुनीता गणपत शिंदे या महिलेचा सायंकाळी ६ च्या सुमारास वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून मृत्यू झाला. शेतातील महिला मजूर पुढे गेल्यानंतर त्या ज्वारीचे खुडलेले कणसे झाकण्याकरीता व साहित्य आणण्यासाठी परत गेल्या असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.