उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई / पावसाळ्याचे अवघे २० दिवस उरले; १०० दिवसांमध्ये ३५३ मिमी पाऊस, भरपावसाळ्यात १८२ टँकरद्वारे १४१ गावांना पाणीपुरवठा

 पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही प्रकल्प कोरडे, विहिरीसह कूपनलिका अद्याप कोरड्याच

बाळासाहेब माने

Sep 08,2019 08:46:00 AM IST

उस्मानाबाद - पावसाळ्याच्या १०० दिवसांत जिल्ह्यात केवळ ३५३ मिमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी असून बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. उर्वरित पावसाळ्याच्या २० दिवसांत सरासरी गाठण्यासाठी ४१४ मिमी पावसाची गरज आहे. अत्यल्प पावसामुळे ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १४१ गावांमध्ये १८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास जिल्हावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.


यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे पावसाळ्याच्या १०० दिवसांत पिण्याच्या पाण्याचे स्रोतही सुरू झाले नसून जवळपास सर्वच प्रमुख प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामुळे जिल्ह्यातील ५१० गावांतील नागरिकांना पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने यंदा पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. गतवर्षी ओढवलेल्या दुष्काळामुळे नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती, ती अद्याप कायम अाहे. गतवर्षी भूगर्भाची पाणीपातळी चांगली असल्याने विहिरींसह कूपनलिकांना समाधानकारक पाणी मिळत होते. यामुळे नागरिकांना सप्टेंबर महिन्यात पाणीटंचाई जाणवत नव्हती. मात्र, यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असून भूगर्भातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरू झाले नाही. यामुळे पावसाळ्याचे दिवस असले तरी जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही मंडळातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचे स्रोत अद्याप सुरू झाले नाहीत. यामुळे जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यात ९५३ अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा लागत आहे. ज्या गावांच्या परिसरात जिवंत स्रोत उपलब्ध नाही, अशा १४१ गाव व वाडीमध्ये जवळपास १८२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने चार लाख नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये टँकर किंवा स्रोताचे अधिग्रहण सुरू असले तरी विद्युतपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत नाही. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.


रिमझिम पावसामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढेना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ मध्ये ३५३.१५ मिमी पाऊस झाला आहे. रिमझिम पावसामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण वाढत अाहे, मात्र, भूगर्भातील पाणीपातळी अद्याप वाढत नसून प्रकल्प कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परंडा तालुक्यात सप्टेंबरपर्यंत सर्वात कमी १७४ मिमी तर कळंब तालुक्यात २७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने दोन्ही तालुक्यातील पिकांची वाढ खुंटली आहे.

सरासरीच्या तुलनेत झाला अत्यल्प पाऊस
जिल्ह्यातील पावसाची सरासरी ७६७.४६ मिमी आहे. त्याप्रमाणे जून महिन्यापासून पाऊस होण्याची गरज आहे. मात्र, यंदा अत्यंत स्वरूपात पाऊस झाल्याने सप्टेंबर महिन्यात सरासरी ३५३.१५ मिमी पाऊस झाला. हे पावसाचे प्रमाण कमी असून भीषण दुष्काळ ओढवण्याचे चिन्ह आहेत. यामुळे भविष्यात मोठे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होणार आहे. उर्वरित पावसाळ्याच्या २५ दिवसांत ४१४.३१ मिमी पावसाची गरज आहे.

१८ छावण्यांत ११,९४३ जनावरांची सोय
अत्यल्प पावसामुळे अद्याप चारा निर्माण झाला नाही. त्यामुळे भूम तालुक्यात ४, परंडा ९, कळंब ४ आणि वाशी तालुक्यात १ अशा १८ चारा छावण्या सुरू आहेत. यामुळे ज्या पशुपालकांकडे चारा उपलब्ध नाही, अशांच्या पशुधनाला आधार मिळाला आहे.

जिल्ह्यातील १२० प्रकल्प कोरडेठाक
प्रकल्प संख्या ज्योत्याखाली कोरडे
मोठे १ १ ००
मध्यम १७ १५ ११
लघु २०५ ८६ १२०

जिल्ह्यातील पाऊस
तालुका सरासरी
उस्मानाबाद ३१४.०२
तुळजापूर ४३१.३२
उमरगा ४५३.६०
लोहारा ४९०.०२
कळंब २७७.००
भूम ३२०.५०
वाशी ३३७.७३
परंडा १७४.००
एकूण ३५३.१५

टँकर, अधिग्रहणाचे प्रमाण
तालुका टँकर अधिग्रहण
उस्मानाबाद ५७ २६८
तुळजापूर २० १३५
उमरगा १४ १४०
लोहारा ०३ ६०
कळंब २७ १४५
भूम ३१ ४२
वाशी १७ ४१
परंडा १५ ११०
एकूण १८२ ९५३

X
COMMENT