आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पाऊस : राज्यात धरणे हाऊसफुल्ल, विसर्गाने नद्यांना पूर; मराठवाड्यात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी पुण्यातील मुठा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिडे पुलावरील अनेक वाहने पाण्याखाली आली. - Divya Marathi
मंगळवारी पुण्यातील मुठा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिडे पुलावरील अनेक वाहने पाण्याखाली आली.

पुणे/सांगली/कोल्हापूर - पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या भागांतील धरणे तुडुंब भरली आहेत. तर, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत अद्यापही लोक चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 


पुणे भागातील खडकवासला धरण पूर्ण भरल्याने मंगळवारी १३,९८१ क्युसेक विसर्ग मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली तसेच नांदेड-शिवणे छोटा पूलही पाण्याखाली गेला आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला येथे ५६ मिमी, पानशेत येथे १४७ मिमी, वरसगाव येथे १३६ मिमी तर टेमघर येथे १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  या पावसाने पुण्यात जुलैतील १० वर्षांतील विक्रम मोडले. यापूर्वी २०१४ मध्ये २८२.४ मिमी पाऊस पडला होता. यंदा याच महिन्यात ३५९.२ मिमी पावसाची नोंद झाली.

 

सांगलीत कृष्णा नदीची पातळी २७ फुटांवर; कोयना, वारणा दुथडी 
दक्षिण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जलात्कारा’मुळे कोयना, धोम, वारणा, राधानगरी आदी धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. वारणेसह पंचगंगा, धोम धरणातून पाण्याचा विसर्ग बुधवारी करावा लागेल, असे पाटबंधारे विभागाने सांगितले असतानाच हवामान खात्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रविवारपासून या तिन्ही जिल्ह्यांत संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सांगलीत कृष्णा नदीची पातळी दुपारी तीन वाजता २७ फुटांवर जाऊन पोहाेचली. तर पंचगंगा, वारणा नदीनेही पात्र ओलांडले आहे.

 

कोल्हापुरात मुसळधार, कोकणाकडील मार्ग बंद

मंगळवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग तसेच वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार जिल्हा मार्ग तसेच सात ग्रामीण मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरण ८६ टक्के, तर वारणा ७६ टक्के भरले आहे.

 

चिखलदऱ्यात विक्रमी १४८.९ मिमी पाऊस
अमरावती जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. मात्र, मेळघाटात दोेन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. यातही चिखलदरा तालुक्यात रविवार सकाळी ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विक्रमी १४८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

विभागनिहाय पाणी आवक
अमरावती - १०.२५%
औरंगाबाद - ०.८३%
कोकण - ८२. १३%
नागपूर - १२.२९%
नाशिक - २८.९६%
पुणे - ५४.२६%
(वरील टक्केवारी मंगळवारी संबंधीत भागातील धरणात आवक झालेल्या पाण्याची आहे.)

 

लोणावळ्यात धबधब्यात पडून युवकाचा मृत्यू
लोणावळ्यात पडत असलेल्या धुवाधार पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या युवकांच्या पथकातील एकाचा गिधाड धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप तपशील समजलेले नाहीत. काही युवक येथील टायगर पॉइंटजवळच्या गिधाड धबधब्यापाशी गेले होते. त्यातील एक युवक धबधब्यात पडल्याचे वृत्त आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...