आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात परतीच्या पावसाची बरसात, अनेक शहरांत रिपरिप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पुणे, मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी शनिवारी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटसमूह परिसरात तीव्र क्षमतेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तेथून उत्तरेच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरही कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. तेथूनही वाऱ्यांचा प्रवास राज्याच्या दिशेने होत आहे. गेल्या आठवड्यातील वाढलेले तापमान (ऑक्टोबर हीट) हा स्थानिक घटक प्रभावी ठरत आहे. बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक तापमानाचा प्रभाव यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाचे ‘इंटेन्स स्पेल्स’ (मुसळधार पाऊस) पडत आहेत. पुढील ४८ तासांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली. ही परिस्थिती २३ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, असेही कश्यपी म्हणाले.

पुण्यात सरींवर सरी
पुण्यात शनिवारी दिवसभर पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली, तो रात्री उशिरापर्यंत पडत होता. विधानसभा निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने सर्व पक्षांच्या उमेदवार-कार्यकर्त्यांनी भरपावसात रॅली काढल्या. कॉर्नर सभाही घेतल्या. मोठ्या सोसायट्या, गृहसंकुले येथील सभागृहांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत प्रचार केला. नेहमीप्रमाणेच शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून रस्त्यांचे ओढे झाले. त्यातून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली आणि शहरभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रात्रीपर्यंत २४.१ मिमीची नोंद करण्यात आली.

बीड शहरामध्ये अतिवृष्टीचा इशारा
आयएमडीने रविवार, सोमवारी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: पुणे, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर येथे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

विजा कोसळण्याची शक्यता सर्वाधिक
सध्या राज्यात विविध ठिकाणी पडत असणारा पाऊस मान्सूनचा नाही. तो मान्सूनच्या परतीच्या प्रवासातील पाऊस आहे. मान्सून स्थिरावण्यापूर्वी कमीअधिक प्रमाणात (अनप्रेडिक्टेबल) पाऊस पडतो. त्यात सातत्य कमी असते. स्थिरता नसते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि क्वचित गाराही पडतात. तसाच हा परतीचा पाऊस असतो. काही ठिकाणी तो कोसळतो. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडतो. विजा कोसळण्याची शक्यता सर्वाधिक असते. सध्या पडणारा पाऊस मान्सूनच्या माघारीचा आहे. 
-अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग 
 

बातम्या आणखी आहेत...