Home | Maharashtra | Mumbai | Raj Thackeray-Ajit Pawar's closed door talk up to one and a half hour

राज ठाकरे-अजित पवारांची बंद दाराआड दीड तास चर्चा; भाजपविरोधात वातावरण पेटवण्यासाठी 'राज' अस्त्र 

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:24 AM IST

उत्तर भारतीय मते दुरावतील या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास ठाम विरोध केला आहे. 

 • Raj Thackeray-Ajit Pawar's closed door talk up to one and a half hour

  मुंबई- लोकसभा लढवण्याबाबत द्विधा मन:स्थितीत असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंची बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली. भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी मनसेनेही आघाडीत आले पाहिजे, अशी भूमिका मांडणाऱ्या पवारांनी दुसऱ्याच दिवशी थेट मनसे अध्यक्षांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज यांच्या मुंबईतील एका स्नेह्याच्या घरी झालेल्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाल्याचे समजते.

  दुपारी दादर येथील विवेक जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विवेक जाधव हे राज ठाकरे व अजित पवार या दोघांचेही मित्र असल्याने भेटीसाठी ही जागा निवडण्यात आली. सुमारे दीड तास या दोघात बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, मनसेला आघाडीत सामावून घेण्याबाबत वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक लढवावी की नाही या द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज ठाकरेंच्या भूमिकेचा अंदाज घेण्यासाठीच ही भेट असल्याचेही सांगितले जात आहे.

  आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सर्व लहानमोठ्या पक्षांसह मनसेलाही आघाडीत सामावून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेससमोर ठेवण्यात आला होता. मात्र, उत्तर भारतीय मते दुरावतील या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास ठाम विरोध केला आहे.

  भाजपविरोधात वातावरण पेटवण्यासाठी 'राज' अस्त्र
  लोकसभा निवडणुकीचा पूर्वानुभव लक्षात घेता यंदाची निवडणूक लढवू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुतांश नेत्यांचे मत आहे. त्याऐवजी थेट विधानसभेच्या तयारीला लागावे, असा एक विचारही मनसेच्या नेत्यांमध्ये आहे. मात्र, लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजपविरोधात वातावरण पेटवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे प्रचारात सक्रिय असणे गरजेचे आहे. पण मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसल्यास राज ठाकरेंचे प्रचारात सक्रिय राहण्याचे प्रयोजनच उरत नाही. त्यामुळे किमान राज ठाकरे यांनी प्रचारात सक्रिय असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे आघाडीत असतील, मात्र निवडणुकीच्या रिंगणात नसतील, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे आता विविध अर्थ राजकीय वर्तुळात काढण्यात येत असून राज यांनी लोकसभा प्रचारात सक्रिय राहिल्यास त्याबदल्यात त्यांना विधानसभेसाठी मदत करण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत खल सुरू असल्याचे समजते.

Trending