आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काेहिनूर’प्रकरणी चाैकशी : आईचा आशीर्वाद घेऊन लकी लँड क्रुझरने राज पाेहाेचले ईडी कार्यालयात; कुटुंबीय साेबतीला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काळा गाॅगल, कपाळावर गंधाचा टिळा अन‌् आईचा आशीर्वाद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या ‘लकी’ ९ क्रमांकाच्या लँड क्रुझर या  कारने फोर्टस्थित बेलार्ड पिअर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजत पोहोचले. कुष्णकुंज ते ईडी कार्यालय या तासाभराच्या प्रवासात राज यांच्याबरोबर त्यांचे संपूर्ण कुटुंब, सुरक्षा रक्षक व  निवडक कार्यकर्ते केवळ बरोबर होते.

कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राज यांना चाैकशीसाठी बाेलावले हाेेते. सकाळी साडेदहा वाजता ते दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानातून निघाले. गाडीत बसताना त्यांच्या मातोश्री गाडीपर्यंत सोडायला आल्या. राजच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. त्या वेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर राजचा लँड क्रुझर या त्यांच्या आवडीच्या व लकी ठरलेल्या ९ क्रमांकाच्या गाडीने प्रवास सुरू झाला.  त्यांच्या गाडीच्या मागे एक इनोव्हा होती. तीसुद्धा ९ क्रमांकाची होती. त्या गाडीत राज यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित, त्याची पत्नी मिताली व राज यांची मुलगी उर्वशी होत्या.

राज यांचा ताफा सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, वरळी, हाजी अली, पेडर रोड, मरीन लाइन्स, चर्चगेट, आझाद मैदान, सीएसटी, जीपीओ, ग्रँड हाॅटेल मार्गे ईडी कार्यालयात पोहोचला. राज येणाऱ्या मार्गावरचे रस्ते पोलिसांनी खुले केले हाेते. ग्रीन सिग्नल चालू ठेवत वाहतुक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली. हा ताफा रस्त्याने जात होता, तेव्हा लोक आपल्या मोबाइलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. या प्रवासात राज वाहकाच्या मागच्या सीटवर बसलेले होते. राज यांची लँड क्रुझर ही केवळ एकच गाडी ईडी कार्यालयाच्या दारापर्यंत सोडण्यात आली. या गाडीत त्यांचे स्वीय सहायक मंगेश हाटेही होते. राज गाडीतून उतरले, त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना हसतहसत हात केला. त्यानंतर ते आत्मविश्वासाने एकटेच ईडी कार्यालयात गेले. त्यांचे अंगरक्षक ईडीच्या दरवाजाबाहेरच थांबले हाेते.
 

९ क्रमांक राजला लकी
राज यांनी शिवसेना २७ नोव्हेंबरला सोडली तर मनसेची स्थापना ९ मार्चला केली. त्यामुळे ९ क्रमांक राज यांच्यासाठी लकी समजला जातो. महत्त्वाच्या प्रसंगी राज आपली ९ क्रमांकाची आवडती स्काय ब्लू रंगाची लँड क्रुझर काढतात. आज ईडी कार्यालयात चौकशीला जाताना त्यांनी तीच ९ क्रमांकाची लँड क्रुझर वापरली. ही गाडी दिवसभर ईडी कार्यालयाच्या दरवाजात राज यांचा प्रतीक्षेत उभी होती.
 
 
१ ईडी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी ५०० मीटर, ३०० आणि ५० मीटर असे बॅरिकेड्स लावले होते. 

२ ईडी कार्यालयासमाेर एक हजार पोलिस, एसअारपी दल व सीआरपीएच्या तुकड्या तैनात होत्या.

३ दादर आणि दक्षिण मुंबईत जमावबंदी लागू हाेती.

४ ईडी कार्यालयाच्या परिसरातील हाॅटेल्स, दुकाने, टपऱ्या सर्व बंद ठेवण्यात आल्या होत्या.

५ कैसर ए हिंद या चार मजली इमारतीत ईडी झोन १ व झाेन २ चे कार्यालय आहेत. या इमारतीसमोर सुमारे १०० पत्रकार दिवसभर उभे होते.
 

‘ग्रँड’ हाॅटेलमध्ये थांबलेल्या ठाकरे कुटुंबीयांची घालमेल
राज ठाकरे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ईडी कार्यालयातपोहोचले. मात्र, कार्यालयाबाहेर त्यांचे संपूर्ण कुटुंब दिवसभर चिंतेत व अस्वस्थेत दिसत होते. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात गेले त्यानंतर  त्यांच्या पत्नी शर्मिला, सून मिताली, मुलगा अमित, बहीण जयजयवती आणि मुलगी उर्वशी जवळच असलेल्या हाॅटेल ग्रँडमध्ये थांबले. थोड्या थोड्या वेळानंतर हाॅटेलमधून राजचे कुटुंबीय बाहेर येत होते. दुपारपर्यंत कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत नव्हता. मात्र, चौकशीला वेळ लागल्यानतंर दुपारनंतर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ईडी इमारत असलेल्या कुसूमभाँय रोडवर अस्वस्थ ठाकरे कुटुंबातील सदस्य फेऱ्या मारत होते.  माध्यमांकडे प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी नकार दिला. हास्यविनोद करताना ठाकरे कुटुंबीय दिसत होते, तरी त्यांच्या चेहऱ्यावर मोठा तणावसुद्धा जाणवत होता. ईडी कार्यालय असलेल्या कैसर ए हिंद या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राज यांची चौकशी चालू होती. ठाकरे कुटुंबीयांना त्या इमारतीकडे पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. सायंकाळी सात वाजता इमारतीच्या प्रवेशदारात हालचाल वाढली. राज बाहेर येतील, असा अंदाज झाला. तेव्हा राज यांची पत्नी आणि मुलगी राजच्या लँड क्रुझर गाडीशेजारी प्रतीक्षेत उभ्या राहिल्या. तब्बल साडेअाठ तासानंतर रात्री अाठ- सव्वा अाठ वाजण्याच्या सुमारास राज कार्यालयाबाहेर अाले व कुटुंबीयांसाेबत घरी ‘कृष्णकुंज’वर परतले.

बातम्या आणखी आहेत...