आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुत्राच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे \'मातोश्री\'वर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा येत्या २७ जानेवारीला विवाह असून या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी खुद्द राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी पोहोचले. शनिवारी सायंकाळी दोघांदरम्यान झालेल्या या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ठाकरे बंधूंदरम्यान झालेली ही भेट संपूर्णत: कौटुंबिक स्वरूपाची होती. 

 

गेल्यावर्षी शिवसेनेने मुंबई महापालिकेतील आपली सत्ता बळकट करण्यासाठी मनसेचे सात नगरसेवक फोडत त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. शिवसेनेने टाकलेल्या या धोबीपछाड डावानंतर संतापलेल्या राज ठाकरे यांनी 'आता टाळी थेट गालावरच' अशी प्रतिक्रिया त्या वेळी दिली होती. या घटनेनंतर दोन्ही बंधूंमधील संबंध कमालीचे तणावाचे बनले होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या साखरपुड्यालाही राज यांनी उद्धव ठाकरे यांना आमंत्रित न केल्याने दोन्ही बंधूंमधील वाद संपला नसल्याचे संकेतही मिळाले होते. या पार्श्वभूमीवर राज यांनी शनिवारी सायंकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या विवाहाचे आमंत्रण दिल्याने दोन्ही बंधूंमधील तणाव काहीसा निवळल्याचे चित्र आहे. मातोश्रीवर पोहोचताच राज यांनी सर्वप्रथम पहिल्या मजल्यावरील दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. तसेच बाळासाहेब आपल्या हयातीत बसत असलेल्या खुर्चीवर त्यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही ठेवली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या खोलीत जाऊन त्यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या भेटीत खेळीमेळीत गप्पा झाल्याचे समजते. राज यांनी थट्टेत 'आता आदित्यचे लग्न केव्हा?' अशी विचारणाही उद्धवना केल्याचे कळते. उद्धव यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राज हे जवळच असलेल्या जयदेव यांच्या घरी गेले. 

 

राहुल गांधींनाही देणार आमंत्रण, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सस्पेन्स 
येत्या ७ आणि ८ जानेवारी रोजी राज ठाकरे हे काही राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रित करणार असल्याचे समजते. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार आणि राहुल यांचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद देवरा यांच्या समन्वयाने या दोन्ही नेत्यांची राहुल यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे. याशिवाय राज्यातील महत्त्वाचे नेते नितीन गडकरी यांनाही राज ठाकरे दिल्ली दौऱ्यादरम्यान भेटणार आहेत. पंतप्रधान मोदींना मात्र राज आमंत्रण देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.