आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलवामाचा हल्ला घडवून आणलेला; निवडणुकीआधी घडेल दुसरा हल्ला, राज ठाकरे यांचा भाजप सरकारवर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - दाऊदला परत आणण्याची गोष्ट केली. खरे तर दाऊदलाच भारतात यायचे होते, परंतु ते झाले नाही. राममंदिराच्या मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाल्यानेच पुलवामानंतर एअर स्ट्राइक करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. आता निवडणुकीपूर्वी पुलवामाप्रमाणे एखादा हल्ला घडवला जाईल, असे सूतोवाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. पुलवामा हल्ला घडवला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारवर केला.   


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राज ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांनी दहशतवाद्यांनी भारतात केलेले हल्ले आणि त्यांचा विविध राज्यांत झालेल्या निवडणुकीशी संबंध जोडत भाजप निवडणुका जिंकण्यासाठी असे करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत राफेलवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल अंबानींना अनुभव नसताना राफेलचे काम का दिले, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही त्यांनी पुन्हा टीका केली.   


राज ठाकरे म्हणाले, आज मी लोकसभा निवडणुकीबाबत काय बोलणार, असा प्रश्न माध्यमांवर चर्चिला जात आहे. परंतु मी त्याबाबत नंतर बोलेन. गेल्या १३ वर्षांत पक्षाने अनेक चढउतार पाहिले, या काळात तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली त्याबद्दल आभार. आचारसंहिता घोषित झाल्यानंतर निवडणुकीबाबत मी जो काही निर्णय घेईन तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल. दोन दे रे, तीन दे रे अशी मागणी करायला मी प्रकाश आंबेडकरांसारखा नाही. ते नक्की कुठल्या बाजूचे आहेत ते कळत नाही, अशी टीकाही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.   


राष्ट्रभक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत? जर ते राष्ट्रभक्त आहेत, तर मग नवाझ शरीफ यांना त्यांच्या वाढदिवशी पाकिस्तानमध्ये जाऊन भेटायला आणि त्यांना केक भरवायला का गेलात, असा सवाल त्यांनी केला.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबाबत त्यांची चौकशी करा, बऱ्याच गोष्टी समोर येतील, असे मी म्हटले तर मला ट्रोल करण्यात आले. मी त्याची पर्वा करीत नाही. 


पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, पुलवामा हल्ला होण्यापूर्वी २७ डिसेंबरला बँकॉकमध्ये अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली. पुलवामा हल्ल्यात देशातील जवानांची ४० कुटुंबे एका क्षणात उद्ध्वस्त झाली. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपने राष्ट्रभक्ती कपाटात बंद करून ठेवली, अशी टीका करीत, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मी अंदाज व्यक्त केला होता की, २०१९ च्या निवडणुकांच्या आधी देशात युद्ध होईल, असे ते म्हणाले.


शिव्या घालणाऱ्यांच्या घरात घुसून मारा
कट्ट्यावर बसून सायलेंट झोन असावा, अशी मागणी करणारेच युद्ध करायला पाहिजे, घरात घुसून मारायला पाहिजे असे बोलतात, अशी टीकाही युद्धाची मागणी करणाऱ्यांवर त्यांनी केली. तसेच आपल्याला सोशल मीडियावरून शिव्या घालणाऱ्यांना घरात घुसून मारा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  सभागृहात “चौकीदार चोर है’ च्या घोषणाही मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या.


तेव्हा अमित शहा काय को-पायलट होते का?  
अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये किती माणसे मारली याचा आकडा सांगितला. ते काय को-पायलट म्हणून बसले होते का, असा प्रश्न करीत राज ठाकरे म्हणाले, आपल्या जवानांनी हल्ला केला हे खरे, परंतु त्यांना चुकीची माहिती दिली गेली, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, याचा पुरावा म्हणून खोटे फोटो प्रसारित करण्यात आले. भाजप सरकार पदोपदी खोटे बोलत आहे आणि त्यांच्या आयटी सेलमध्ये असलेली बेवारस मुले त्याचा प्रचार करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...