आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे, की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे?' कोथरुडमध्ये 'राज'गर्जना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील कोथरुड मतदारसंघातील उमेदवारासाठी राज ठाकरेंची प्रचार सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा उचलून धरला. "कोथरुडमध्ये भाजपाने बाहेरचा उमेदवार लादला कारण तुम्हाला गृहित धरलं गेलं आहे. आम्ही कोणताही माणूस कुठेही टाकला तरीही ही भाबडी जनता त्यांना निवडून देईल हा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटतो." असे राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे आहेत. मग ते कोल्हापूरमधून का उभे राहिले नाहीत? कोल्हापूरमध्ये उभं रहायला तुम्हाला भीती का वाटली?" असे प्रश्न विचारत राज ठाकरेंनी कोथरुड येथील सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ता डोक्यात जाते तेव्हा अशा कृती केल्या जातात असाही आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्राला काय झालं आहे ते मला समजत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
''देशातील महापुरुषांचीही वाटणी जातीनिहाय केली जात आहे. शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, सावरकर ब्राह्मणांचे, महात्मा फुले माळी समाजाचे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा विचार दिला आहे. आज या महाराष्ट्रात चाललंय काय?'' असा आरोप राज ठाकरेंनी केला. "काही दिवसांपूर्वी पुण्यात राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. ज्यांनी हा उद्ध्वस्त केला, त्यांनातरी रामगणेश गडकरी ठाऊक आहेत का? आज आपण महापुरुषांना, साहित्यिकांना, कलाकारांना जातीच्या नजरेतून बघायला लागलो आहोत. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात मोठा आहे. तो मेट्रोने सुटणार नाही," असेही राज ठाकरे म्हणाले.महाराष्ट्राचा तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार करायचाय का? असा सवाल त्यांनी जनतेला केला. तसेच, "कोथरुडची निवडणूक तुमच्यासाठी सोपी आहे. तुम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे की बाहेरुन आयात केलेला उमेदवार हवा आहे, एवढच तुम्हाला ठरवायचं आहे. निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटील हे मतदारांच्या हाती लागणार नाहीत." असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...