आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवारांशी 'राज'कीय भेट; मनसेला महाआघाडीत घेण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी सकाळी भेट घेतली. तब्बल दोन तासांपर्यंत चाललेल्या या चर्चेमध्ये राज ठाकरे यांनी ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी शरद पवारांकडे मागणी केल्याची चर्चा आहे. 

पुत्र अमित याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात सध्या राज व्यग्र आहेत. त्यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांना लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली होती. त्यानंतर रविवारी राज ठाकरे पवार यांच्या दक्षिण मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पोहोचले. ही भेट अमितच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर असली तरी त्यात राजकीय चर्चा झाल्याचे समजते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवण्यासाठी राज इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमय्या खासदार आहेत. भाजपविरोधी महाआघाडी तयार करण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकाराने मनसेला महाआघाडीत सामावून घेतले जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. तसे झाल्यास राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे बनू शकतात. 

 

मनसेला महाआघाडीत घेण्याची शक्यता 
ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली होती. जागावाटपात सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतले जाऊ शकते. तसेच राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याचा हा मतदारसंघ मनसेला दिला जाऊ शकतो.