आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टर राजकीय शत्रू भुजबळ-राज ठाकरेंची भेट, महाआघाडीत मनसेला घेण्याच्या चर्चेला बळ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रमेश किणी खूनप्रकरणी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले राज ठाकरे व छगन भुजबळ हे एकमेकांना सहकुटुंब भेटले. मुलगा अमितच्या लग्नाच्या निमित्ताने 'कृष्णकुंज'वर भुजबळ कुटुंबीयांसाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मनसेला विरोधकांच्या आघाडीत सामील करून घेण्याबाबतच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 


नव्वदच्या दशकात शिवसेना सोडल्यानंतर भुजबळ व ठाकरे कुटुंबीयांत दुरावा निर्माण झाला. भुजबळांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात त्यांनी थेट बाळासाहेबांनाच अटक करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही नेत्यांचे संबंध ताणले गेले. २००९ च्या विधानसभा व २०१२ च्या पालिका निवडणुकांत राज यांनी नाशिकमध्ये थेट भुजबळांनाच आव्हान दिले होते. त्या वेळी राज ठाकरेंवर पलटवार करण्यासाठी भुजबळांनी रमेश किणी प्रकरणाचा उल्लेख प्रचारात केला होता. टोलच्या मुद्द्यावरूनही राज यांनी भुजबळांना लक्ष्य केले होते. मात्र, साधारण दोन दशकांचे राजकीय शत्रुत्व विसरून ३ वर्षांपूर्वी भुजबळांनी राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्या प्रकृतीची 'कृष्णकुंज'वर येऊन विचारपूस केली होती, तर महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ यांना जामीन मिळत नसताना राज ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळ यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले होते. 


या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री भुजबळ हे पत्नी, मुलगा पंकज, पुतण्या समीर यांच्यासह स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे भुजबळ हे राज अमित यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. पण तिथे मनमोकळेपणाने गप्पा मारता न आल्याने भुजबळ यांना स्नेहभोजनासाठी कृष्णकुंजवर आमंत्रित करण्यात आले होते. सुमारे २ तास ते "कृष्णकुंज'वर होते. 


राष्ट्रवादीचा अाग्रह, काँग्रेसचा विरोध 
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व समविचारी राजकीय पक्षांच्या आघाडीत मनसेलाही घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने ठेवला होता. मात्र, आपल्या उत्तर भारतीय मतांवर परिणाम होईल, या भीतीपोटी काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही वारंवार मनसेला आघाडीत स्थान नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना विवाहाचे औचित्य साधत अगोदर अहमद पटेल आणि आता भुजबळ राज ठाकरेंना भेटून गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...