आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेतील चुका, विधानसभा तयारीसाठी राज भेटले पवारांना; अनेक मुद्द्यांवर केली चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या “सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे पाऊण तास झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील चुका तसेच अागामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, या चर्चेबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


लोकसभा निवडणुकीत मनसेने आपला एकही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधत रान उठवले होते. या दोघांना घरी बसवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत केले होते. त्यांच्या सभांना गर्दी प्रचंड होत असे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल, असे म्हटले जात होते, परंतु निकाल आल्यानंतर राज ठाकरे यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसादच दिला नसल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आघाडीत असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. मात्र, विधानसभा निवडणुकीत  मनसेला आघाडीत घेण्याबाबत या बैठकीत काहीही चर्चा झाली नव्हती. काँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्यास विरोध आहे, मनसेला आघाडीत घेतल्यास जागावाटप आणि अमराठी मतदारांवर परिणाम होईल आणि त्याचा फटका विधानसभेला बसेल, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. याऊलट, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेऊ इच्छिते. मनसेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली आहे.  राजू शेट्टी यांनीही मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. 
 

या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांत खलबते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेला आघाडीत घेण्याबाबत काय अडीअडचणी, मनसेने वेगळे लढण्याचे ठरवले तर रणनीती तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रान उठवूनही त्याचा परिणाम मतपेटीवर का झाला नाही, या मुद्द्यांवर दोघांत चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...