आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीतही गाजणार ‘लाव रे तो व्हिडिओ’! मनसे देणार 125 जागांवर पर्याय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे | मुंबई
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यात सुमारे १२५ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. प्रमुख जागांवर समर्थ पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून महत्त्वाच्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या प्रचार सभा होणार आहेत. यात सरकारचा फोलपणा उघड केला जाईल,’ अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

‘राजकारणात सध्या पर्याय दिसत नसल्यामुळे लोक युतीला मतदान करत आहेत. आम्ही त्यांना समर्थ पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.  लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल केली. त्या वेळी सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. सगळ्याच क्षेत्रांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या वातावरणात निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. हीच भावना आम्ही पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महत्त्वाच्या जागा लढवाव्यात ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. उमेदवारीसंदर्भात विभागवार मुलाखती झाल्या. त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळाला. उमेदवारांची अंतिम निवड पक्षप्रमुख करणार आहेत. लवकरच जागा आणि उमेदवार जाहीर होतील,’ असे देशपांडे म्हणाले. भाजप सरकारच्या काळात मुंबईचे महत्त्व कमी होत आहे. हा प्रकार मराठी माणसाच्या लक्षात येत नाही. पण मुंबईचे महत्त्व आम्ही कमी हाेऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘काेचिंग क्लास’

पक्षांतराबाबत देशपांडे म्हणाले, ‘लोक धावणाऱ्या बसमध्ये बसतात. कोचिंग क्लास जसे मेरिटच्या विद्यार्थ्याला प्रवेश देऊन नाव कमावताे, तसे भाजपने निवडून येण्याची खात्री असलेल्या आपल्या उमेदवारांनाच पक्षात प्रवेश दिला आहे. ते निवडून आले तर त्यात विशेष काय?’

  • नाराजांसाठी मनसे पर्याय

‘लाव रे तो व्हिडिओ’ या टॅगलाइनने राज ठाकरेंचा प्रचार लाेकसभेत खूप गाजला. या वेळीही आम्ही नव्या विषयांसह मैदानात उतरणार आहोत. सरकारच्या फसव्या योजना लोकांसमोर मांडू. राज ठाकरे यांच्या सभा या वेळीही माेठ्या प्रतिसादात हाेतील. आम्ही सगळ्याच पक्षांपासून सुरक्षित अंतर ठेवून आहोत. आम्ही स्वतंत्रच लढू. मात्र प्रमुख पक्षातील नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना आमचा पर्याय उपलब्ध असेल.

बातम्या आणखी आहेत...