पुणे- महाराष्ट्राचा मजाक लावलाय का, असा जोरदार सवाल करतानाच खोटे टोलनाके बंद होत नाहीत, टोलवसुली व्यवहारात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत टोलनाके फोडू, जाळू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला. टोलविरोधात येत्या 12 फेब्रुवारी रोजी त्यांनी राज्यात रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली. या मुद्दय़ावर शिवसेना-भाजप महायुतीने 18 रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्याचे ठरवले असताना त्याआधीच ‘रास्ता रोको’चा राजमार्ग पुकारत राज यांनी महायुतीवर कुरघोडी केली आहे.
रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व मी स्वत: करणार असून, हिंमत असेल तर सरकारने अटक करून दाखवावी, असे आव्हानही राज यांनी दिले. सर परशुरामभाऊ कॉलेजच्या (एसपी) मैदानावरील सभेत राज यांनी या मुद्दय़ावरून राज्य सरकारचे वाभाडेच काढले. निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आलो नाही. त्याच नारळाने सरकारचे टाळके फोडण्यासाठी आलो आहे, असे सुरुवातीलाच सांगून राज म्हणाले, रस्त्यांसाठी 13 प्रकारचे कर भरले जातात. त्याचे किती पैसे गोळा होतात ते माहिती नाही. राज्य चालवायला पैसे लागतात. मान्य पण पारदर्शकता नसलेला टोल का भरायचा? याची उत्तरे सरकार देत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
टॅक्सच्या नावाखाली 2000 ते 2011 या काळात 22 हजार 266 कोटी रुपये मिळाले. बाकीचा टॅक्स कुठे गेला. टोलबाबत लवकरच मोबाइल अॅप्स व
फेसबुकद्वारे जनतेला खरी माहिती देऊ, असे राज म्हणाले.
टोल न देताच शर्मिला ठाकरे, कार्यकर्ते पुण्यात : राज यांच्या पत्नी शर्मिला व मनसेचे कार्यकर्ते टोल न देताच मुंबईहून पुण्याकडे गेले. आम्ही टोल देणे बंद केले आहे. या वेळीही दिला नाही. सरकार हिशेब देत नाही तोवर आम्ही टोल भरणार नाही, असे शर्मिला यांनी रायगड जिल्हय़ातील खालापूर टोलनाक्यावर सांगितले