आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raj Thackeray Says, Not Only Every Marathi Man But All Indians Want To See Panipat

राज ठाकरे म्हणतात, 'फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा पानिपत'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरे यांनी 'पानिपत' हा चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे.

बॉलिवूड डेस्कः  बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर त्यांच्या आगामी 'पानिपत' हा चित्रपट येत्या 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे.  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सनी ट्रेलरवरुन नाराजी व्यक्त केली होती, तर पानिपतकार म्हणून प्रसिद्ध असलेले लेखक विश्वास पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप लावला. इतकेच नाही तर चित्रपटातील संवादावरुनही वादंग उठले होते. पण आता आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा चित्रपट केवळ मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहायला हवा, असे आवाहन केले आहे. 


राज ठाकरे म्हणतात...  ''पानिपतची लढाई ही म-हाठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणा-या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी म-हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र श्री. आशुतोष गोवारीकर ह्यांचा 'पानिपत' चित्रपट. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा.''
 

 मराठीसोबतच इंग्रजीतूनही त्यांनी ट्विट केले आहे.

राज ठाकरे यांच्या आवाहनाचा फायदा चित्रपटाला होतो का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. तत्पूर्वी एक नजर टाकुयात या चित्रपटावरुन निर्माण झालेल्या वादावर... 

  • अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केली नाराजी...

या चित्रपटाचा 4 नोव्हेंबर रोजी ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाची कहाणी अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या पानिपतच्या युद्धावर आधारित आहे. चित्रपटावरून अफगाणिस्तानमध्ये वाद रंगला आहे. अफगाणिस्तानच्या काही सोशल मीडिया युजर्सनी भारतीय निर्मात्यांना व प्रशासनाला अब्दालीची नकारात्मक भूमिका न दाखवण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानात अब्दालीला आदराने ‘अहमद शाह बाबा’ म्हटलं जातं. त्यामुळे चित्रपटात त्यांचं नकारात्मक पात्र रंगवू नये अशी अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सची मागणी आहे. ‘पानिपत’मध्ये अभिनेता संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी संजयने त्याचा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर कमेंट करत भारतातील अफगाणिस्तानचे राजदूत शाइदा अब्दाली यांनी ट्विट केलं होतं, ”भारत-अफगाणिस्तानदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी भारतीय चित्रपटांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मला आशा आहे की, ‘पानिपत’ चित्रपटाने या दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासाची ही गोष्ट लक्षात ठेवली असेल.”

  • कथा चोरीचा आरोप...

लेखक विश्वास पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप करण्यात केला असून चित्रपटाची कथा ‘पानिपत’ कादंबरीतून चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेट यांच्यावर बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात वाङ्‌मय चोरीची याचिका दाखल केली आहे. शिवाय पाटील यांच्या वकिलांनी सात कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. पानिपतची तिसरी लढाई कादंबरीवरीच्या रुपात लिहायला मला सहा वर्षे लागली. यावर प्रचंड अभ्यास करून पराभवाच्या लढाईचे मी विजयात रुपांतर केले. परंतु लेखकाला अंधारात ठेवून त्याचे साहित्य अशा पद्धतीने वापरणे गैर आहे. म्हणून ही याचिका दाखल केल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.

  • संवादावरुन वाद..

या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मस्तानीविषयीच्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. त्याला उत्तर न दिल्यास कोर्टात धाव घेण्याचा इशारा बाजीराव पेशव्यांच्या आठव्या पिढीचे वंशज नवाब शादाब अली बहादूर यांनी दिला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सेननच्या तोंडी असलेल्या संवादावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता गोवारिकर, रोहित शेलाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना नोटिस पाठवून वादग्रस्त संवाद चित्रपटातून काढण्याची मागणी केली आहे. चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. चित्रपटात “मैने सुना है जब पेशवा अकेले मोहिम पर जाते है तो एक मस्तानी के साथ लौटते है”, हा संवाद आहे. “चित्रपटात हा संवाद अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला गेला असून त्याला माझा विरोध आहे. या संवादातून मस्तानी साहिबांसोबतच पेशव्यांचीही चुकीची प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मस्तानीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. चित्रपट आणि ट्रेलरमधील हा संवाद वगळण्याविषयीची नोटीस मी निर्माते व दिग्दर्शकांना पाठवली आहे. त्यांनी नोटीसीला प्रतिसाद न दिल्यास मी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेईन”, असं वक्तव्य नवाब शादाब अली बहादूर यांनी केलंय.

  • पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित चित्रपट

पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूरने पेशवे सदाशिव रावांची भूमिका वठवली आहे, तर कृती सेनन त्यांची पत्नी पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्तने या चित्रपटात अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे. मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापुरे, नवाब शाह, मंत्रा, जीनत अमान, रविंद्र महाजनी, गश्मिर महाजनी, मिलिंद गुणाजी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.