आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धसदृश्य परिस्थिती; राज ठाकरेंचा सरकारसह डोभाल यांच्यावर गंभीर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सभेला संबोधित केले. ठाणे येथे पार पडलेल्या सभेची सुरुवात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यानंतर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील माध्यमांचा खरपूस समाचार घेतला. जुने काही तरी विसरण्यासाठी नवीन काहीही दाखवले जात आहे. असे राज ठाकरे म्हणाले. एवढेच नव्हे, तर पुलवामाचा हल्ला असाच कसा झाला असे प्रश्न विचारताना त्यांनी सरकार, माध्यम आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर गंभीर आरोप लावले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे असे राज ठाकरे म्हणाले आहेत. मनसेच्या या सभेत 'चौकीदार चोर है' घोषणा देखील देण्यात आल्या.

 

निवडणुकांपूर्वी आणखी एक हल्ला होऊ शकतो!
मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल एअर स्ट्राइक या मुद्द्यांवर अनेक धक्कादायक विधाने केली. देशात निवडणुकीपूर्वी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करणार असे बोललो होतो. त्यानंतरच सर्जिकल स्ट्राइक झाल्या. सरकार निवडणुकीत सैनिकांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला होऊ शकतो. उरी येथे दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केले. त्यावेळी सुद्धा राज्यांमध्ये निवडणुका होत्या असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. यासोबतच, डोकलाम वाद सुद्धा त्यातलाच एक प्रकार होता असे आरोप राज यांनी केले आहेत.

 

एकदा काय ते पाकला संपवून टाका...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दरम्यान पीएम नरेंद्र मोदींवर टीका करताना माध्यमांचा आणि खासकरून भाजपच्या आयटी सेलचा देखील खरपूस समाचार घेतला. भाजपच्या आयटी सेलची पोरं म्हणजे, भंपक असे राज म्हणाले. या आयटी सेलकडून पाकिस्तानसोबत युद्धाबद्दल बोलले जात आहे. शेजारी दिवाळीचे फटाके फुटल्याने घाबरणारे आजकाल युद्धाचे बोलत आहेत.


अजित डोभाल यांच्यावर गंभीर आरोप
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एनएसए अजित डोभाल यांच्या मुलाचे पार्टनर पाकिस्तानी आहेत असे आरोप राज ठाकरेंनी केले आहेत. डोभाल यांच्या मुलाच्या कंपनीचा एक पार्टनर अरब देशाचा तर दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे. हाच मुलगा दुसऱ्या एका पक्षाच्या नेत्याचा असता तर भाजपच्या नेत्यांनी त्याला देशद्रोही ठरवले असते असे राज यांनी सुनावले.

बातम्या आणखी आहेत...