आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माणूस-उत्तर भारतीय संघर्ष महाराष्ट्रात थांबणार! उत्तर भारतीय महापंचायतीने राज ठाकरेंना दिले आमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुजरात राज्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतीय लाेकांविराेधात हिंसक अांदाेलने सुरू असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेला मराठी माणूस विरुद्ध उत्तर भारतीय यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्या अाहेत. मुंबईतील उत्तर भारतीय महापंचायतीतर्फे शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संवादासाठी अामंत्रण दिले अाहे. त्याचा स्वीकार करून २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला स्वत: राज ठाकरे हजर राहणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. 
सर्वसामान्य उत्तर भारतीय माणसाच्या मनात मनसेबाबत असलेले अाक्षेप आणि रोजगार, गुन्हेगारीकरण आणि पायाभूत सुविधांवर पडत असलेल्या ताणाच्या अनुषंगाने राज ठाकरे अाणि उत्तर भारतीयांमध्ये सुसंवाद घडणार अाहे. 


मनसेच्या पक्षस्थापनेपासून सुरू झालेला उत्तर भारतीय विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष भडकला हाेता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या वादात भर पडली हाेती. मात्र अाता हा संघर्ष संपुष्टात अाणण्यासाठी उत्तर भारतीय महापंचायतीने एक पाऊल पुढे टाकले अाहे. शुक्रवारी सायंकाळी या संघटनेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना या संवादपर चर्चेचे आमंत्रण दिले. २ डिसेंबर रोजी मुंबईतच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. राज ठाकरेंनी अद्याप निमंत्रणाचा स्वीकार केला नसल्याने कार्यक्रमाचे स्थळ निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र ही भेट सकारात्मक वातावरणात पार पडली असून राज यांनी आमच्या शिष्टमंडळाशी खूपच सकारात्मकतेने संवाद साधल्याची माहिती उत्तर भारतीय महापंचायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय दुबे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. विश्वाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, या राज ठाकरेंच्या वाक्यातील महाराष्ट्र साकारण्यासाठी आमचीही त्यांनी पूर्ण साथ असेल, असेही विनय दुबे म्हणाले. 


वाद मिटवण्यासाठी आमचा पुढाकार : महापंचायत 
गेल्या दहा-बारा वर्षांतील मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष संपावा यासाठी म्हणावे असे प्रयत्नच झाले नाहीत. उलट उत्तर भारतीय समाजातील काही नेत्यांकडून या मुद्द्याचा वापर स्वार्थी राजकारणासाठी करण्यात आला आहे. अाता तरी हा संघर्ष संपून मध्यममार्ग निघावा यासाठी आम्ही पुढाकार घेत अाहाेत, असे भारतीय महापंचायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय दुबे यांनी या संदर्भात सांगितले आहे. 


निवेदन मिळाले, अद्याप निर्णय मात्र नाही : देशपांडे 
मनसेचे सरचिटणीस आणि राज्यस्तरीय प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'उत्तर भारतीय महापंचायतीने निवेदन दिले आहे, ही गोष्ट खरी असली तरीही या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही याचा निर्णय खुद्द राज ठाकरे हेच घेतील,' असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे या कार्यक्रमास जातील असे संकेत पक्षातील सूत्रांकडून दिले जात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...