आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 : सत्ता द्या, महाराष्ट्र सरळ करताे; 2019 : सक्षम विराेधी पक्षाची सत्ता द्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘राज्याची सत्ता माझ्याकडे द्या, बघा महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करताे...’ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अशी साद घालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला मतदारांनी साफ झिडकारले. लाेकसभेत उमेदवार उभे करण्याचे बळही या पक्षात राहिले नाही. आता केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या राज यांचे सूर बदलले आहेत. ‘सत्ता नव्हे, तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकेल असा सक्षम विराेधी पक्ष हाेण्याइतपत सत्ता मला द्यावी,’ असे आवाहन त्यांनी गुरुवारी पहिल्याच प्रचारसभेत केले. ‘माझ्या पक्षाची क्षमता मला माहीत आहे. त्यामुळे कदाचित विराेधी पक्षाची सत्ता द्या, अशी मागणी करणारा मी एकमेव नेता असेल,’ हे मान्य करण्यासही ते विसरले नाहीत. 

पावसामुळे बुधवारची पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंनी गुरुवारी मुंबईत दाेन प्रचारसभा घेतल्या.  काेहिनूरप्रकरणी ‘ईडी’ चाैकशी झाल्यानंतर राज ठाकरे काय बाेलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले हाेते. मात्र पहिल्या सभेत सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच त्यांनी राज्यात विराेधी पक्षही सक्षम राहिला नसल्याचे सांगितले. शहरांची बकाल अवस्था झाल्याचे सांगत त्यांनी फडणवीस सरकारलाही धारेवर धरले. ‘शहरांचा विचका झाला असून अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची दैना उडाली. त्यामुळे मला सभा रद्द करावी लागली. आज वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे प्रवासाला जास्त वेळ लागत असल्याने भाषणास कमी वेळ मिळत आहे. सरकार दिवसेंदिवस आपली आयुष्य बरबाद करतायत आणि शहरेही बरबाद करत आहेत.  पुणेकरांनी आता पुण्यात नव्हे तर पाण्यात राहात आहोत, असे सांगण्यास सुरुवात करावी,’ असा टाेलाही त्यांनी लगावला.

पुण्यात नव्हे पाण्यात राहतात
शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी सगळेच सरकारवर नाराज आहेत. नोकऱ्या नाहीत.  उद्योगधंदे बंद झाल्याने ते बेरोजगार होत आहेत. बँकांचे घोटाळे होत आहेत. आपलेच पैसे काढण्यासाठी ग्राहक बँकांबाहेर रडताना दिसतात. पीएमसी बँकेचे संचालक भाजपशी संबंधित आहेत. रस्ते नाहीत तर फक्त खड्डे आहेत आणि खड्ड्यांमुळे एका मुलीचा नुकताच मृत्यूही झाला. शहरांचे नियोजन ढासळले आहे. याबाबत आपण प्रश्न विचारणार आहोत की नाही? निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. तुम्ही त्यांना निवडून देता आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे,’ असेही ते म्हणाले. सरकार आणि न्यायालये संगनमताने चालत असल्याने न्यायलयाकडूनही न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. न्याय तरी कोणाकडे मागायचा असा प्रश्नही त्यांनी केला.

कितीही चाैकशी करा, घाबरत नाही
‘ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा मी उपस्थित केला हाेता. मात्र त्यावरुन निवडणुकीवर बहिष्कार टाकायला विरोधी पक्षांनी नकार दिला,’ याबद्दलही राज यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप- शिवसेने सरकारकडून रोज नवनवीन थापा ऐकायला मिळतात. चाैकशा मागे लावून यांनी अनेकांना भाजपात घेतले. सर्व जण चाैकशांना घाबरत आहेत. कितीही चाैकशा लावल्या तरी माझे थाेबाड मात्र बंद हाेणार नाही. आरेवरुन शिवसेना सर्वांना मुर्ख बनवतेय,’ अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.