आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या मेळाव्याला मुहूर्त सापडेना: मनसे पदाधिकारी सक्रिय असूनही इंजिन घेईना वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जोरदार तयारी सुरू असली तरी वरिष्ठ पातळीवर अद्याप सामसूमच आहे. मनसेकडून गेल्या वेळच्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळून आता नव्या चेहऱ्यांना उमेदवार म्हणून संधी देण्यात येणार आहे. याबाबत दीड महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात नगरमध्ये मेळावा घेण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हेही नगरमध्ये मेळावा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप या मेळाव्याला मुहूर्त गवसलेला नाही. 


महापालिकेच्या गेल्या वेळच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इतर पक्षांपेक्षा वेगळेपणा जपला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मनसेच्या तिकिटावर लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पास झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मनसेतील वरिष्ठ नेत्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. या प्रक्रियेतून मनसेच्या अपेक्षेनुसार चांगले असलेले उमेदवार निवडून त्यांना मनसेचे तिकिट देण्यात आले होते. मनसेच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यावेळच्या मनपा निवडणुकीच्या वेळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नगरमध्ये एक तरी सभा घ्यावी, अशी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण, राज ठाकरे यांनी नगरकडे दुर्लक्षच केले. त्यांची नगरमध्ये एकही सभा झाली नाही. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मनसेचा करिष्मा दिसला नाही. शिवाय निवडून आलेले नगरसेवकांनी पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे पक्ष नेतृत्व व स्थानिक पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली. यावेळी मात्र स्वत: राज ठाकरे यांनी निवडणुकीत लक्ष घातले असल्याचे मनविसे जिल्हाप्रमुख सुमित वर्मा यांनी सांगितले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून गेल्या ६ महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकारणाशी संबंध नसलेले उमेदवार आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा मनसेचा मानस आहे. त्यादृष्टीने स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणेही विचारात घेतले जाणार आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठाकरे यांच्या मेळाव्याच्या तयारीला लागले. पण, अजूनही सभेचा दिवस निश्चित नाही. 


विद्यार्थी सेनाच रणांगणात 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख, शहरातील पदाधिकारी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करत आहेत. तर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, इतर युवा नेते व कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विद्यार्थी सेनेतील पदाधिकाऱ्यांपैकी अनेक जण स्वत: उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सोशल मिडियावर त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. नागरी समस्या व गुंडगिरी असलेले शहर ही ओळख पुसून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार केला आहे. 
का नाही येत? 


गतवेळी महापालिका निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. नंतरच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवारही नव्हता. तसेच कोणाचे काम करायचे, याचे आदेशही नव्हते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता. मध्यंतरी मरगळलेल्या वातावरणामुळे काही युवा पदाधिकाऱ्यांनी मनविसेला रामराम ठोकला. दरवेळी पदाधिकारी जोरदार तयारी करतात, पण राज ठाकरे नगरमध्ये सभा का घेत नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला. 


इंजिन सोडून दिले 
मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या चार नगरसेवकांना गेल्या वेळी सत्ता स्थापन करण्याच्या वेळी तटस्थ राहण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. तरीही निवडून आलेले नगरसेवकांनी ठाकरेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. दोन नगरसेवकांनी सत्तेत सहभागी होत राज ठाकरेंच्या आदेशाला हरताळ फासला. त्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले. आता या चारही नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकला आहे. याबद्दलही राज ठाकरेंनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...