आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक काँग्रेसचं संघटन मजबूत हवं!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल पंपावरच्या जाहिरातीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळा रंग फासल्यानंतर सत्यजित तांबे-पाटील हे आणखी चर्चेत आले आहेत. या कृतीतून युवक काँग्रेसची यापुढची कार्यपद्धती आक्रमक असेल, असा सूचक इशाराच सत्यजित यांनी सत्ताधाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नुकत्याच संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत सत्यजित सर्वाधिक मतांनी विजयी झाले. राज्य युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले आहेत. उपाध्यक्षपदी रिसोडचे आमदार अमित झनक, नागपूरचे कुणाल राऊत या दोघांची निवडणूक झाली. राज्य सरचिटणीस म्हणून आदित्य पाटील आणि मुंबईचे ब्रिजकिशोर दत्त यांची निवड झालीय. एकूण ६० तरुण नेत्यांची टीम सत्यजित यांच्यासोबत आहे. 


काँग्रेस पक्ष देशपातळीवर सध्या कधी नव्हे एवढा अडचणीच्या काळातून प्रवास करतोय. अशा काळात काँग्रेस पक्षाला युवकांची ताकद मिळवायची, वाढवायची तर युवक काँग्रेसचं संघटन मजबूत करावं लागेल. काँग्रेसची संघटना बळकट व्हावी म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यावर त्यांचं सतत लक्ष असतं. महाराष्ट्रातून लोकसभेचे ४८ खासदार निवडून जातात. ४८ ही संख्या खूप मोठी आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार या राज्यांच्या बरोबरीने राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचं स्थान आहे. अशा राज्यात युवक काँग्रेसची ताकद वाढवावी आणि त्याचा फायदा पक्षाला व्हावा, अशी राष्ट्रीय नेत्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. राज्यात काँग्रेस पक्ष वाढवायचा तर नवे, तरुण कार्यकर्ते वाढल्याशिवाय गत्यंतर नाही हे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनाही कळून चुकलेलं आहे. दुसऱ्या पक्षातले लोक आणून पक्ष फुगवायचा हा व्यवहार आतबट्ट्याचा असतो हे नारायण राणे प्रकरणात काँग्रेसने भोगले आहे. तेव्हा स्वतःच्या विचारांचे कार्यकर्ते तयार करणं, ते वाढवणं, त्यांना बळकट करणं यातूनच काँग्रेसचे हात बळकट होतील, हे आता काँग्रेस जनांनी मनोमन स्वीकारलं आहे. 


काँग्रेस हा नेहमी सत्ताधारी पक्ष राहिलेला असल्याने त्याच्या स्वभावात सुस्ती भिनलेली आहे. अशा पक्षाची अचानक सत्ता गेली. सत्ता नसते तेव्हा विरोधी पक्षाची मानसिकता तत्काळ आत्मसात करून आक्रमक व्हावं लागतं. सुस्ती झटकून सक्रिय व्हावं लागतं. गेली साडेचार वर्षे काँग्रेस पक्ष तो प्रयत्न करत आहे. विशेषतः राहुल गांधी यांनी देशपातळीवर काँग्रेसला पुन्हा आक्रमक करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. सुरुवातीला संघ परिवाराने राहुल गांधी यांची टर उडवण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला. पण सत्ताधारी भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारातून पुढे आलेल्या विसंगतीतून राहुल यांनी स्वतःचं नातं जनतेबरोबर अधिक संवादी बनवलं. नोटबंदी, पेट्रोल-डिझेल भाववाढ, रुपयाची घसरण, रफाल प्रकरण या मुद्द्यांवर राहुल यांनी लोकांच्या मनात भाजप, मोदी सरकारबद्दल संशय वाढवण्यात बऱ्यापैकी यश मिळवल्याचं दिसतं. तरी मोदी आणि भाजपची देशावरची पकड ढिली झाली असं नाही. अशा नाजूक काळात महाराष्ट्रात सत्यजित यांच्यावर युवक काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी आली आहे. ही एका अर्थानं मोठी ऐतिहासिक संधी आहे. युवक काँग्रेसची बांधणी करणारे नेते राज्याच्या, देशाच्या राजकारणात दीर्घकाळ टिकून राहतात. काँग्रेसच्या नेतृत्वस्थानी राहतात. काँग्रेसमध्ये प्रियरंजनदास मुन्शी, शरद पवार, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, ममता बॅनर्जी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे नेते युवक काँग्रेसच्या मुशीतूनच तयार झाले. नंतर त्यांनी आपापल्या वेगळ्या वाटा चोखाळल्या. खुद्द संजय गांधी, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाची घडण युवक काँग्रेसमध्येच झाली. सध्या काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणारे रणजित सुरजेवाला, मनीष तिवारी, राजीव सातव, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे यांचं नेतृत्व युवक काँग्रेसमध्येच आकाराला आलं. राहुल गांधी यांनी राजकारणाचे पहिले धडे गिरवले तेही युवक काँग्रेसमध्येच. 


सत्यजित गेले दीड दशक विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेसमध्ये राज्य स्तरावर काम करत आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये आक्रमकपणा बऱ्याचदा नसतो. असा आक्रमकपणा सत्यजित यांच्याजवळ दिसतो. सत्यजित माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. नाशिक पदवीधरांचे अभ्यासू आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे ते चिरंजीव आहेत. सत्यजित यांच्या मातोश्री दुर्गाबाई तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा आहेत. सत्यजित यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम केलंय. २०१४ मध्ये अहमदनगर शहरातून त्यांनी आमदारकीची निवडणूकही लढवली होती. सत्यजित यांचं वैशिष्ट्य असं की त्यांना ग्रामीण भागाचे प्रश्न पक्के माहीत आहेत. शहरांचा विकास हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे. सहकार चळवळ त्यांनी बालपणापासून अनुभवली, जवळून पाहिली आहे. या पार्श्वभूमीमुळे त्यांना स्वतःची बलस्थानं जशी माहिती आहेत तसं युवक काँग्रेस वाढवताना काय आव्हानं आहेत याचीही जाण आहे असं दिसतं. काही दिवसांपूर्वी युवक कार्यकर्त्यांनी आक्रमक झालं पाहिजे, हा मेसेज देण्यासाठी त्यांनी पेट्रोल-डिझेल भाववाढ आणि महागाईचा निषेध करत नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं फासलं. हे आंदोलन प्रतीकात्मक असलं तरी युवक कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणारं ठरू शकेल. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर आले होते. रस्त्यांवर येणाऱ्या या आंदोलकांमध्ये तरुणांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता. हा तरुण वर्ग प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा स्वतंत्र आंदोलन करताना दिसला. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम हे समाज मोठ्या संख्येनं आरक्षण आंदोलनात पुढे आहेत. या आरक्षण आंदोलनातल्या तरुणांना सर्वच राजकीय पक्ष आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न करतील. सत्यजित यांनाही या आरक्षण आंदोलनात जाग्या झालेल्या समाजातील तरुण कार्यकर्त्यांना युवक काँग्रेसशी जोडून घ्यावं लागेल. मराठा, धनगर समाजातले आरक्षण मागणारे हे तरुण कार्यकर्ते सामान्य घरातले आहेत. शेतकरी वर्गातले - ग्रामीण भागातले आहेत. त्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्या, राजकीय सत्तेत प्रतिनिधित्व हवंय. त्यांची ही भूक लक्षात घेऊन युवक काँग्रेसला या नव्या कार्यकर्त्यांशी राजकीय व्यवहार करावा लागेल. 


आरक्षण आंदोलनात जागृत झालेल्या गाव-तालुका-जिल्हा पातळीवरच्या युवक कार्यकर्त्यांच्या मनात प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तीव्र असंतोष आहे. हा असंतोष काही फक्त सत्ताधारी भाजप सरकारविरोधातच नाही, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्काबुक्की झाली होती. आंदोलकांनी त्यांना अक्षरशः पळता भुई थोडी केली होती. आरक्षण आंदोलनातले कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही मंचावर येऊ देत नसत. आंदोलकांचा मूड असा होता की सर्वच पक्षांनी आरक्षण देण्यात, नोकऱ्या देण्यात टंगळमंगळ केली आहे. त्यामुळे आमच्या आजच्या परिस्थितीला सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष जबाबदार आहेत. या असंतोषाशी संवाद कसा साधायचा, या असंतुष्ट तरुण कार्यकर्त्यांना दिलासा देऊन आपल्या पक्षाकडे कसं ओढायचं हे सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांसमोरचं आव्हान आहे. सत्यजित आणि त्यांची टीम या असंतोषाला युवक काँग्रेसच्या मंचावर संघटित करण्यात यशस्वी झाले तर इतिहास घडू शकेल. कारण मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम हे महाराष्ट्रातले प्रमुख समाज आहेत. त्यांची निवडणुकांच्या राजकारणातली उपद्रवाची शक्ती मोठी आहे. काँग्रेस पक्षावर नेहमी प्रस्थापितांचा पक्ष हा शिक्का बसलेला आहे. राहुल गांधी त्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी झटतात. तोच कित्ता सत्यजित महाराष्ट्रात गिरवतील काय, हा खरा प्रश्न आहे. कारण बडे बापके बेट्यांचा पक्ष, नातलगशाही हे आरोप करून भाजप काँग्रेसला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी युवक संघटनेत वंचित गटातले नेते पुढे आणून उत्तर देता येणं शक्य आहे. सत्यजित यांना युवक काँग्रेस घडवण्याची ऐतिहासिक संधी आहे. ते ती दवडणार नक्कीच नाहीत. 


राजा कांदळकर, राजकीय विश्लेषक 
rajak2008@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...