आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव यांच्या अयोध्यावारीमागचं इंगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची एकमेकांशी स्पर्धा आहे, हिंदुत्ववादी मतदार आकर्षित करण्यासाठी ती आहे. आजपर्यंत ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा  शहरी भागात असे. आता शिवसेना अयोध्येत जाऊन ही स्पर्धा अधिक तीव्र करू पाहत आहे. 

 

‘हर हिंदू की यही पुकार 
पहले मंदिर फिर सरकार’ 
ही घोषणा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत दाखल होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांना खुलेआम शाबासक्या दिल्या होत्या, त्यांच्याविषयी अभिमान बाळगला होता. पण ते अयोध्येत रामाला भेटायला कधी गेले नाहीत. एकूणच बाळासाहेब महाराष्ट्राबाहेर फार जात नसत. त्याला सुरक्षेची कारणं दिली जात. बाळासाहेबांचे टीकाकार मात्र म्हणत की, बाळासाहेब बाहेर जायला घाबरतात. मातोश्री सोडत नाहीत. हे काहीही असो, पण बाळासाहेब अयोध्येत गेले नाहीत; पण आता उद्धव जात आहेत. 


दोन दिवस उद्धव, त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत आणि इतर नेते अयोध्येत असतील. तिथं उद्धव ठाकरे साधू, बैरागी आणि गोसाव्यांच्या भेटी घेतील. शरयू नदीच्या किनारी महाआरती करतील आणि राम मंदिर का बांधले नाही म्हणून जनसंवाद सभेत भारतीय जनता पक्षाला जाब विचारतील. 


उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीमागील इंगित काय आहे? आताच त्यांना राम मंदिर का आठवलं? भाजप राम मंदिर बांधायला उशीर करतंय हा साक्षात्कार शिवसेनेला आताच का झालाय? हे समजून घेताना राम मंदिराचा प्रश्न गेली ३० वर्षे भारतीय राजकारणात कसा निवडणुकीच्या आणि व्होट बँकेच्या मतलबाचा मुद्दा आहे हे समजून घ्यावं लागेल. गेल्या ३० वर्षांत केंद्रात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची सरकारं आली होती. वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. या सर्व सरकारांनी राम मंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीच्या जागेचा वाद सुरू आहे . या जागेची मालकी कुणाची? हे न्यायालय सांगेल त्याप्रमाणे या प्रकरणातील सर्वांनी मानायचं असं ठरलेलं आहे आणि आता सुनावणी सुरू आहे. 


पण न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहायची सोडून शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारही खडबडून जागा झाला आहे. राम मंदिर बांधण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तो पास करावा, अशी संघ परिवाराची भूमिका आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना या मुद्द्यावर जोर बैठका काढायला लागल्या आहेत. भाजपतील काही खासदार खुलेआम भाषणं ठोकत आहेत की, नरेंद्र मोदी महान पीएम आणि योगी आदित्यनाथ अतिमहान सीएम, फिर भी टेंट मे भगवान श्रीराम! 
शिवसेना, संघ परिवार आणि भाजप यांनी राम मंदिराचा मुद्दा तापवायला सुरुवात केली त्यामागचं खरं इंगित २०१९च्या लोकसभेच्या निवडणुका हे आहे.

 

आजपर्यंत गेली साडेचार वर्षे संघ परिवार झोपला होता काय? शिवसेना केंद्र आणि राज्यात भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा लाभ चाखत होता, तेव्हा भगवान राम का आठवले नाहीत? असे प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. 


मोदी सरकारचं हे पाचवं आणि शेवटचं वर्ष आहे. या सरकारवर देशभर जनता नाराज होत चालली आहे आणि झपाट्याने जनमत विरोधात जातंय हे मोदी आणि भाजपला कळून चुकलंय. जनमत भाजपच्या विरोधात जातंय हे संघ परिवाराला परवडणार नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे तिन्ही पॉवरबाज नेते म्हणजे आज संघ परिवाराची ओळख आहेत. 
हे तिन्ही नेते असताना जर जनमत विरोधात जात असेल आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसून सत्ता जाणार असेल तर संघ परिवाराच्या तोंडचं पाणी पळणं स्वाभाविक आहे.  

 

मोदी सरकारच्या विरोधात जनमत का जात आहे? रफाल घोटाळा, नोटबंदी, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती, त्यातून वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणं आणि देशभर वाढणारी बेरोजगारीची भयानक समस्या हे प्रश्न मोदी सरकारला सोडवता आलेले नाहीत. काळा पैसा आणू, वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात टाकू ही आश्वासनं लबाडीची आहेत, ही भावना लोकांमध्ये वाढली आहेत. तेव्हा आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना सामोरं कसं जायचं या चिंतेत भाजप आणि संघ परिवार आहे, म्हणूनच गेल्या दसऱ्याला नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या प्रश्नाला संघ मेळाव्यात जाहीर समर्थन दिलं. आणि उद्धव ठाकरे यांनीही मुंबईत शिवाजी पार्कवर ‘चलो अयोध्या’ची हाक दिली.  


भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची एकमेकांशी स्पर्धा आहे, हिंदुत्ववादी मतदार आकर्षित करण्यासाठी ती आहे. आजपर्यंत ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा  शहरी भागात असे. आता शिवसेना अयोध्येत जाऊन ही स्पर्धा अधिक तीव्र करू पाहत आहे. 


शिवसेना हा प्रादेशिक पक्ष, त्याने खरं म्हणजे राज्यातल्या गंभीर प्रश्नांवर राजकारण करावं, पण हा पक्ष आता राम मंदिर प्रश्नात पुढे होऊन देशव्यापी बनण्याच्या नादात प्रादेशिक आत्मा समाप्त करून घेतोय की काय, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागलीय. शिवसेनेची अडचण अशी आहे की, मुंबईत आत्ता त्यांना मराठी आणि परप्रांतीय या मुद्द्यावर मतांची विभागणी करून प्रभावी राजकारण करता येत नाही. सध्या राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी हैराण आहे, पण या प्रश्नावर शिवसेना टोकाचा संघर्ष करू इच्छित नाही, कारण भाजपसोबत सत्तेत बसून त्याची फळं चघळत राहणं शिवसेनेला आवडतं. या शिवसेनेच्या भूमिकेमुळे आपण सत्ताधारी की विरोधी या गोंधळाच्या वातावरणात शिवसेना आमदार आणि सामान्य शिवसैनिक आहेत. ही विसंगती लपवण्यासाठी शिवसेनेने राम मंदिर आणि अयोध्यावारीचा आसरा घेतलेला दिसतोय.  
संघ परिवार २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्द्यावर देशात मतदारांची विभागणी करण्याची खेळी खेळेल असं दिसतंय. त्यात भाजपशी स्पर्धेत आपणही मागे राहायचं नाही, असा शिवसेनेचा इरादा दिसतोय. संघ परिवार आणि शिवसेनेच्या या व्होटबँकेच्या राजकारणाला मतदार किती भुलेल हे येत्या काळात पाहायला मिळेल. 

 

राजा कांदळकर
rajak2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...