आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्ध : वाट लावली मान्साची...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजन खान (प्रख्यात लेखक)


टपरीवाला भारावण्याच्या ओझ्यानं वाकलाच एकदम. जीभ तोतरी झाल्यागत, पण घाईनं सांगू लागला,
‘म्हाराज, त्यो मगाचा दौन्या व्हता ना, तुमी च्या पाजल्याला, तर त्याची मावशी, म्हंजी मावशीची मान्सं, म्हंजी मान्सं म्हंजी नवरा न्हायी काही तिचा, म्हंजी तिला नवराच न्हायी, म्हंजी तिनं पाठवल्याली मान्सं...’ त्याला धड बोलताच येईना. तर मागच्या गर्दीतनं एकदम कुणी तरी खेकसलं त्याच्यावर,
‘ए गप्पय, त्येंचाच चिमित्कार त्येनलाच काय सांगतूस लेका? गप ऱ्हा.’
टपरीवाला तोेंडाला टाळा लावल्यागत गप्प झाला. एक म्हातारी पुढं झाली. पदराचं टोक धरून हात जोडत म्हणाली आपुलकीनं,
‘बाबा, आसं राच्च्याला उघड्यावर कुठं ऱ्हानार? चला आमच्या घरला. न्हाय तर देवळात तरी पडा. हातरुनं-पांघरुनं, जेवायखावाय देतो आमी.’
तो हसला. उलट हात जोडत म्हणाला,
‘मायमावले, तू कुठं हात जोडती मला? मी तुझ्या लेकरावानी. मी न्हायी ऱ्हात कुनाच्या घरी. आपला सगळा असा खुला कारभार. तू आपलं एकच कर, घरात एखांदं तरनं पोरगं आसलं न् तुला परवडत आसलं तर उलिसाक कोरडा टुकडा न् पानी दे पाठवून. हितंच बसून खाईन मी. पानी पिईन. लई वर्सं झाली, चांगलं पानी न्हायी पोटात. जाय आता.’ 
आणि अचानक त्यानं जोडलेले हात सर्वांवर फिरवले न् कळवळून म्हणाला, 
‘जावा मायबाप हो, थंड पडू द्या मला. गर्दी करू नका न् मला बुवामहाराज करू नका.’
तेव्हा एकदम दैना उडाल्यागत सगळे मागं हटले. मनं हालली सर्वांची.
तो थकल्यागत कांबळ्याचं उसं करून, पाठ टेकवून पडला. डोळे वर आभाळाकडं लावले न् काठी उचलून छातीवर घेतली.
नारायणअप्पा हात जोडत कमरेत वाकलाच एकदम. पूर्ण श्रध्देनं त्यानं त्या आडव्या पडलेल्या मूर्तीला नमस्कार केला न् देवाला पाठ न दाखवता मागं हटावं तसा हटला तिथून. निघाला. बाकीचे लोकही निघाले. सगळे जण देवळाच्या दाराशी आले. नारायणअप्पाच्या भोवती जमले. प्रतिक्रियेसाठी त्याचं तोंड न्याहाळू लागले. तर तो खूप आजारी असलेल्या माणसाप्रमाणे कण्हल्यागत आणि हळू आवाजात म्हणाला,
‘माझं तर डोकंच गरगरल्यागत होतंय. अशा देवमाणसांबद्दल खूप गोष्टी ऐकल्यात जन्मल्यापासून, पण प्रत्यक्ष असा माणूसच पाहिला नाही कधी. पण तो कुणी तरी फारच मोठाय हे निश्चित. राहिलाच आपल्या गावात तर कळेलच आपल्याला. पण आपण प्रश्न विचारून उगीच त्यांना त्रास देण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला सावध करतो. कारण नसताना त्यांच्याभोवती घोंगावू नका. प्रकरण चिडलंबिडलं तर द्यायचं फाडकन एखादा शाप. व्हायचं वाटोळं. काय? त्यामुळं उगी पुन्हा पुन्हा त्या माणसाजवळ जाऊ नका. पण ते म्हणेल ती इच्छा पूर्ण करा त्याची. आपण त्यांची सेवा करण्यात कमी पडलो असं व्हायला नको. अशी साक्षात्कारी माणसं जिवंतपणी साक्षात आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळणं हे आपलं भाग्यचंय. आपल्या गावाचं भाग्य फळफळलंय असं समजा. ते आपल्या गावात आलेत हा पवित्र योगंय. काय?’ आणि तो त्या म्हाताऱ्या माउलीकडं वळला, ‘द्वारकाबाई, तुम्हाला त्यांनी सांगितलंय ना, तुकडा पाठव म्हणून, तर नीट ताट तयार करून पारावरच पाठवा त्यांना. जमेल का तुम्हाला? की मी माझ्या घरनं पाठवू ताट?’
‘न्हायी न्हायी, करते ना मी येवस्तेशीर.’ म्हातारी लगबगून म्हणाली.
‘आणि तुमचं ते जळजळीत तिखट काही पाठवू नका नेहमीचं. थोडं वेगळं काही तरी पाठवा. मी येतोच भजनाच्या वेळेस परत देवळात. तेव्हा ठरवू पुढचं.’
मग सगळे पांगले. नारायणअप्पा रोमांचित पोटऱ्यांनी घराची वाट तुडवू लागला. त्याला नीट चालताही येईना. सोवळ्याचंही जणू भान गेलेलं. असा अनुभव त्याला पहिल्यांदा येत होता. त्या माणसाचं गारुड त्याच्या मनावर पडलं होतं.
००००
घरचा सैपाक तयार होता, तरी द्वारकाबाईनं सुनेला पुन्हा चुलीम्होरं बसवून ताज्या भाकरी बडवायला लावल्या. वड्याचं कालवण करायला लावलं नवं. फिकं. मग ताटात भाकरी, कालवणाची वाटी, शेजारी थोडी तोंडी लावायला खुरासणीची चटणी, एक कांदा असं रचलं. वर चांगलं धडुतं झाकलं. ताट आपल्या तरण्या नातवाकडं दिलं. मग स्वत: पाण्याची कळशी, तांब्या घेतला न् दोघं पाराकडं आले.
वर्दळ आता बरीच थांबली होती रस्त्यावरची न् एक्कादुक्का माणूस जातयेत होता. बहुतेक दुकानांची फळकुटंही लागत होती. एखाददुसरी फळी उघडी. गाव शांत होत चाललं होतं.
तो पारावर अजून तसाच पडला होता, पाठ टेकून, एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून त्यांचा घोडा करून. काठी छातीवरच. डोळे उघडेच. गप्प. विचार करत असल्यासारखा.
द्वारकाबाईनं हळुवार हाक दिली,
‘बाबा...’
तर तो धडपडून उठून बसला.
‘जेवान आनलंय.’ तिनं नातवाला ताट पुढं करायला लावलं.
तो हसला. मांडी घातली. कांबळ ओढून जवळ घेतली, बुडाशी. काठी ओढून मांडीखाली घेतली. म्हणाला,
‘तू कशाला आली माई?’
त्यानं ताट घेतलं. पाहिलं. पुन्हा हसला. द्वारकाबाईनं कळशीतांब्या समोर ठेवला.
तो म्हणाला, तिच्या नातवाकडं हात करत,
‘ह्येला थामू दे हितंच. त्याच्याकडं देतो पाठवून ताट. तू जा. जेव. तुझा देव तुझं भलं करील.’
द्वारकाबाई गेली.
त्यानं पोराला सांगितलं, शुध्द भाषेत,
‘ये रे इथं. बस समोर.’
पोरगं बिचकतच पारावर चढलं. घाबरल्या अंतरावर संशयानं पाहिल्यासारखं बसलं.
‘ये, जेव माझ्याबरोबर.’ त्यानं सांगितलं.
पोरगं लाजल्यागत म्हणालं,
‘नाय, जेवलो मी... तुमीच घ्या.’
त्यानं कळशीतनं तांब्यात पाणी ओतून घेतलं. पाराखालीच हात करत उजवा हात धुतला न् भाकरीचा तुकडा मोडून जेवायला सुरुवात केली. सावकाश एकेक घास मोडत, नीट चावत, शांत पण तृप्त चेहऱ्यानं तो जेवत राहिला. घास चावण्याबरोबर त्याचं दाढीमिशांचं जंजाळ मंद हलत राहिलं. देवळावरच्या न् आसपासच्या दिव्यांच्या उजेडात पोरगं घाबरलेल्या तिरक्या नजरेनं त्याला पाहत राहिलं.
निम्मं जेवण सरलं त्याचं. तांब्या उचलून त्यानं पाण्याचा घोट घेतला न् पुढचा घास घेत पोराला विचारलं,
‘काय करतो, कामधंदा?’
‘रानात जातो.’ पोरगं हळवं म्हणालं.
‘शिकला न्हायी?’
‘शिकलो की. धाव्वी. नापास.’
‘रान हाय का मोप?’
‘घराला पुरंल इतकंय?’
‘पानी?’
‘हिरय.’
‘राबत ऱ्हा. कवा ना कवा तुझा देव तुझं भलं करील.’
मग तो पुन्हा मनापासून गप्प जेवत राहिला.
पोरगं काही वेळ घुटमळत राहिलं. मग घुटमळत्या धाडसानंच म्हणालं,
‘बाबा, गाव कंचं तुमचं?’
‘हेच.’ तो हसून म्हणाला.
पोरगं बावचळलं. म्हणालं,
‘आंदी तर कवा बघितलं न्हायी तुमाला.’
‘तुझी नदर नसंल, त्येला मी काय करू?’
‘आज्जी म्हनली, तुमचं नावबी तुमाला सोतालाच म्हाईत न्हायी.’ पोरगं म्हणालं. घरात त्यानं नुकतंच द्वारकाबाईकडून तसं ऐकलेलं. त्यानं घास चावता चावता पुन्हा हसून नुसतीच मान हलवली.
‘आसं कसं हुईल? नाव कसं नसंल मान्साला?’ पोरानं भोळेपणानं विचारलं.
‘का न्हायी व्हनार?’ त्यानं उलट विचारलं.
तर पोरगं जास्तच बावचळलं. शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत म्हणालं,
‘मानूस हाय म्हनल्यावर नाव आस्तंच की मान्साला.’
‘गुरं हायत का तुमची?’ त्यानं विचारलं.
‘हाईत की, एक गईयय न् दोन बैलं.’
‘काय काय नावंयंत त्यान्ला?’
‘गयचं नाव सगुनीय न् बैलांची नावं, एकाचं मास्तऱ्या न् दुसऱ्याचं बिस्तान्या.’ पोरगं अभिमानानं म्हणालं.
‘आरं व्वा, चांगलीयंत की नावं.’ तो जेवताजेवताच डाव्या हातानं मिश्या साफ करत म्हणाला, ‘मला सांग, तुमची बैलं रानात गेल्यावर जवा गावातल्या दुसऱ्या बैलान्ला भेटत असत्याल तवा एकमेकान्ला कंच्या नावानं हाका मारत असत्याल? गावातल्या बाकीच्या बैलान्ला म्हायीत तरी असंल का, तुमच्या बैलांची नावं मास्तऱ्या न् बिस्तान्या हाईत ती? नाव आसलं काय न् नसलं काय, बैलांच्या जगन्यात काय फरक पडतो का? बैलं ती बैलंच. आन मला ह्ये सांग, जगातल्या एका तरी बैलाला कळत आसंल का रे, आपल्याला बैल म्हन्त्यात त्ये? बैलाला बैल कोन म्हन्तो? तर मानूस. सोता बैल सोताला काय म्हनत आसंल? त्याला म्हायीत आसंल का आपल्याला मान्सानं बैल आसं नाव ठिवलंय त्ये? मान्साला ह्येची लई हाऊस, परतेकाला नावं ठिवायची. कुनाला वाघ म्हनंल, कुनाला बकरी म्हनंल, कुनाला हत्ती म्हनंल. तू साधा इच्यार कर, ह्या जनावरान्ला, आपली ही आमकीतमकी नावंयंत ह्ये कळत तरी आसंल का? आपुन जसं वाघाला वाघ म्हन्तो, तसं वाघ मान्साला काय म्हनत आसंल? तर मला बुवा मान्साची कुनालाबी न् कशालाबी नावं ठिवन्याची ही हाऊस काय पटली न्हायी न् मी मपल्या आईबापान्ला सांगितलं की, तुमी जलम द्या मला खरा, पन माझं नाव काय ठिऊ नका बाबा. ह्या नावाच्या भानगडीत काय आपल्याला पडायचं न्हायी.’
पोरगं चक्रावलं. नुसतं बघत राहिलं.
तो पोराची गंमत करायची असल्यागत म्हणाला,
‘समजा तू जंगलात गेला न् म्होरनं वाघ आला तर त्याला कंच्या नावानं पुकारशील?’
पोराला उत्तर सुचेना.
तोच म्हणाला.
‘आसं म्हनशील का वाघाला, हे वाघोबादादा, मला खाऊ नगं बरं का!’
‘आसं कसं हुईल?’ पोरगं गुंगल्यागत म्हणालं, ‘त्ये मुकं जनावरय. त्येला बोलता कुठं येतंय?’
‘हां, जनावराला बोलता येत न्हायी न् मान्साला बोलता येतं, म्हनूनच समदा घोळ झालाय. बोलता येत न्हायी म्हनूनच जनावरं सुखानं जगत्यात आन मान्सं बोलून बोलून दु:खं वढून घेत्यात आंगावर.’ तो गंभीरपणे म्हणाला, ‘बोलता येतं म्हनूनच मानूस कशालाबी कायबी नावं ठिवतो. ह्येला म्हन्तो गरीब, तर त्याला म्हन्तो आमीर. ह्यो नीच तर त्यो उच. ह्यो चांगला तर त्यो वाईट. ह्यो ह्या जातीचा तर त्यो त्या जातीचा. आमी थोर तर तुमी चोर. ह्या बोलन्यानंच समदी वाट लावली मान्साची. मान्साची जात जनावरावानीच मुकी असती ना, तर समदं जग सुखानं नांदलं असतं.’
पोराला काहीच कळेना त्याचं बोलणं. तो हा बाबा वेडसर तर नाही ना असं बघू लागला.
जेवण संपलं त्याचं. त्यानं पाराखाली उष्टा हात धुतला. घटाघटा पाणी रिचवलं पोटात. एक घरघरीत ढेकर दिला. मग पोराला म्हणाला,
‘घिऊन जा ताट. निवांत झोप. लई इच्यार करू नगं. कल्यान हुईल तुजं. कमी इच्यार केल्यानं मानूस सुखानं जगतो. लई इच्यार केल्यानं त्याच्या डोस्क्याचा गोयंदा व्हतो. माझं बोलनं मनावर घिऊ नको. जग आपल्याला जेवढं कमी कळतं ना पोरा, तेवढं सुखानं जगता येतं. जग जास्त कळायला लागलं की अक्कल वाढती न् जास्त झालेली अक्कल याड लावती. न्हायी कळ्ळं ना? नकोच कळू दे. जा आपला घरला.’
पोरानं भांड्यांचा ऐवज उचलला न् घराची वाट धरली. पण त्याचं एक मत पक्कं झालं, बाबा सटाकल्यालाय.
देवळात भजनाची माणसं जमू लागली तेव्हा दूरच्या मशिदीत इशाच्या आजानचा आवाज उमटू लागला. 
क्रमश: 

बातम्या आणखी आहेत...