आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती' दृश्येही कलेच्या दृष्टीने पाहा, त्यात अश्लीलता नाही हे स्पष्ट होईल : राजश्री देशपांडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जगभरातील पर्यटक अजिंठा, वेरूळ अन् खजुराहोतील कलाकृती नजरेत साठवतात. ही चित्रे, शिल्पांकडे सर्वाेत्कृष्ट कलाकृती म्हणूनच पाहिले जाते. वेब सिरीज सेक्रेड गेम्समधील माझी भूमिका तशीच आहे. त्यात न्यूड सीन्स आहेत, पण ती कलेच्या दृष्टीने पाहा. ती अश्लीलता नाही. अशी भूमिका मी ताकदीने केली आणि त्याची स्तुती होतेय ही माझ्यासाठी समाधानाची व अभिमानाची बाब आहे, असे परखड मत अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने व्यक्त केले. औरंगाबादेतील गुजराती शाळेची विद्यार्थिनी असलेल्या राजश्रीने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. बोल्ड किंवा न्यूड सीन करूनही तिच्या प्रतिभेकडे शालीनतेच्या अंगाने पाहिले जाते आहे हे तिच्यातील कलावंताची क्षमता दाखवणारे आहे. सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ती शहरात आली असता 'दिव्य मराठी'शी तिने संवाद साधला. 

 

राजश्री म्हणाली, माझे आईवडील शासकीय नोकरीत होते. लहानपणी ते मला पाहुण्यांसमोर अभिनय, नकला, डान्स करायला लावायचे. त्यातून मिळणाऱ्या आनंदामुळे मी ते करत गेले. औरंगाबादेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील सिम्बायोसिसमध्ये वकिलीचा अभ्यास केला. औरंगाबादेत असताना कमलेश महाजनांच्या नाटकात काम केले. त्यामुळे चांगले काम करू शकतो असा आत्मविश्वास होताच. वास्तविक अभिनय म्हटला की प्रत्येकीला नायिका बनायचे असते. पण सुदैवाने माझे तसे काही नव्हते. आनंद मिळावा, एवढ्यासाठी अभिनय करायचा होता. त्यामुळे नसिरुद्दीन शहांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. वेगवेगळ्या नाटकांतून भूमिका केल्या. माझे काम लोकांना आवडते. आता सामाजिक योगदानासाठी नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.

 

उत्तम कंटेंट असेल तर मी माझे काम एन्जॉय करते 
मंटोच्या निमित्ताने नवाजुद्दीनसारख्या कलावंतांसोबत कामाची संधी मिळाली. माझ्या कामाचे कौतुक होतेय. मी नेहमीच कंटेंटवर काम करत आहे. कंटेंट उत्तम असेल, दिग्दर्शक आणि कलावंत दर्जेदार असेल तर मी ते काम अधिक एन्जॉय करते. 

 

'तो' सीन करताना दबाव नव्हता 
सेक्रेड गेम्स मालिकेत साहित्य उत्तम होते. शिवाय अनुराग कश्यप ते दिग्दर्शित करत होते. 'तो' सीन या संहितेची गरज होती. त्या सीनमुळे कुणीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही, उलट माझ्याकडे सन्मानाने पाहिले जाते यापेक्षा आणखी काय हवे? माझ्या कुटुंबीयांनी तो भाग पाहिला तेव्हा बहिणीला क्षणभर शॉक बसला. आम्ही मध्यमवर्गीय असल्याने हे अपेक्षितच होते. पण नंतर म्हणाली, छान झालंय. तेव्हा मला समाधान वाटले.

 

चित्रपट महोत्सव फायदा घ्या 
उमेदीच्या काळात आम्हाला चित्रपट महोत्सवाची संधी नव्हती. जागतिक सिनेमा पाहण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. आजच्या पिढीला ते सहज उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. तंत्रज्ञान विकसित झाल्याने मोबाइलवरही फिल्म करता येते. वेगळे विषय मांडता येतात. त्यामुळे आताच्या पिढीसाठी जगापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. आता औरंगाबादचाच नव्हे तर फुलंब्रीचा मुलगा किंवा मुलगीही उत्तमपणे चित्रपटातून व्यक्त होऊ शकेल. 

बातम्या आणखी आहेत...