आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक व्हॅलेंटाइन स्वत:साठी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका व्यक्तीवरच्या प्रेमाचा आपल्याला नेहमीच विसर पडतो. ते म्हणजे स्वत:वरचे प्रेम.

वैद्य राजश्री कुलकर्णी

नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाइन डेला अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. पण एका व्यक्तीवरच्या प्रेमाचा आपल्याला नेहमीच विसर पडतो. ते म्हणजे स्वत:वरचे प्रेम. विशेषत: महिलांसाठी गरजेचा हा विशेष लेख....
कुटुंबातील सर्वांचे दुखणे-खुपणे पाहणाऱ्या स्त्रिया आपल्यालाही शरीर आहे आणि त्याचेही आरोग्य जपायचे असते हे विसरून जातात. एक वैद्य म्हणून गेली पंचवीस वर्षे मी हे बघत आले आहे. त्यासाठी आवश्यक आहे, स्वत:वर प्रेम करणे. यासाठी नियमित आणि पोषक आहार, विश्रांती आणि योग्य वेळी उपचार हेच खरे लाल, पिवळे आणि सफेद गुलाब... आधी आपण स्वतः आपल्यावर प्रेम करायला शिकलो तर लोक आपल्यावर प्रेम करतील, आपला आदर ठेवतील आणि मुख्य म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य झळाळून उठेल आणि एका वेगळ्याच आत्मविश्वासाची प्रचिती येईल. आपण आनंदी असू तर आपल्या भोवतालीही आनंद निर्माण करू शकतो. मग आपल्या  आसपासच्या स्त्रियांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा, आपल्या मैत्रिणी, शेजारणी, नातेवाईक यांना यासाठी मदत करा.. बघा हे जग आनंदी आणि सुंदर होईल!पहिले प्रेम नियमित आहार : 


बहुसंख्य स्त्रिया सकाळच्या कामांच्या गर्दीत नाष्टा करणं विसरतात किंवा टाळतात तरी! कधी त्यांना खाण्यासाठी वेळ नसतो तर कधी एकटीसाठी कोण करणार, अशी अनेक कारणं शोधतात. बहुतेक वेळा सकाळच्या एक कप चहावर दुपारी एक-दीड वाजेपर्यंत काहीच खात नाहीत, साधं दूधदेखील प्यायलं जात नाही. कधी दूध आवडत नाही, कधी त्याचा वास आवडत नाही, कधी मुलांपुरतंच असतं म्हणून तर कधी आधीच वजन वाढलंय म्हणून. घरातील सर्वांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून नोकरदार स्त्रिया उपाशीपोटीच कामावर निघून जातात तर गृहिणी दिवसभर काम करीत राहतात. 

दुसरे प्रेम ताजे अन्न :

स्त्रियांबाबतची दुसरी समस्या म्हणजे शिळं अन्न खाण्याची. कधी अंदाज चुकतो तर कधी घरातील सदस्य कमी जेवतात. कारण कोणतंही असो, शिळ्याची धनी तीच. अनेक स्त्रिया हे शिळं अन्न पती किंवा मुलांच्या दृष्टीसही पडू न देता दुपारी त्यावरच जेवण उरकतात. परिणामी डोकेदुखी, छातीत जळजळ, मळमळ, आंबट पाणी ही सारी अॅसिडिटीची लक्षणं. शरीर इशारे देत असतं, पण त्याकडेही स्त्रिया दुर्लक्ष करतात. काहीही न खाता फक्त चहा पिऊन भूक मारतात, दुपारी भूक असो वा नसो, वेळ झाली म्हणून जेवतात, नव्हे पोटात अन्न ढकलतात.

तिसरे प्रेम विश्रांतीची गरज : 
 
घरातील आणि बाहेरील कामे आपल्याला झेपत असो अथवा नसो, ती ओढूनताणून खेचत राहायची, घरकामासाठी मदतनीस नको म्हणून टाळत राहायचं, चार पैसे वाचावेत म्हणून सतत धडपडत राहायचं हा जणू हळूहळू स्वभाव बनत जातो स्त्रीचा! नवरा काम करून, नोकरी करून दमतो, मुलं शाळा-कॉलेजमध्ये बिझी असतात त्यामुळे त्यांच्याकडून मदत मागणं यांना जमत नाही. अगदी आजारपण येईपर्यंत त्या दुर्लक्ष करत राहतात. कंबरदुखी, पाठदुखी, सांधेदुखी या स्त्रियांच्या आरोग्याच्या नेहमीच्या तक्रारी असतात. विशेषतः मासिक पाळीच्या चार दिवसांत अति रक्तस्राव, पोट दुखणं, अंग दुखणं, चिडचिड होणं अशा शारीरिक, मानसिक अनंत अडचणी असतात. शरीर सिग्नल देत असतो, बये थोडी विश्रांती घे!

लेखिकेचा संपर्क : ९८२२५३७६६६

बातम्या आणखी आहेत...