आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन कुकिंग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजश्री पोहेकर -कुलकर्णी

सोशल मीडिया स्वयंपाकघरात पोहोचला आहे. त्यातून अनेक सुगरणी तयार होत आहेत. कितीतरी जणींच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आहे. यात आपले पैसे घालावे लागत नाहीत, हा सगळ्यात मोठा फायदा. आता तर स्मार्टफोनमुळे हे सगळं आणखी सोपं झालंय. अर्थात, त्यामागे मेहनत आहे, हे नाकारता येणार नाही.


इतकी वर्षं नवीन पदार्थ शिकायचा म्हणजे टीव्हीसमोर वही-पेन घेऊन लिहून घ्यायचं किंवा मासिकं, वर्तमानपत्रातील कात्रणं सांभाळून ठेवायची. कधी-कधी पाककलेच्या पुस्तकातून पदार्थ शिकता येऊ लागले, कुकिंग क्लासेस सुरू झाले. पण, सोशल मीडियाने जसं जग जवळ आणलं, तसं स्वयंपाक करणं या पारंपरिक कलेलाही एक व्यापक व्यासपीठ मिळवून दिलं आहे.  या माध्यमानं आता थेट स्वयंपाकघराचाही ताबा घेतला आहे. शिवाय, टीव्ही चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या  टिपिकल पदार्थांची मक्तेदारीही मोडीत काढली आहे. आज गाव-खेड्यातली एखादी गृहिणीही यूट्यूबच्या माध्यमातून तिची पाककला सातासमुद्रापार पोहोचवू शकते. शिवाय, आपल्याला हव्या त्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार पदार्थ बघून बनवता येऊ लागले. यूट्यूब, व्हाॅट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून पदार्थ बनवणं आणि शिकवणं अगदी सोपं आणि मजेशीर झालंय. या सगळ्या जणींची आपली अशी एक शैली आहे. संवादाची शैली, कृतीची, सांगण्याची हातोटी.. ते करताना दिल्या जाणाऱ्या टिप्स प्रेक्षकांना एकदम घरगुती आणि आपल्याशा वाटतात. 

यूट्यूब 


‘यूट्यूब’वर खूप फूड चॅनल्स आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे, अनेक मराठी स्त्रियांची ‘चॅनल्स’ प्रचंड लोकप्रिय आहेत. फक्त भारतीय प्रेक्षकांतच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडेसुद्धा. मुख्य म्हणजे, ही चॅनल्स शुद्ध मराठीत आहेत. त्यामुळे जो सुलभपणा, आपलेपणा निर्माण होतो, तो महत्त्वाचा ठरतो. वाचून अवघड वाटणारा पदार्थ समोर तयार होताना बघून एक आत्मविश्वास येतो, की हे आपल्यालाही सहज जमू शकते.यूट्यूबद्वारे अनेक महिलांनी पदार्थ शिकवण्यासाठी आपली चॅनल्स सुरू केली आहेत, ज्यातून त्यांना उत्पन्न, प्रसिद्धी आणि एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. ‘मधुराज रेसिपी’ हे महाराष्ट्रीय महिलांचं आवडतं चॅनल.सोपे, झटपट आणि फार सामग्री न लागणारे पदार्थ मधुरा बनवते, त्यामुळे तिचं चॅनल बघते, अशी प्रतिक्रिया अनेकींनी व्यक्त केली आहे. यूट्यूबमुळे मधुरा आज एक सेलिब्रिटी झाली आहे, ही समाज माध्यमांची एक सकारात्मक बाजू आहे. याशिवाय अर्चनाज किचन, भावनाज किचन, कविताज किचन, निशा मधुलिका, मंजुलाज किचन हे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात बघितले जाणारे लोकप्रिय चॅनल आहेत.
 

फेसबुक


यूट्यूबप्रमाणेच फेसबुकवरही रुचिरा, खादाड खाऊ, कुकिंग क्वीन, कुकिंग स्टुडिओ, झटपट रेसिपी हे ग्रुप आहेत. देश-विदेशातील अनेक जण या ग्रुप्सचे सदस्य असल्यामुळे विविध खाद्यपदार्थ शिकता येतात. आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या महिलांसाठी असे ग्रुप म्हणजे जणू हक्काचं माहेरघरच आहेत, असं अमेरिकेत राहणाऱ्या ऋतुजा जोशी अगदी भावनिक होऊन सांगतात.

व्हॉट्स अॅप


व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकींंना रोजगार मिळतो आहे.साधारण गृहिणी या माध्यमाद्वारे खाद्यपदार्थ विकून स्वावलंबी बनत आहेत. व्हॉट्सअॅपमुळे व्यवसायात वृद्धी झाली, असं औरंगाबादच्या सरस्वती कोठाळे, सुरेखा पारवेकर, लता पाठक या महिलांनी सांगितलं. सरस्वतीताई परदेशात ५०-६० कुटुंबांना वाळवणाचे पदार्थ बनवून देतात. कतार इथं राहणाऱ्या दीप्ती जोशी आणि त्यांच्या मैत्रिणी त्यांच्याकडून व्हॉट्सअॅपवरून विविध मसाले आणि वाळवणाचे पदार्थ मागवतात. सरस्वतीताई फक्त उन्हाळ्यात ३०-३५ हजार रुपयांच्या पदार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून विकतात. पूर्वी फोनवर ऑर्डर दिल्या जायच्या. प्रत्येकीशी फोनवर बोलण्यात खूप वेळ जायचा. मात्र, आता एकाच वेळी ग्रुपमध्ये सगळ्यांच्या ऑर्डर येतात, त्यामुळे काम सोपं झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. सुगरण ग्रुप चालवणाऱ्या पालघरच्या जागृती नाईक सांगतात, की या ग्रुपमध्ये महाराष्ट्र आणि परदेशातल्या अनेक महिला आहेत.अशा अनेक महिला आहेत, ज्या नेहमी काही ना काही नवीन, सोपे, चवदार असे सादर करतात. वेगवेगळ्या राज्यांतून, देशातून कुठूनही कुणी तरी ते पाहते. करून बघते आणि मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलेल्या कृतीप्रमाणे पदार्थ केला, छान झाला, अशी पावती मिळाली की या सगळ्या भरून पावतात आणि उद्या काय सादर करायचे याच्या तयारीला लागतात. गेट, सेट-कॅमेरा-अ‍ॅक्शन.. तेही घरच्या घरी..!संपर्क- ९४२०४०७४७०

बातम्या आणखी आहेत...