आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajashri Poterkar Kulkarni Writes About Overcoming The Inferiority Of Intelligence

बुद्धिमत्तेची न्यूनत्वावर मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजश्री पोहेकर-कुलकर्णी

काय आहे यापेक्षा काय नाही यावर अधिक विचार करण्याचा मानवी स्वभाव. परिणामी जे मिळालंय त्याचा उपयोग करण्यापेक्षा जे नाही त्यावर विचार करून आपण ताकद खर्ची घालतो. पण परिस्थिती स्वीकारून जे आहे त्यावर लक्ष्य केंद्रित केलं तर आयुष्य ३६० अंशांत बदलू शकतं. शारीरिक न्यूनत्वावर बुद्धिमत्तेनं मात करून समृद्ध आयुष्य जगणाऱ्या डॉ. प्रीतीची ही गोष्ट...तिचं कौतुक म्हणून नाही तर ‘मानसिक दिव्यांगांना’ प्रेरणा मिळावी म्हणून... 


आजच्या दिवशी माझ्या बहिणीचा प्रवास तुमच्यासमोर मांडतेय त्याला खास कारण आहे. सामान्य मूल वाढवताना पालकांची तारांबळ उडते हे अनुभवल्यावर शारीरिक न्यूनत्व असणारं मुल वाढवणं किती अवघड, जबाबदारीचं अन् भावनिक कसोटी पाहणारं असतं याची मी लहानपणापासून साक्षीदार होते. आई-वडिलांनी प्रीतीचा केलेला स्वीकार, आम्हा इतर भावंडांप्रमाणे केलेलं तिचं संगोपन आणि प्रीतीचा आजवरचा प्रवास मी खूप जवळून अनुभवला. त्यामुळेच प्रीतीनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचा विशेष अभिमान वाटतो. 

नऊ महिने ज्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत होतो ते बाळ आईच्या कुशीत येतं. पण हे सुख क्षणिक टिकतं. त्या बाळाच्या एका हाताची पूर्ण वाढ झालेली नसल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येतं. बाळाच्या आई-वडिलांसाठी हा मोठा धक्का असतो. मग सुरू होतात दवाखान्याच्या फेऱ्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या भेटीगाठी. गर्भाशयातच अपुरी वाढ झालेली असल्यानं बाळाच्या त्या व्यंगावर काहीच उपाय नसल्याचं डॉक्टर स्पष्टपणे सांगतात. आई-वडील कोलमडतात, पण देवानं पदरात टाकलेलं दान खंबीरपणे स्वीकारतात. आई-वडिलांच्या स्वभावातला आणि वृत्तीतला हाच गुण घेतं ते मूल आयुष्याची लढाई लढतं. ते मूल म्हणजेच प्रोफेसर डॉ. प्रीती पोहेकर-महाजन. शारीरिक न्यूनत्वाच्या दानावर प्रखर बुद्धिमत्तेच्या वरदानाचा पुरेपूर वापर करत डॉ. प्रीती यांनी एक ‘बेंचमार्क’ निर्माण केलाय.    

पालकांनी दिला आत्मविश्वास : पालकांची खरी कसोटी सुरू होते ती इतरांपेक्षा वेगळं मूल स्वीकारण्यापासून. त्यादृष्टीनं प्रीतीमध्ये स्वत:च्या कमतरतेचा न्यूनगंड निर्माण न होता आत्मविश्वास निर्माण करणं आई-वडिलांसाठी आव्हान होतं. याची त्यांना कल्पना आली ती एका छोट्याशा प्रसंगानं...प्रीती  ७/८ वर्षांची असताना आईने तिला फळीवरचा डबा काढायला सांगितलं. ती म्हणाली, ‘आई, एका हाताने नाही काढता येणार.’ तेव्हा आई म्हणाली, ‘न काढता यायला काय झालं? तुझ्या एकाच हातात देवाने चांगलं दहा हातांचं बळ दिलंय.’ आईचं हे वाक्य प्रीतीच्या बालमनावर कोरलं गेलं. आपला डावा हात छोटा आहे, त्याने आपण काहीच करू शकलो नाही तरी उजव्या हातात खूप शक्ती आहे, आपल्यात कुठलं व्यंग नाहीये तर देवाने आपल्याला विशेष काही तरी दिलं आहे. फक्त ते शोधायचं आहे ही जाणीव तिला वाढत्या वयासोबत होत गेली.    

वक्तृत्व स्पर्धा ते शोधनिबंध :


प्रीतीला कुशाग्र बुद्धिमत्तेचं वरदान होतं. शाळेत ती अव्वल असायची. बुद्धिमत्तेबरोबरच मधुरवाणीनं तिने राज्य, राष्ट्रीय स्तरावरच्या वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. आकाशवाणीवर निवेदक म्हणून अनेक वर्षं काम केलं. शब्दांची संपत्ती, वाणीचा ओघ याचा वापर करत ती वैचारिक, बौद्धिक व्याख्यानं देते.  शारीरिक अक्षमतेवर मात करत ती क्षमता बांधणी, मृदू कौशल्य प्रशिक्षक म्हणूनही काम करते. आज लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या प्रीतीनं अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधून शोधनिबंध सादर केले आहेत.

सुदृढ मनाचा जोडीदार : 


शारीरिक कमतरता असणाऱ्यांच्या बाबतीत लग्न हा काळजीचा विषय असतो. मात्र प्रीतीमधला माणूस समजून घेऊन  तिच्यासाठी सुखी संसाराचं दार उघडलं ते दत्ता महाजन यांनी. त्यांनी प्रीतीशी विवाह केला. आजही ते  घरकामापासून ते तिच्या व्यावसायिक कामात प्रत्येक टप्प्यावर तिला खंबीर साथ देतात. तिला बळ देतात. त्यामुळेच प्रीती  लग्नानंतर पीएचडी करू शकली. शिवाय लोकप्रशासन याविषयाची तिची १० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये तिने शोधनिबंध सादर केले आहेत. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे स्वत:मध्ये कुठलीही कमतरता नसताना दत्ता यांनी प्रीतीचा स्वीकार केला. असा सुदृढ मनाचा साथीदार मिळाल्यामुळेच प्रीती आज एका उंचीवर पोहोचू शकली.  आज प्रीतीच्या मुलानंही आपल्या आईला ती जशी आहे तसं स्वीकारलंय. त्याला आईचा अभिमान वाटतो.काय फरक 


अनेकांना ‘दिव्यांग’ हा शब्द अपंगांची चेष्टा वाटते. पण याकडे सकारात्मकतेने पाहावं असं प्रीतीला वाटतं. दिव्यांगांसाठीच्या सोयींमुळे ती व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात यायला मदतच होते.  फक्त दिव्यांगांनी आपलं शक्तीस्थान नक्की काय आहे हे ओळखून त्या दिशेनं प्रयत्न करावेत. अपंगत्व हे शरीराचं नाही तर मनाचं असतं. तुम्ही मनाने खंबीर रहा. जिद्द, चिकाटी ,दांडगी इच्छाशक्ती बाळगा. यामुळे आकाश सुद्धा कवेत घेता येईल...प्रयत्नांसाठी पाऊल तर उचला असं ती म्हणते...चारचाकीची स्वप्नपूर्ती

सर्वच बाबतीत स्वावलंबी असलेल्या प्रीतीला कुठे जायचं असेल तर मात्र अवलंबून राहावं लागायचं. आपल्याला गाडी चालवता येत नाही ही खंत तिला असायची. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे चारचाकी चालवण्याचं तिचं स्वप्नंही तिनं जिद्दीनं पूर्ण केलं. एका हाताने चारचाकी चालवता येऊ शकते ही माहिती मिळाल्यावर आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि प्रीती एका हाताने चारचाकी चालवू लागली. 
 

लेखिकेचा संपर्क : ९४२०४०७४७०

बातम्या आणखी आहेत...