IPL 12 : राजस्थान रॉयल्स संघाची बंगळुरू चॅलेंजर्सवर मात; कर्णधार विराट कोहलीच्या बंगळुरूचा ठरला सलग चौथा पराभव

वृत्तसंस्था

Apr 03,2019 09:11:00 AM IST

जयपूर - ज्योस बटलरच्या (५९) शानदार अर्धशतकाच्या, श्रेयस गोपालच्या (३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या १२ व्या सत्रात मंगळवारी बंगळुरू चॅलेंजर्सवर सात गड्यांनी मात केली. सामना गाजवणाऱ्या ज्योस बटलर सामनावीर पुरस्कार मिळवला.


प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद १५८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.५ षटकांत ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे २० चेंडूंत ४ चौकारांसह २२ धावा करत परतला. युवा फिरकीपटू यजुवेंद्र चहलने रहाणेला पायचित करत सलामी जोडी फोडली. दुसरा सलामीवीर ज्योस बटलरने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि एक षटकार खेचत ५९ धावांची खेळी केली. रहाणे आणि बटलर जोडीने पहिल्या गड्यासाठी ४६ चेंडूंत ६० धावांची भागीदारी रचली. तिसऱ्या क्रमांकावर अालेल्या स्मिथने ३१ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार लगावत ३८ धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीने २३ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३४ धावा केल्या. बंगळुरूच्या यजुवेंद्र चहलने २ आणि मो. सिराजने १ विकेट घेतली.

सलामीवीर पटेलचे अर्धशतक ठरले व्यर्थ
बंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली २३ आणि डिव्हिलर्स १३ धावा करून परतले. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत दुसरा सलामीवीर पार्थिव पटेलने एकाकी लढत देत अर्धशतक झळकावले. त्याचे अर्धशतक व्यर्थ गेले. त्याने ४१ चेंडूंत ९ चौकार व एक षटकार खेचत ६७ धावा काढल्या. त्याला आर्चरने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले. हेल्टमेयर १ धावेवर बाद झाला. स्टोइनिसने फटकेबाजी करत २८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ३१ करत संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. मोईन अलीने ९ चेंडूंत नाबाद १८ धावा जोडल्या. राजस्थानच्या श्रेयस गोपालने १२ धावांत ३ आणि आर्चरने एक बळी घेतला.

X
COMMENT