Rajasthan: गुर्जरांसह 5 / Rajasthan: गुर्जरांसह 5 जातींना 5% आरक्षण, राजस्थान विधानसभेत ठरावाला बहुमताने मंजुरी

दिव्य मराठी वेब टीम

Feb 13,2019 05:00:00 PM IST

जयपूर - राजस्थानात गुर्जर समाजाच्या आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या ठरावात गुर्जरांसह पाच समुदायांना आरक्षण देण्यात आले. यामध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणात अशा दोन विभागांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यभरात गुर्जर समुदायाचे हिंसक आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बुधवारी सुद्धा सीकर आणि इतर ठिकाणी रस्ते आणि महामार्ग अडवण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिस आंदोलकांमध्ये हिंसाचाराच्या घटना देखील घडल्या.

कोर्टात टिकेल असे आरक्षण हवे - गुर्जर नेते

विधानसभेत कॅबिनेट मंत्री बीडी कल्ला यांनी आरक्षणाचे विधेयक मांडले होते. यामध्ये बंजारा, गाडिया लोहार, गुर्जर, रेबाडी, गुराखी अशा जातींचा उल्लेख आहे. विरोधी पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले, की राज्यघटनेत संशोधनाशिवाय आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढणे कठिण आहे. तत्पूर्वी अनेकवेळा या समाजाने आरक्षणाची मागणी केली. परंतु, कोर्टात यासंदर्भातील याचिका अडकली होती. तर दुसरीकडे, गुर्जर नेते बैंसला यांच्या मते, विधेयकात नेमक्या कोणत्या तरतूदी आहेत, त्याचा अभ्यास केला जाईल. यानंतरच आंदोलनावर अंतिम निर्णय आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यात येईल. कुठल्याही न्यायालयात अडकून पडणार नाही अशा आरक्षणाच्या विधेयक आणि कायद्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे ते पुढे म्हणाले आहेत.

X
COMMENT