आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - सोने घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी राजेंद्र किसनलाल जैनने (३९, रा. समर्थनगर) वामन हरी पेठे ज्वेलर्समधून लंपास केलेल्या ६७ किलो सोन्यापैकी जवळपास ३० किलो सोने सराफा लाइनमधील राजेंद्र सेठिया या सराफा व्यापाऱ्याला विकले. सेठियाने मात्र हे सोने वितळून त्याच्या विटा आणि लगड तयार करत याचा वापर काळ्या बाजारात केला असल्याची माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे.
४ जुलै रोजी वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या समर्थनगर शाखेमध्ये ५८ किलो सोन्याचा २७ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. यात आतापर्यंत ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा. सन्मित्र काॅलनी), राजेंद्र जैन व त्याचा भाचा लोकेश जैन (२१, दोघेही रा. बालाजीनगर ) यांना अटक झाली आहे. अटकेनंतर पहिल्याच दिवशी मणप्पुरम फायनान्समधून पोलिसांनी जैनने तारण ठेवलेले २१ तोळे सोने हस्तगत केले. मंगळवारी आयआयएफएल व मुथूट फायनान्समध्ये ठेवलेले जवळपास एक किलो सोने हस्तगत केले. त्याव्यतिरिक्त त्याने सोने सराफा लाइनमधील जडगाववाला ज्वेलर्सचे मालक सेठियाला विकल्याचे सांगितले. जैनला अटक झाल्यानंतर सेठिया फरार झाला होता. पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली. फायनान्स कंपन्यांप्रमाणे सेठियाकडूनदेखील सोने जप्त होईल, अशी अपेक्षा असताना मात्र सेठियाने सोने वितळवून टाकल्याचे सांगितल्यावर मात्र सर्वांना धक्काच बसला. जैनने उर्वरित सोने कोठे ठेवले आहे, कोणाला विकले आहे, त्याचा पोलिस शोध घेत असून यात आणखी सोने विक्री खरेदी व्यापारी पोलिसांच्या रडारवर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दागिन्यांवर मोनोग्राम असल्याने ते वितळवल्याची दाट शक्यता
जैनने सर्वच सोन्याचे दागिने तारण ठेवत कोट्यवधी रुपये घेतले. ते पैसे त्याने व्याजाने दिले. परंतु जेव्हा तारण ठेवलेल्या कंपन्या जैनच्या मागे लागल्या त्याच दरम्यान त्याची सेठियासोबत भेट झाली. सेठियाला त्याने स्वस्त दरात दागिने देण्याचे आमिष दाखवले. अवघ्या २२ ते २३ हजार प्रति तोळे सोने सेठियाला देऊन टाकले. दागिन्यांवर वामन हरी पेठेचा मोनोग्राम असल्याने ते तसे विकता येणार नव्हते. त्यामुळे सेठियाने ते वितळवून टाकले. त्यातील काही सोन्याचा त्याने काळा बाजार केला. उर्वरित दागिन्यांचे काय झाले, याचा तपास आणखी सुरू आहे.
त्या सराफा व्यापाऱ्याने कंपनीकडून घेतले सोने
जैनने बाजारात आणखी काही व्यापाऱ्यांना सोने विकले आहे का, याची माहिती पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, जैनने फायनान्स कंपनीत सोने तारण ठेवल्यानंतर कंपनीकडून व्याजाची रक्कम परत देण्यासाठी तगादा सुरू झाला. तेव्हा जैनने सेठियाला तारण सोने सोडवून घेण्यास सांगितले. त्याच्या वतीने सेठियाने सोने सोडवून घेत ते वितळवून त्याच्या विटा आणि लगड बनवल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेकॉर्ड तपासणे सुरू : सेठियाने दागिने वितळवल्याने त्याचे नेमके काय केले, हे पोलिस तपासत आहे. त्याच्या दालनातील सर्व सोन्याचे दागिने व रेकॉर्ड व विकलेल्या सोन्याची नोंदणी तपासणे सुरू आहे. त्यात फरक आढळल्यास वितळवलेल्या सोन्याचे नव्याने दागिने करून त्याने ग्राहकांना विकल्याचे समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
साेने चाेरीप्रकरणी जैन, राणे, सेठियाच्या काेठडीत केली वाढ
राजेंद्र जैन आणि अंकुर राणे यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे, तर लोकेश जैनची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सोमवारी (८ जुलै) दिली. अटकेत असलेल्या राजेंद्र जैन, अंकुर राणे, लोकेश जैन यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. मोटे यांनी राजेंद्र जैनला १२ जुलैपर्यंत तर अंकुर राणे याला १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जैन व त्याने विविध नावांनी उघडलेल्या बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी बँकांना पत्र दिले आहे. सेठियाला शुक्रवार, १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.