Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Rajendra Mhaske joins BJP

पंकजांची नवी खेळी : आ. विनायक मेटेंना शह देण्यासाठी राजेंद्र मस्केंना दिली भाजपमध्ये एंट्री

दिनेश लिंबेकर | Update - Apr 13, 2019, 10:29 AM IST

मेटेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा देताच केले ‘चेकमेट’ तर धनंजय मुंडेंकडून मेटेंचे कौतुक

 • Rajendra Mhaske joins BJP

  बीड - बीडमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला असून ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाचे मेटे यांनी शेतकरी पुत्राला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मदतीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला १२ तास होत नाही तोच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी खेळी करत आमदार मेटे यांच्यापासून दुरावलेले युवक नेते राजेंद्र मस्के यांना भाजप प्रवेशाची दारं उघडी केली आहेत. संध्याकाळी अंबाजोगाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मस्के त्यांच्या मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला असून पंकजा यांनी मेटे यांना चेकमेट केले आहे.


  लिंबागणेश जिल्हा परिषद गटातून शिवसंग्रामच्या तिकिटावर जयश्री राजेंद्र मस्के विजयी झाल्या होत्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेची सूत्र शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या घरातून हलवली होती. या वेळी शिवसंग्रामचे चार जिल्हा परिषद सदस्य विजयी झाल्याने झेडपीचे उपाध्यक्षपद आमच्या पक्षाला मिळावे असा दावा शिवसंग्रामने केल्यानंतर उपाध्यक्षपदी जयश्री मस्के यांची वर्णी लागली. यानंतर मस्के यांचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क वाढला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत कोट्यवधींची कामे मस्के यांनी पालकमंत्र्यांकडून मिळवली. १९७२ नंतर बीड- भाळवणी -लिंबागणेश या रस्त्याचे भाग्य उजळण्यासाठी बेलेश्वर येथे उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला. याच कार्यक्रमात मस्के यांच्या कार्यकर्त्यांनी ‘बीड का आमदार कैसा हो राजेंद्र मस्के जैसा हो’, अशा घोषणा आमदार विनायक मेटे यांच्यासमोरच दिल्याने या घोषणा मेटे यांना खटकल्या. पुढे मेटे व मस्के यांच्यात अंतर पडून मस्के यांनी शिवसंग्रामला रामराम ठोकला. भाजपच्या संपर्कातील मस्के यांनी मागील सहा महिन्यांत बीडमध्ये मित्रमंडळाच्या माध्यमातून गोशाळा, चारा छावण्यांवर भर देऊन दुष्काळातील कामे सुरू केली. मस्के यांना भाजपकडून जिल्हाध्यक्षपदाची ऑफरही आली होती . बीड विधानसभा शिवसेनेला सुटली असल्याने आपण भाजपत प्रवेश करायचा की शिवसेनेत हेच मस्केंचे निश्चित होत नव्हते. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री रामदास
  कदम यांनी बीडमध्ये आल्यानंतर मस्के यांच्या घरी चहापान करून राजकीय चर्चाही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लाेकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला आणि दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर पाडव्याची हजेरी लावली. त्यामुळे क्षीरसागर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. राजेंद्र मस्के यांना आता भाजपत प्रवेशाशिवाय पर्याय उरला नव्हता. गुरुवारी आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीला धक्का बसला. मेटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहणार असल्याने आता मराठा समाजाची मते फुटणार हा धोका ओळखून मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भात्यातील बाण म्हणजे मराठा कार्ड असलेल्या राजेंद्र मस्के यांना भाजपत प्रवेश देऊन मेटे यांना शह देण्याची नवी खेळी केली आहे. अंबाजोगाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राजेंद्र मस्के यांनी भाजपत प्रवेश केला.

  मस्केंचे पुनर्वसन करावे लागणार
  भाजपत प्रवेश करणारे राजेंद्र मस्के यांचा बीड विधानसभा मतदार संघात दांडगा संपर्क आहे. ते भाजपत प्रवेश करत असले तरी त्यांना दिलेला शब्द मंत्री पंकजा मुंडे यांना पाळावा लागणार आहे. मस्के यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची तर संधी द्यावीच लागणार आहे. परंतु बीडच्या जागेवर जर भाजपने दावा केला तर मस्के यांना उमेदवारी द्यावा लागणार आहे. आगामी विधानसभेच्या वेळी भाजपकडून राजेंद्र मस्के यांना उमेदवारी द्यायची की शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हा नवा पेच निर्माण होऊ शकतो.

  धनंजय मुंडेंकडून मेटेंचे कौतुक
  शेतकरी पुत्राला पाठिंबा देत असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी काल जाहीर करताच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आमदार मेटे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. परिवर्तनाच्या या चळवळीत एक एक जोडला जाईल. या मैफलीचा कारवा होईल, अशी खात्री असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे.

Trending