आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajendra Sonavane Article About Humanity, Divyamarathi

माणूसपण जिवंत आहे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुस-याविषयी कणव, दातृत्व हे गुण अंगभूतच असतात. कुटुंबातूनच हे संस्कार येत असतात. तसेच असे गुण असणेच उपयोगाचे नाही, तर समाजातील गरजू लोकांसाठी त्याचा वापर करणेही आवश्यक असते. सध्याची धकाधकीची स्थिती बघितली, तर माणूस स्वत:तच हरवला आहे. दुस-यांच्या दु:खाकडे पाहण्यास त्याला वेळ नाही. त्यामुळे समाजात तुटलेपणाची भावना बळावते आहे. अशा वेळी दुस-यासाठी धावून जाणा-यांचे मोल वाढते. समाजात आजूबाजूला नजर टाकली, तर आजही दुस-याची कणव असणा-या व्यक्ती भेटतात. काही दिवसांपूर्वी अकोल्याच्या रामदास पेठेत असलेल्या अकोला नेत्र रुग्णालयात बसलो होतो.

ग्रामीण भागातील वृद्ध महिला डोळे तपासणीसाठी आली होती; परंतु नेत्र तपासणीसाठी लागणारे शुल्क तिच्याजवळ नव्हते. रिसेप्शन काउंटरवर तिने चौकशी केली, तेव्हा तिच्याजवळ असलेल्या आणि आवश्यक पैशांमध्ये फरक जाणवत होता. बाहेरगावाहून आलेली, सोबत कोणी नाही. वेळेवर पैसे कोण देणार? तसेच शहरातील शिक्षितपणा पाहिला की, खेड्यातून आलेल्या व्यक्ती तशाच दबून जातात. रुग्णालयात त्या वेळी बरेच जण बसून होते. त्यातील एका सहृदयी व्यक्तीला त्या वृद्धेची अडचण समजली. तो उठून उभा राहिला. स्वत:जवळचे पैसे त्याने काउंटरवर दिले. पैसे घ्या, आणि त्या म्हातारीचे डोळे तपासा, असे सांगून त्याने व्यवहार पूर्ण करून दिला. परिस्थिती माणसाला अगतिक करत असली, तरी स्वाभिमान असतोच, नाही? त्या वृद्धेच्या चेह-यावरील भाव तिची मन:स्थिती दाखवत होते; परंतु नाइलाज होता. ती क्षणभर स्तब्ध उभी राहिली. आणि तिच्या चंचीत असलेले पैसे त्या व्यक्तीला देऊ लागली. भाऊ, माझ्याजवळ पूर्ण पैसे नाहीत. जे आहेत, ते तुम्ही ठेवून घ्या; परंतु त्या व्यक्तीने ते नाकारले. आजीबाई, पैसे राहू द्या. तुमचे डोळे तपासणे महत्त्वाचे आहे. पाच-पन्नास रुपयांसाठी डोळे तपासणी राहू देऊ नका, असे सांगत ती व्यक्ती रुग्णालयातील आपले काम आटोपून चालती झाली.