आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रवाढीची उदाहरणं लोकसंख्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थॉमस माल्थस नावाच्या विचारवंताने १७९८मध्ये एक प्रबंध प्रसिद्ध केला. त्याचे पडसाद त्याच्या काळात तर उमटलेच, पण आजही त्याचे विचार महत्त्वाचे मानले जातात. त्याच्या विचारांमुळे अख्ख्या जगाचा लोकसंख्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बदलला म्हणण्यापेक्षा निर्माण झाला. कारण तोपर्यंत सर्वात प्रगत इंग्लंडमध्येही लोकसंख्येची मोजणी होत नव्हती. त्याच्या विचारांतूनच डार्विनने प्रेरणा घेऊन आपल्या उत्क्रांतीवादाचा पाया रोवला. इतकं महत्त्वाचं त्याने काय म्हटलं होतं?


थॉमस माल्थस यानं लेखन केलं तेव्हा, म्हणजे अठराव्या शतकाच्या शेवटाच्या सुमाराला, सगळं जग सर्वसाधारणपणे सारखंच जगत होतं. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली असली तरी तिचा परिणाम फारसा दिसत नव्हता. सरंजामशाही, जमीनदारी सर्वच जगभर पसरली होती. गुलामगिरी सर्रास चालू होती. मूठभर श्रीमंतांकडे जमिनीची मालकी एकवटलेली, आणि नव्वदहून अधिक टक्के जनता दारिद्र्यात, हे चित्र जगभर होतं. दुष्काळ, महामाऱ्या, युद्धं यांतून तळागाळातले भरडून निघत होते. अशा परिस्थितीत सरकारांनी गरीबांसाठी काही ना काही करावं अशी अपेक्षा निर्माण होत होती. माल्थसने या परिस्थितीचा अभ्यास करून हा शोधनिबंध तयार केला. त्याचं थोडक्यात उत्तर असं होतं. ‘आपण कितीही प्रयत्न केले तरी ही परिस्थिती सुधारणं शक्य नाही. गरीबांना जितकी मदत करण्याचा प्रयत्न करू, तितकी त्यांची संख्या वाढणार, आणि शेवटी प्रयत्न अपुरेच पडणार.’
या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्याने आधार घेतला होता तो चक्रवाढीचा आणि सरळवाढीचा. त्याची दोन गृहितकं होती.
१. उत्पादन - मुख्यतः अन्नाचं उत्पादन - हे फार तर सरळवाढीने वाढू शकतं.
२. लोकसंख्या ही चक्रवाढीने वाढते.
म्हणजे समजा आज दोनशे लोकांना पुरेल इतकं अन्नाचं उत्पादन आहे. आणि ते दरवर्षी दहा अतिरिक्त लोकांना सामावून घेईल इतक्या प्रमाणात वाढतं आहे. लोकसंख्या समजा शंभरच आहे. याचा अर्थ आत्ता प्रचंड सुबत्ता आहे. त्यामुळे ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढू शकेल. पण जर अन्नाचं उत्पादन सरळ रेषेत वाढलं, आणि लोकसंख्या चक्रवाढीने वाढली तर एक वेळ अशी येईल, की लोकसंख्या वेगाने वाढत जाईल, पण अन्नोत्पादनाचा दर पुरेशा वेगाने वाढणार नाही. आपल्या उदाहरणात केवळ वीस वर्षांत अन्नाचं उत्पादन चारशे लोकांसाठी पुरेसं होईल. मात्र लोकसंख्या ६७२ होईल. तेव्हा लोक जास्त, अन्न कमी यातून अन्नासाठी लढा होणं टळणार नाही. आणि त्यातले काही यशस्वी ठरतील, काही मरतील.
सरळवाढ आणि चक्रवाढ यात सुरुवात कशीही होवो, सरळवाढीचा दर कितीही का जास्त असो, चक्रवाढीचा दर कितीहा का कमी असो; एक वेळ अशी येते की, चक्रवाढ ही सरळवाढीला मागे टाकते. माल्थसचे विचार आता काहीसे मागे पडलेले असले तरी त्याने मांडलेलं हे तत्त्व अजूनही उपयुक्त आहे. एक पालक म्हणून तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे आणि मुलांना शिकवलं पाहिजे. कारण मनुष्यांच्या विचारशक्तीत सरळवाढ सहज समजून घेण्याची क्षमता असते. एका वस्तूची किंमत १० रुपये असेल तर १० वस्तूंची किंमत १०० रुपये हे आपल्याला सहज कळतं. कारण ही सरळवाढ आहे, एकरेषीय (लिनिअर) नातं आहे. मात्र चक्रवाढीने जर काही वाढत असेल तर सुरुवातीला जरी मामुली वाढ होत असेल तरीही काही वर्षांनी दुप्पट, आणि तितक्याच वर्षांनी पुन्हा दुप्पट होण्याची तिच्यात क्षमता आहे.
१९६५ सालच्या सुमाराला भारताची लोकसंख्या होती ५० कोटी. पण ती दरवर्षी सुमारे दोन टक्क्यांनी वाढत होती. हाच दर कायम राहिला तर ती दर ३५ वर्षांनी दुप्पट झाली असती. मुलांबरोबर गणित करण्यासाठी हे आकडे वापरून पाहा. दर पस्तीस वर्षांनी म्हणजे २०००, २०३५, २०७०, २१०५ सालपर्यंतच्या लोकसंख्या काढून पाहा. २१०५ साली ती ८०० कोटी होईल. (सध्या जगाची लोकसंख्या ७३० कोटी आहे) २२१० सालपर्यंत ६४०० कोटी - म्हणजे आजच्या अख्या जगाच्या लोकसंख्येच्या नऊपट, तीही फक्त भारतात! आजची भारताची लोकसंख्या सुमारे सव्वाशे कोटी आहे. ही काही कमी नाही. पण भारतात पन्नासपट लोक झाले तर काय परिस्थिती होईल, याबद्दल तुमच्या मुलांशी चर्चा करून पाहा.
अर्थातच ही भीती अनाठायी आहे कारण आता लोकसंख्यावाढीचा दर दोन टक्क्यांवरून एक टक्क्यापर्यंत घटलेला आहे, आणि नजीकच्या भविष्यकाळात तो शून्य टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०५०च्या आसपास लोकसंख्या स्थिरावेल आणि त्यानंतर घटेलच अशी अपेक्षा आहे. त्यासाठी काही वेगळी कारणं आहेत. पण मुळात हे सगळं समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला चक्रवाढीच्या शक्तीची ओळख करून घ्यावी लागते. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या चक्रवाढ व्याजांच्या गणितांतून ही जाण मुलांपर्यंत पोचत नाही. ती पालकांनीच करून द्यावी लागते. ‘दहा टक्के वाढ होत असेल तर सात वर्षांत दुप्पट’ गुंतवणुकीच्या संधी असू शकतात. भविष्यातलं आर्थिक नियोजन करण्यासाठी तुमच्या मुलांना चक्रवाढीची नुसती गणितं शिकून उपयोग नाही, तर चक्रवाढीचे परिणाम समजून घेणं आवश्यक आहे.

 

बातम्या आणखी आहेत...