Home | Magazine | Madhurima | Rajesh Ghaskadvi writes about helium balloons

हिलियमचा फुगा आणि हवेचं वजन

राजेश घासकडवी | Update - Aug 07, 2018, 07:04 AM IST

हिलियमचा फुगा वर का जातो? हलक्या गोष्टी तरंगतात आणि जड वस्तू का बुडतात? हिलियम हवेपेक्षा हलका असतो,

 • Rajesh Ghaskadvi writes about helium balloons

  हिलियमचा फुगा वर का जातो? हलक्या गोष्टी तरंगतात आणि जड वस्तू का बुडतात? हिलियम हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे तो हवेच्या वर तरंगण्याचा प्रयत्न करतो. पण वर म्हणजे नक्की किती वर जाईल? तो अवकाशात जाऊन पोहोचेल का?


  मला लहानपणी हिलियम भरलेल्या फुग्यांचं खूप आकर्षण होतं. हे फुगे आपोआप तरंगतात. सोडून दिले तर वर जातात. खाली दाबून धरण्यासाठी तुम्हाला अगदी लहानसा का होईना, पण जोर लावावा लागतो. हे सगळं जादूने भरल्यासारखं वाटायचं. कधी चुकून तो फुगा सुटला आणि आकाशात निघून गेला तर मी शेवटपर्यंत बघत राहायचो.


  हिलियमचा फुगा वर का जातो? हलक्या गोष्टी तरंगतात आणि जड वस्तू बुडतात हे सामान्यज्ञान झालं. त्यावरून आपण म्हणतो की, हिलियम हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे तो हवेच्या वर तरंगण्याचा प्रयत्न करतो. पण वर म्हणजे नक्की किती वर जाईल? तो अवकाशात जाऊन पोहोचेल का? जसजसा वर जातो तसतशी हवा विरळ होत जाते आणि त्यामुळे ‘हलकी' होत जाते. जेव्हा त्या फुग्याचं हलकेपण आणि हवेचं हलकेपण सारखंच होतं त्या उंचीला तो थांबतो. आणि काही काळाने अर्थात त्यातला हिलियम निघून जाऊन तो खाली खाली येतो. पण हलक्या वस्तू वर आणि जड वस्तू खाली का जातात? याचं कारण म्हणजे प्रत्येक पदार्थ दुसऱ्या द्रव पदार्थात टाकला की, आपल्या वजनाइतका द्रव विस्थापित करतो. १०० ग्रॅम वजनाचं लाकूड जर पाण्यावर टाकलं तर ते इतकंच बुडेल की, त्यामुळे १०० ग्रॅम पाणी बाजूला सारलं जाईल. मात्र लाकडाची घनता कमी असल्यामुळे त्याचा आकार त्या विस्थापित झालेल्या पाण्यापेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे लाकडाचा बराच भाग पाण्याबाहेर राहील. याउलट १०० ग्रॅम वजनाचा लोखंडी गोळा टाकला, तर तो जे पाणी विस्थापित करेल त्याचा आकार खूपच जास्त असतो. त्यामुळे तो बुडतो आणि बुडत राहातो. आता कल्पना करा की, तुमच्याकडे एक साधारण हवेने भरलेला फुगा आहे आणि तो तुम्ही हिलियमने भरलेल्या खोलीत टाकलात. प्रयोगासाठी समजू की, फुग्यातल्या रबराचं वजन नगण्य आहे. आता हिलियमपेक्षा हवेची घनता जास्त असल्यामुळे लोखंडी गोळ्याप्रमाणेच हवेचा फुगा बुडेल आणि खाली येईल. आता असं समजा की, तुम्ही असे शेकडो फुगे टाकले, तर तुम्हाला काय दिसेल? हवा खाली जाते आणि हिलियम वरती जातो. आपण जेव्हा हिलियमचा फुगा हवेत सोडतो, तेव्हा खरं तर हवा त्या फुग्याच्या बाजूने खाली बुडते. आपण कार्टून्समध्ये अनेक वेळा बघतो - कोणी तरी वीसेक हिलियमचे फुगे घेतं आणि आकाशात तरंगतं. आपल्याला ही अतिशयोक्ती आहे हे कळतं. पण पुरेसे फुगे घेतले तर आपण वर खेचले जाऊ हेही माहीत असतं. तुमच्या मुलांना हा प्रश्न विचारा - "किती फुगे घेतले तर आपण वर खेचले जाऊ?" ते शोधण्यासाठी एक प्रयोग करून बघा.


  जितके जमतील तितके हिलियमचे फुगे घ्या. प्रयोगासाठी एकदेखील पुरेल. त्याला हलक्या प्लास्टिकचा साधारण दोन इंचभर लांबी-रुंदीचा तुकडा तराजूच्या पारड्यासारखा जोडा. ते पारडं रिकामं असेल तेव्हा अर्थातच फुगा वर जाईल. त्यात जितकं वजन घालाल तितका तो कमी वेगाने वर जाईल आणि एक वेळ अशी येईल की फुगा आहे तिथेच राहील, जमिनीपासून किंचितच वर येईल. त्या पारड्यात तुम्हाला अगदी हलकं घालून वजन वाढवत न्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ड्रॉपरने त्यात पाणी घालता येईल. जर मुलांच्या औषधाचा डोस मोजण्याचा ड्रॉपर असेल तर त्यावर किती मिलिलिटर हे लिहिलेलं असतं. एक मिलिलिटर पाणी म्हणजे एक ग्रॅम. किंवा इतर दुसरी युक्ती म्हणजे त्यात खिचडीसाठी घेतो ती मुगाची डाळ घाला. १०० डाळीचे दाणे म्हणजे साधारण एक ग्रॅम. (हे मी मोजलेलं आहे) फुगा हवेत थांबवण्यासाठी जितकं वजन तुम्हाला घालावं लागतं तितकी त्या फुग्याची उचलण्याची शक्ती. तुमच्या मुलाच्या वजनावरून त्याला उचलायला किती फुगे लागतील हे शोधून काढता येईल. आणि हे करताना तुम्ही हवेचं वजन मोजलेलं आहे! त्या फुग्याच्या आकाराच्या हवेचं वजन = तुम्ही घातलेलं वजन + हिलियमचं वजन + रबरी फुग्याचं वजन. यात हिलियमचं वजन + फुग्याचं वजन साधारण एक ग्रॅम धरू शकता. पण इतक्या साध्या प्रयोगातून हवेला वजन असतं आणि ते आपल्याला मोजता येतं हे मुलांना सहज शिकवता येतं.


  - राजेश घासकडवी, न्यूयाॅर्क
  ghaski@gmail.com

Trending