आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नातीनं घडवली विमानाची सफर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 राजेश राऊत

परदेशात जाणे आता तशी नावीन्याची गोष्ट राहिलेली नाही. पण बीड जिल्ह्यातील कडा गावच्या सोनाबाई खंदारे यांचा दुबई, ओमान हा  परदेश प्रवास मात्र नावीन्याचा होता. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पायलट असलेल्या नातीने त्यांना ही सफर घडवून आणली होती.
 
सोनाबाई खंदारे या बीडमधल्या कडा गावच्या रहिवासी. त्यांची मुलगी आशा हिला त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण दिलं. नंतर प्रा. भगवान इंगळे यांचं स्थळ चालून आल्यानं आशा खंदारे या आशा इंगळे झाल्या. सोनाबाई स्वत: शिकलेल्या नसल्या तरी मुलगी आशा हिला त्यांनी मुद्दाम सुशिक्षित घर आणि शिकलेली माणसं पाहून लग्न लावून दिलं. कालांतरानं आशा या मुंबईत स्थायिक झाल्या. पती भगवान यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्वत:चं उरलेलं शिक्षण पूर्ण केलं. आज आशा या सुद्धा मुंबईत प्राध्यापक आहेत. आईनं अर्थात सोनाबाईंनी दिलेला  शिक्षणाचा आशा यांनी आपल्या निखिल आणि नीलम या दोन मुलांपर्यंत पोहोचवला. उच्च शिक्षण घेऊन आशा यांची मुलगी नीलम आज वैमानिक झाली आहे. 

आपल्या आजी आणि आईनं ज्या हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले याची नीलमला कल्पना आहे. किंबहुना आपण आज जे पायलटसारखं करिअर निवडू शकलो, त्यात यशस्वी होऊ शकलो ते आई आणि आजीमुळेच याची नीलमला जाणीव आहे. या जाणिवेपोटीच नीलम यांनी आजीला काहीतरी सरप्राइज देण्याचं निश्चित केलं. नीलमनं आपल्या कष्टकरी वर्गातल्या आजीला विमान प्रवास घडवून आणण्याचं ठरवलं. वास्तविक नीलमच्या पायलट असलेल्याच भावानं म्हणजे  निखिलनं आजीला विमानाच्या माध्यमातून काशीयात्रा घडवली होती. मात्र नीलमनं आजीला सातासमुद्रापारची सफर घडवून आणली. नीलमनं सोनाबाईंना दुबई, ओमान, शारजा असा परदेश प्रवास घडवला. सोनाबाईंच्या सोबतीला मुलगी आशा यासुद्धा होत्या. पायलट होण्याच्या आपल्या यशात खेड्यात राहणाऱ्या आजीचा वाटा आहे हे लक्षात घेऊन नीलमनं ती स्वत: चालवत असलेल्या विमानातूनच सोनाबाईंना प्रवास घडवला. नऊवारी साडीतील सोनाबाईंचे एअर इंडियातील नीलमच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले. शिवाय मुंबई विमानतळ ते संपूर्ण परदेश प्रवासात अनेक देशी-विदेशी पर्यटक , तेथील रहिवासी यांनीही कौतुक केले. सोनाबाईंसोबत फोटोही काढले. 

दुबईतील बुर्ज खलिफा, गोल्डन सुकसारखा भव्य बाजार यासह अनेक स्थळांना या आई-मुलगी-नात यांनी भेटी दिल्या. आपली मुलगी शिकली. तिनेही तिच्या मुलीला शिकवून पायलट बनवले. त्यामुळे मला ही केवळ फोटोत दिसणारं जग प्रत्यक्षात जाऊन पाहता आलं हे सांगताना सोनाबाईंच्या चेहऱ्यावर पायलट नातीचे कौतुक ओसंडून वाहत होते. समुद्रावरून जाणारे विमान आणि वर निळेभोर आकाश पाहून जणू आपण हवेतून पंख पसरून उडतो आहोत, असा भास झाल्याची भावना सोनाबाई व्यक्त करतात.  
 

लेखकाचा संपर्क : ९४२१३४९०९०

बातम्या आणखी आहेत...