आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसखोरी थांबवली नाही तर पाकला जशास तसे उत्तर: राजनाथ सिंह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लडाख: श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिनचेल पुलाचे उद्घाटन राजनाथ यांनी केले. - Divya Marathi
लडाख: श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिनचेल पुलाचे उद्घाटन राजनाथ यांनी केले.

लडाख - भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. भारतातील घुसखोरी न थांबवल्यास पाकिस्तानविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्व लडाखमध्ये श्योक नदीवर बनवण्यात आलेल्या कर्नल चेवांग रिनचेल पुलाचे उद्घाटन करताना राजनाथ यांनी हे वक्तव्य केले. 

राजनाथ सिंग म्हणाले की, कलम ३७० आणि ३५ अ मधील अनेक तरतुदी रद्द केल्यानंतर लडाख क्षेत्रात, फक्त मित्र तयार होतील. शत्रूंसाठी स्थान उरणार नाही. पुढे ते म्हणाले, आमच्या सैन्याने पाकिस्तानवर कधीही हल्ला केला नाही, आम्ही कधीच पहिला वार केला नाही. परंतु पाकने नेहमीच दहशतवादाला पाठब‌‌ळ देऊन भारताची अखंडता तोडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्याने त्यांना नेहमी कठोर उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकनंतर, नियंत्रण रेषा न ओलांडता पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या कारवाईत भारतीय सैन्याने पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे चार तळ नष्ट केले. या कारवाईत २० पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी ठार झाले.
 

सियाचीन पर्यटन व पर्यटकांसाठी खुले
लडाखमधील श्योक नदीवरील रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. या वेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत उपस्थित होते. या पुलामुळे चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेसोबत (एलएसी) जोडलेल्या दौलत बेग ओल्डी सेक्टरपर्यंतचा मार्ग सोपा होईल. राजनाथ एका ट्वीटमध्ये म्हणाले की, “लडाखमध्ये पर्यटनाची अपार क्षमता आहे, लडाखमध्ये चांगल्या वाहतूक सेवेमुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये निश्चितच वाढ होईल. सियाचीन प्रदेश आता पर्यटन आणि पर्यटकांसाठी खुला झाला आहे. सियाचीन बेस कॅम्पपासून ते कुमार चौकीपर्यंतचा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबरपासून लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येईल.