आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यास, वाल्मीकी हेही दलितच, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या विजयी संकल्प सभेत राजनाथसिंहांचे व्यक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  : हनुमान हे दलित होते, अशी मुक्ताफळे उधळून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाद सुरू केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेसुद्धा त्यांच्याच वाटेवरून निघाले आहेत. रामायण व महाभारताचे रचनाकार महर्षी वाल्मीकी व व्यास हेही दलित समाजातूनच आले होते, असे वादग्रस्त वक्तव्य राजनाथ सिंह यांनी नागपुरात आयोजित भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या विजयी संकल्प सभेत केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनुसूचित जाती महामोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर आदींची उपस्थिती होती.   


सिंह म्हणाले, या देशात दलितांचा नेहमीच सन्मान करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले ते त्यांच्या गुणवत्तेमुळे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री होण्याचा मान जोगेंद्रनाथ मंडल या दलितालाच मिळाला होता. भाजपने नेहमीच दलितांचा आदर केला आहे. मात्र काँग्रेससह इतर विरोधी पक्ष मागास समाजात भाजपबद्दल गैरसमज पसरवत आहेत.  काँग्रेसला गेल्या ५५ वर्षांत जमले नाही ते मोदींनी अवघ्या ५५ महिन्यांत केले. या साडेचार वर्षांच्या काळात खऱ्या अर्थाने गोरगरीब व दलित, पीडितांचा विकास झाला. काँग्रेस केवळ खोटे ठोकून देत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास झाला. याच वेगाने विकास सुरू राहिल्यास २०३० मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे ते म्हणाले. 

 

काँग्रेसनेच संविधानाची मोडतोड केली : गडकरी  
मोदी आणि भाजपला घाबरणारे विरोधक मागास समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत भाजपला खलनायक ठरवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आणीबाणीत काँग्रेसने ८० वेळा संविधानाची मोडतोड केली, परंतु भाजपने नेहमी संविधानाचा आदर केला, असे गडकरी म्हणाले.  

 

गडकरींविरोधात वेगळ्या विदर्भाची पत्रके फेकली   
नितीन गडकरी भाषणासाठी उभे राहताच चार िवदर्भवादी युवकांनी ‘वेगळा िवदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत काही पत्रके पत्रकार कक्षात फेकली. २०१४ पूर्वी गडकरी विदर्भाचे समर्थक होते, परंतु आता ते वेगळी भाषा बोलत आहेत, अशा आशयाचा मजकूर या पत्रकात होता. पोलिसांनी त्यांना लगेच पकडून बाहेर काढले. 

 

काँग्रेसचा इंदू मिलची जागा हडपण्याचा डाव होता : मुख्यमंत्र्यांचा आरोप
काँग्रेसने अनुसूचित जातींचा मतपेढी म्हणूनच वापर केला. त्यामुळे काँग्रेसच्या राजवटीत अनुसूचित जातींचा विकास होऊ शकला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा प्रस्ताव आला, त्या वेळी केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ती जागा हडपण्याचा काँग्रेसचा डाव होता, असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.  संविधान बदलण्याचे आरोप काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर होत आहेत. संविधानाचा मूळ आराखडा असा आहे की, तो कोणीच बदलू शकत नाही. संविधानाचे रक्षण ही भाजपची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...