Home | National | Rajasthan | Rajsthan election : narendra modi and rahul gandhi Literal war

पलटवार 'भारतमाता की जय' म्हणण्याच्या मुद्द्यावर राजस्थानमध्ये नरेंद्र मोदी- राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध

प्रतिनिधी | Update - Dec 06, 2018, 11:09 AM IST

पीएमनी 'नीरव-मेहुल-ललित मोदी यांचा विजय असो' असे म्हणावे : राहुल

 • Rajsthan election : narendra modi and rahul gandhi Literal war

  अलवर| काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अलवरच्या मालाखेडात प्रचार सभा घेतली. ते म्हणाले, " पंतप्रधान प्रत्येक भाषणात 'भारतमाता की जय' म्हणतात, पण काम नीरव मोदीसाठी करतात. खरे तर मोदींनी 'नीरव मोदीचा, ललित मोदीचा आणि मेहुल चोकसीचा विजय असो' असे म्हणायला हवे. मोदींनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मग युवक आत्महत्या का करत आहेत? २०१४ मध्ये मोदी पीएम झाले. येथे हजारो युवक उभे आहेत. प्रत्येकाला रोजगार देऊ, असे मोदींनी तुम्हाला सांिगतले होते. देशातील २ कोटी युवकांना रोजगार मिळाला का? असे मला त्यांना विचारायचे आहे. जर नसेल तर मग पीएमनी तुम्हाला फसवले नाही का?"

  मोदींना युवकांचे दु:ख कळत नाही
  हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच अलवरमध्ये चार युवकांनी रोजगार न मिळाल्याने त्रस्त होऊन आत्महत्या का केली? पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी फोन करून त्या युवकांच्या नातेवाइकांशी चर्चा केली का? त्यांची माफी मागितली का? खरे सांगायचे तर पंतप्रधानांना युवकांचे दु:खच कळत नाही.

  चुकीने म्हणाले-कुंभकर्ण योजना सुरू केली
  झुंझुनू येथे राहुल गांधी म्हणाले की, गहलोत सरकारने झुंझुनूला कुंभकर्ण योजनेसाठी पैसा दिला होता. मंचावर बसलेल्या नेत्यांनी त्यांना सांगितले, कुंभकर्ण नव्हे, कुंभाराम. ही योजना गहलोत सरकारने सुरू केली होती. चुकीची जाणीव होताच राहुल यांनी मंचावरूनच माफी मागितली आणि स्वत: हसले.

  हा तर काँग्रेसचा फतवाच; मी १० वेळा भारतमाता की जय म्हणेन : नरेंद्र मोदी
  हनुमानगड| पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीकरमध्ये राहुल यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, "मी आपल्या सभेची सुरुवात 'भारतमाता की जय'ने करू नये, असा फतवा काँग्रेसच्या नामदाराने काढला आहे. ते मला त्यासाठी कसे रोखू शकतात? हा आमच्या मातृभूमीचा अपमान आहे. त्यांना याची लाज वाटायला हवी. मी तर १० वेळा भारतमाता की जय म्हणणार. 'इंदिरा इज इंडिया'पासून 'भारतमाता की जय' ऐवजी 'सोनिया गांधी की जय,' हे काँग्रेस पक्षाचे चरित्र आहे. आम्ही मातृभूमीसाठी जगू आणि मरूही." भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी काँग्रेसने केलेल्या चुकांबद्दल मोदी म्हणाले


  की, "त्यांच्या चुकांपैकी एक म्हणजे कर्तारपूर. फाळणीच्या वेळी हुशारी दाखवली असती तर कर्तारपूर आमच्यापासून वेगळे झाले नसते."

  मोदींनी कर्तारपूरचा उल्लेख का केला?
  पंतप्रधान मोदींनी या सभेतून श्रीगंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यातील ११ जागा कव्हर केल्या. हा भाग पंजाब सीमेला लागून आहे. तेथे शीख समुदायाचा चांगला प्रभाव आहे. तेथे ते म्हणाले की, १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा सत्तेवर बसण्याची एवढी घाई झाली होती की, गुरुनानक देव यांची कर्मभूमी कर्तारपूर साहिब पाकिस्तानमध्ये गेले.

  श्रेयही देशातील जनतेला दिले
  काँग्रेस ७० वर्षे सत्तेत राहिली. युद्ध केले. लाहोरमध्ये झेंडा फडकवल्याचा मुद्दा मांडला, पण नानकजींच्या पायावर डोके ठेवण्याची व्यवस्था झाली नाही. ३६५ दिवसांत मार्गिका तयार होईल तेव्हा हिंदुस्थानी आरामात कर्तारपूरला जाईल. दर्शन घेऊन परत येईल. त्याचे श्रेय जनतेला जाते. आम्ही दुसऱ्यांच्या चुका सुधारल्या आहेत.

Trending