आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मिरातील शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफीसह  राष्ट्रीय आपत्ती निधीमधून मदत करावी, राजू शेट्टी यांची मागणी   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीर - कृषीप्रधान असलेल्या भारत देशात जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंतचा सर्वच घटकातील शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटांनी कोलमडला असून सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. असाच प्रकार देशामध्ये शेतीक्षेत्रात समृध्द असलेला जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांबाबत परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या काश्मीरमधील सफरचंद, आक्रोड, केशर उत्पादक शेतकरी या अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून याकडे सरकारने दुर्लक्ष केले तर काश्मीरमधील शेतकऱ्यांमध्येही आत्महत्याचे सत्र सुरू होईल. अशी परिस्थिती सध्या जम्मू काश्मीर मध्ये निर्माण झालेली आहे. यामुळे केंद्र सरकारने तातडीने येथील शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी करत राष्ट्रीय आपत्ती निधीमधून मदतीची घोषणा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. 
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने सात प्रतिनिधींचे शिष्टमंडळ 13, 14, आणि 15 नोव्हेंबर या तीन दिवसाच्या दौऱ्यावर होते. काश्मीरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी या शिष्टमंडळने काश्मीरमधील अनंतबाग, पुलवामा, पांपोर, कुलगांम, चौवलगांव याठिकाणी सफरचंद, आक्रोड, केशर उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या शिवार भेटी करून समस्या जाणून घेतल्या. 


गेल्या वर्षी व चालू हंगामात अवकाळी बर्फवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाले असून चालू वर्षी बर्फवृष्टीने सफरचंदाची झाडे मोडून गेली आहेत. यामुळे गेल्या तीस वर्षांतील सर्वाधिक नुकसान झाले आहे. सफरचंदाची लागवड होऊन पिक हातात येण्यासाठी जवळपास 10 ते 12 वर्षांचा कार्यकाल जातो. सध्या या परिस्थीतीला ही झाडे मोडून पडल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून परत या बागांची निर्मीती करण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ते 12 वर्षांचा काळ जाणार आहे. सध्यास्थितीत काश्मीरमधील कलम 370 च्या निर्णयानंतर वाहतूक व्यवस्था व पायाभूत सुविधा नसल्याने सफरचंद निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. 
सध्या याठिकाणी बर्फवृष्टीमुळे सफरचंदच्या फळबागा जमीनदोस्त झाल्याने सफरचंद कुजून जाऊ लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सफरचंद पेट्या तयार करून बाजारात पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र कलम 370 च्या संचारबंदीमुळे वाहतुक व्यवस्था कोलमडल्याने बाजारापर्यंत पोहचणे कठीण झाले आहे. सध्या ग्रामीण भागातील वाहतुक व्यवस्थेवर बंदी असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल गावापासून 70 ते 80 किलोमीटर महामार्गावर आणून पाठवावा लागत आहे. तर सध्या महामार्गावरही वाहतुक व्यवस्था सुरक्षेच्या कारणावरून बंद केली असल्याने सफरचंद व शेतीमाल ट्रान्सपोर्ट गाड्यामध्येच सडू लागला आहे. परिसरात कोल्ड स्टोअरेज व गोडाऊनची कमतरतेमुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल शेतातच ठेवून तो नाशवंत होऊ लागला आहे. 
बर्फवृष्टी होऊन आज जवळपास 15 दिवस झाले असून अजून पंचनामा करण्याचेही आदेश शासनाकडून देण्यात आलेले नाहीत. सफरचंदाच्या बागेतील मोडून पडलेली झाडे काढून पुन्हा फळबाग लागवड करणे हे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारे आहे. यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नाफेड व एन.एच.बी (राष्ट्रीय बागवानी बोर्ड) यांचेकडून कोणत्याच पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. 
यावेळी दौऱ्यादरम्यान चेंबर ऑफ कॉमर्स काश्मीर यांच्या वतीने सुद्धा या शिष्टमंडळास बोलावून गेल्या चार महिन्यातील औद्योगिक, व्यापार क्षेत्रातील चढ उताराबाबत माहिती दिली. कृषी प्रक्रिया क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असून कृषी प्रक्रिया उद्योग अडचणीत आली असल्याची कबुली त्यांनी दिली. 

या संपुर्ण दौऱ्यानंतर या शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत. 

  • काश्मीर मधील अवकाळी बर्फवृष्टीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी.
  • तातडीने नुकसान भरपाईचा सर्व्हे करून संपुर्ण कर्जमाफी व 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार तिप्पट नुकसान भरपाई देण्यात यावे.
  • सफरचंद, केशर व आक्रोड यांचा समावेश हवामान पिकविमा योजनेत करण्यात यावा.
  • काश्मीरमधील सद्यस्थितीत वेळेत बाजारात न पोहोचल्यामुळे खराब झालेल्या फळांची नुकसानभरपाई देण्यात यावी.
  • नाफेड व राष्ट्रीय बागवानी बोर्ड (एन.एच.बी) यांच्यामार्फत तालुकानिहाय कोल्ड स्टोअरेज व खरेदी केंद्रे उभारण्यात यावेत.
  • जम्मू व काश्मीर मध्ये स्वतंत्र फळबाग कृषी विद्यापीठाची निर्मीती करण्यात यावी.

या दौऱ्यातील शिष्टमंडळामध्ये राजू शेटटी यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही.एम.सिंग, सदस्य योगेंद्र यादव, प्रेमसिंग गेहलावत, केरळचे मा. आमदार कृष्ण प्रकाश, हरियाणा किसान मंचचे पी सत्यनाथ, काश्मीरमधील कॉम्रेड डॉ.अमित वांच्छो आदि होते.

बातम्या आणखी आहेत...