आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टी-राज ठाकरेंची भेट; काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याची रणनीती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू आहे. त्याचा भाग म्हणून गुरुवारी राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. 


ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्‍न, शेतकरी समस्या जाणून घेण्यासाठी राज यांनी शेट्टींना भेटीसाठी बोलावले होते, असे मनसेतील सूत्रांनी सांगितले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत प्राथमिक बोलणी करताना मनसे-स्वाभिमानी व अन्य घटकपक्षांची पर्यायी आघाडी निर्माण करण्यासंदर्भात दोघांत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.  लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार उभे नव्हते. राष्ट्रवादीची इच्छा असताना काँग्रेसच्या विरोधामुळे मनसेला आघाडीत येता आले नव्हते. मात्र, राज यांनी आघाडीच्या उमेदवारांचा १० सभा घेत प्रचारात झंझावात निर्माण केला होता.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडणूक लढवली होती. मात्र शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाला होता. आता शेट्टी यांनी सर्व लक्ष विधानसभेवर केंद्रित केले आहे. विधानसभेसाठी महाआघाडीबरोबर जायचे झाल्यास जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी शेट्टी प्रयत्नशील आहेत. स्वत: शेट्टी विधानसभेला उभे राहण्याची शक्यता आहे. 
 

स्वाभिमानी संघटनेचे ‘मिशन ४९’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच बैठक पुण्यात झाली. या बैठकीत संघटनेची ताकद असलेले ४९ विधानसभा मतदारसंघ निवडले आहेत. हे मतदारसंघ पदरात पाडून किमान १० आमदार जिंकण्याचे ध्येय स्वाभिमानीने आखले आहे. पैकी हातकणंगले, शिरोळ, चंदगड, शाहुवाडी, तासगाव, पंढरपूर-मंगळवेडा, निफाड, नांदगाव, रिसोड, बुलडाणा, जळगाव-जामोद, गंगाखेड अशा १७ विधानसभा मतदारसंघात संघटनेला विजयाची खात्री असल्याचा शेट्टी यांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...