आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हाने अशी पेलावीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोहायला येणे ही एक कला आहे. आत्मसात केली तर ती माणसाच्या जीवनाला तारक ठरते. खरे म्हणजे पाणी पाहिले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. हा अनुभव मी माझ्या लहानपणी पोहणे शिकताना घेतला आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे माझे प्राथमिक शिक्षण झाले. जेव्हा शाळेला उन्हाळ्याची सुटी लागायची, तेव्हा माझ्या वयाची अनेक मुले विहिरी, ओढा येथे पोहण्यास जात असत. मलाही ते नेहमीच पोहण्याचा आग्रह करत असत. मात्र पाण्याची भीती मनात असल्याने मला नको वाटायचे. ही गोष्ट माझ्या आजोबांच्या लक्षात आली. त्यांनी माझ्या मोठ्या भावालाही पोहायला शिकवले होते. आता त्यांनी मला पोहायला शिकवण्याचा निश्चय केला. ते मला नेहमी सांगत की, बाळांनो, आयुष्यात पोहायला येणं फार महत्त्वाचं आहे. एके दिवशी त्यांनी मला पोहायला नेलेच. माझ्या क मरेला गव्हाच्या पेंड्यांपासून बनवलेला बिंडा बांधला आणि विहिरीच्या कडेला हातपाय हलवण्यास सांगितले. मी मात्र भीतीने विहिरीच्या बाहेर पळून वर आलो. मला पोहायला शिकायचं नाही, असं म्हणून ओरडू लागलो. या प्रसंगानंतर काही दिवसांनी मला माझ्या आजोबांनी, भाऊ आणि मित्रांनी धीर दिला व कमी खोलीच्या पाण्यात पोहण्यास सांगितले. त्यांचे ऐकून मी थोडा प्रयत्न करू लागलो. एके दिवशी माझ्या पाठीवर काहीही न बांधता आजोबांच्या मित्रांनी मला विहिरीत उचलून टाकले व ते स्वत:ही पाण्यात उतरले. मला थोडेफार पोहायला येत होते. मात्र एकदम पाण्यात टाकल्याने मी खाली बुडालो. एक गटांगळी खाल्ली आणि पाण्यावर आलो. हाताने पाणी सारत व पाय हलवीत पोहू लागलो. मनातली भीती दूर झाली. मी नंतर सरावाने चांगल्या प्रकारे पोहायला लागलो. या अनुभवातून मला एका गोष्टीची जाणीव झाली की कोणतेही अवघड काम करताना मनात विनाकारण भीती बाळगू नये. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे.