आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून उदयनराजे आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी, खडसेंना पुन्हा डावलले !

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही एकनाथ खडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहोत- चंद्रकांत पाटील

मुंबई- भाजपकडून अखेर राज्यसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळीही भाजप नेते एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेशच्या कोट्यातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली.


उदयनराजे भोसले उद्या आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणा आहे. एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय निश्चित असल्यामुळे पक्षाकडून संजय काकडे यांना डावलून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासोबतच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचीही उमेदवारी निश्चित झाली. भाजप आता तिसऱ्या जागेवरही आपला उमेदवार उतरवणार आहे, यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या नावासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. पण, तिसऱ्या जागेवरच्या उमेदवाराचा विजय अवघड आहे. 

दुसरीककडे, राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार असणार आहेत. यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या उमेदवारासाठी माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, फौजिया खान यांना शिवसेनेचे समर्थन असल्याचे सूत्रांकडून समजते. तर, काँग्रेसकडून अद्याप राज्यसभेसाठी उमेदवार घोषणा झालेली नाही. शिवसेनेकडे राज्यसभेसाठी एक जागा आहे, यात चंद्रकांत खरै, शिवाजीराव अढळराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

राज्यसभेसाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मते मिळणे आवश्यक आहे. राज्यातील सत्तेचे गणित बदल्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न असेल.

बातम्या आणखी आहेत...