आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सातपाटील कुलवृत्तांत’ वंशश्रेष्ठत्वाच्या दंभावर प्रहार करणारी प्रागतिक कादंबरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राकेश वानखेडे

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, दणकट कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीसेक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ताम्रपट ह्या महाकादंबरीने ते पहिल्या श्रेणीचे कादंबरीकार बनले. २० वर्षे अभ्यास केल्यानंतर "सातपाटील कुलवृत्तांत" ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा वेध घेणारी त्यांची महाकादंबरी नुकतीच "शब्दालय'द्वारे प्रकाशित झाली आहे. 
 

आयुष्यभर जगलेल्या, मानत आलेल्या मूल्यांचा जयजयकार करणे, यापेक्षा त्या मूल्यांची अत्यंत  मनस्वीपणे चिकित्सेला  सज्ज होणारी भूमिका रंगनाथ पाठारे याठिकाणी घेतात. भालचंद्र नेमाडे  यांच्या “हिंदू ‘ या कादंबरीत आणि “सातपाटील कुलवृत्तान्त’ या दोन्ही कादंबरीत हाच तो गुणात्मक  फरक आहे. “हिंदू’  ही मध्यममार्गी भूमिका घेत बोटचेपी होते तर “सात पाटील कुलवृत्तांत’ मात्र  प्रगतिशील भूमिका अधोरेखित करते.
 
वि. का. राजवाडे  हे मराठी कादंबरीकारांना "घर कोंबडे' असे म्हणून संबोधायचे. परंतु "सातपाटील कुलवृत्तांत' सारख्या काही मोजक्या कादंबऱ्या मराठी साहित्यात आहेत, ज्या राजवाड्यांच्या या समजास खोटे ठरवतात. रंगनाथ पठारे यांची "सात पाटील कुलवृत्तांत' ही "शब्दालय'द्वारे प्रकाशित झालेली कादंबरी संपूर्ण भारतवर्षाची परिक्रमा करते. या कादंबरीला अनेक सोशल पॉलिटिकल आणि सांस्कृतिक डायमेन्शन्स आहेत. अत्यंत प्रांजळपणे आपल्या कुळाची आणि आपल्या जन्माची कुळकथा सांगणे, असे कथानक या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. आठशे पानांच्या या भरभक्कम अशा साहित्यकृतीत एका मराठा कुटुंबाची कहाणी सांगता सांगता ती महाराष्ट्राची कुळकथा सांगू लागते. आपल्या जगण्यातले दंभ खोडत अस्सल मुळापर्यंत जाण्याचा आणि तेथे मानवी संबंधांचं गुंतागुंतीचं आणि टिकून राहण्याचं ब्रीद ती मांडते. ही कादंबरी वाचताना कृष्णवर्णीय साहित्यातले अॅलेक्स हॅले यांच्या "रूट्स' या कादंबरीची प्रकर्षाने आठवण होते. संपूर्ण कृष्णवर्णीय समाज, त्यांचे स्थलांतर आणि स्थित्यंतरं, त्यांचा चिवट संघर्ष, टिकून राहण्याची वृत्ती या अश्वेतवर्णीयांमध्ये जशी दिसते, त्याच पद्धतीने परिस्थितीशी लढत आपलं स्वत्व,आपलं कूळ आणि मूळ टिकवूू पाहणाऱ्या त्या समाजासारखे या कादंबरीतही घडते (...तसे अन्याय, अत्याचार मराठा समुदायाच्या वाट्याला नाहीत पण टिकून राहणे महत्वाचे असते.)

आपल्याकडे दीर्घ कथांना कादंबरी म्हणण्याचा वाईट प्रघात पडलेला आहे. "सातपाटील' कादंबरीची पृष्ठसंख्या पाहता हा गैरसमज झटकूनच ती उभी राहते. त्याचबरोबर कादंबरी या साहित्यप्रकारात कितीतरी कथा, उपकथा, उपपात्रे असतात याचा वस्तूपाठ ही कांदबरी देते. "सातपाटील' कादंबरीच्या केंद्रस्थानी मराठा-कुणबी समाजाचे मध्यवर्ती पात्र असले तरी ब्राह्मण, मुस्लिम आणि पूर्वाश्रमीचे महार या तिन्ही समुदायांचे ती जात आणि वर्गचरित्र सूक्ष्म आणि संयमाने मांडत जाते. मराठीत अनेक वर्ष कादंबरी लेखनात प्रयोग महत्त्वाचा की आशय, यावर वाद-विवाद होत राहिले आहेत. प्रयोगाची बाजू घेणाऱ्यात कलावादी संप्रदायाची मंडळी आघाडीवर  होती, आणि आजही ती असते. परंतु आपला आशयच अत्यंत ताकदीचा असेल तर त्याला प्रयोगांची गरज नसते. तो आशयच स्वतः एक विलक्षण प्रयोग म्हणून उभा ठाकतो. या कादंबरीचा वाचनीयतेचे रहस्य त्याच्या आशयामध्ये आहे. कोणतेही आढेवेढे न घेता, प्रयोगाच्या फुटकळ अशा फंदात न पडता, आपलं जे काही म्हणणं आहे, कथन आहे, ते साध्या, सोप्या, सुटसुटीत शब्दात मांडणी लेखक करत जातो. सह्रदयी सुगमतेचे प्रत्यय देणारी,  प्रामाणिक आत्मशोधनाद्वारे अनेक पिढ्यांची पाळेमुळे खोदणारी, आपल्या आजच्या वर्तमानातल्या विविध पैलूंचा धांडोळा घेत जाणारी आणि त्याचे मूल्य सुनिश्चीत करण्याचा प्रयास ही कादंबरी करते. आपल्या भावी पिढ्यांच्या नसानसांतला फोलपटअभिनिवेष झटकून वाडवडिलांची मातृसत्ताक मूल्यव्यवस्था नव्या, आजच्या पिढीच्या हाती सोपवण्याचा हा धाडसी प्रयोग आहे. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या पृष्ठतलावर शक्यतांचं एक मोठं मूल्यानुवर्ती कथन यामध्ये उभे केले गेले आहे, जे अत्यंत मनस्वी तर आहेच, अत्यंत ताकदवानही आहे. 

जीवन ऊर्जेने ओतप्रोत असलेल्या ताकदवान स्त्रिया या कादंबरीत भेटतात. किंबहुना याच स्त्रिया संपूर्ण आशयाचे वहण करतात. त्या लेखकाच्या बहिणी,आत्या, आज्या, पणज्या, खापरपणज्या इथपर्यंतच निव्वळ राहत नसून आपल्याच कुणीतरी डोक्यावरून हात फिरवणाऱ्या, कडकडून डोक्यावर मायेने बोटे मोडणाऱ्या आपल्याच रक्ताच्या गाठींनी बांधलेल्या जीवाभावाच्या होतात. त्यांचं तसं नांदणं आनंदित करणारं आहे, तसंच त्यांचं अकस्मात निघून जाणं हे ही चटका लावणारे आहे. आठशे पानांच्या या बृहद कादंबरीचे एका दमात वाचन त्याचमुळे जीवावर येत नाही. परंतु खोलीच्या घनदाटतेमुळे आपण पानापानांवर थबकत जातो, एकरूप होत जातो. सघनतेचं गारुड आपल्या आतमध्ये धजत जातं.
 
मराठीमध्ये ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याची मोठी परंपरा आहे, तशी "सातपाटील'  एकांगी, एकसुरी होत नाही. अस्मितेच्या अतिरिक्त अशा दबावापोटी पूर्वजांच्या अनेक गुणाअवगुणांचे दर्शनच होत नाही. पण "सातपाटील' त्याला अपवाद आहे. मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचा जो सुवर्णकाळ मानला जातो, तो यात येत नाही. तो काळ टाळून, जो अत्यंत नामुष्कीचा असा काळ मराठ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आहे, त्याच काळाची या कादंबरीत अत्यंत चोखंदळपणे रंगनाथ पाठारेंनी निवड केलेली आहे. यातून लेखकाच्या प्रांजळ आत्मशोधाची इच्छा आपल्या ध्यानात येते. महाराष्ट्रातल्या गेल्या पन्नास वर्षातील अस्मितेच्या भानगडींनी टोक गाठलेले आहे. अत्यंत मानाच्या स्थानी असणारा असा हा समाज... त्याने पकडलेले ते मानाचे अक्षांश, रेखांश तो हरवून बसला आहे. आपल्या आसपास अनेक बारक्या जाती समूह आपापल्या परीने उदरनिर्वाह करतात, अतिरेकी अभिनिवेषामुळे हा समुदाय त्यांची दखलच घ्यायला तयार नाही. यामुळे कधीकाळी असणारा मान हरवून आपला अक्षांश, रेखांश त्यांनी गमावला आहे.

इतर जाती समुदायाशी बिघडलेले हे संबंध शाश्वत अशा जेनेटिक सत्यांचा शोध  घेऊन आपले या लोकांशी नाते काय ते सुचित करते. मानववंशशास्त्र आणि इतिहासाच्या आकलनातून अत्यंत साहसपूर्ण अशी काही तथ्य आणि निरीक्षणं या कादंबरीने मांडले आहेत, जी मराठी माणसासाठी आत्मभान देणारी आहेत. या देशांमध्ये मराठा साम्राज्याचा आणि मराठी समुदायाने केंद्रस्थानी आणलेल्या अनेक बाबींचा चर्चा, खुलासा आपल्याला इथे होतो. मराठी समाजात वंश श्रेष्ठत्वाचं आणि कुलश्रेष्ठत्वाचं टोकदार अस्मितांचं अस्वस्थ वर्तमान तयार झाले आहे, यावर ही कादंबरी भाष्य करते. ही कादंबरी असं सांगते की, भारतामध्ये कोणताही वंश आज प्युअर नाही. अनेक शतकांच्या सरमिसळीतून, आंतरक्रियेतून आपला आजचा समाज तयार झालेला आहे."सुपिरियर प्युअरिटी' ची वल्गना तद्न बदमाशी आहे. आपण सारेच भेसळीने युक्त आहोत. कुणासही याबाबत शंका असता कामा नये.

एकाबाजूला असे असताना दुसऱ्या बाजूला सामान्य कष्टकरी समाज हा कितीतरी उदात्त मूल्य घेऊन जगत आलेला आहे. मराठा जातीचे सरंजामी व्यवस्थेशी नातं नसून श्रमसंस्कार आणि श्रमसंस्कृतीशी नातं आहे, हे आज आपल्या ध्यानीमनी देखील नाही. ज्याला वाचा नाही असा विठोबा जेव्हा मुक्या जनावरांशी बोलतो तेव्हा मुकी जनावरेदेखील मानवतेच्या पातळीवर येतात आणि आपल्याला गदगदून सोडतात. उल्फीला सोडून परत आलेला घोडा जेव्हा आपल्या मालकासाठी दिवसा रडतो तेव्हा तो घोडा राहत नाही. तो आपला सखा-सोयरा होतो. तीच गत भुंडी या गाईची... तिच्यासाठी तिच्या मरणोपरांत कायमस्वरूपी दूध व्यर्ज करणारा विठोबा किती मानवी मूल्यांनी ओतप्रोत आयुष्य जगला हे आपल्याला भान देणारे असं आहे. काळी आजी आणि अफू आजी या दोन सवतींमधला जीवाभाव कितीतरी प्रांत, प्रदेश आणि देशाच्या सीमा ओलांडून जाणारा आहे. माणसं इथून तिथून सारखीच असतात... भाषा,लिपी,राजकीय स्थित्यंतरं, धनलालसा देखील त्यांना अडवू शकत नाही, हेच यातून दिसून येतं. लेखक हे सांगतांना कचरत नाही की, आपला मुळ पुरुष हा अफगाण (पठाण) होता  आणि अर्थातच तो मुसलमान होता. हे  सांगण्याचं, कबूल करण्याच्या धारिष्ट्यासाठी केवढा तरी प्रामाणिकपणा लागतो. तो लेखकाने येथे दाखवला आहे आणि यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.

या कादंबरीचा कॅनव्हास सुमेरियन वंशापासून सुरू होत अगदी युरोपीय समुदायापर्यंत जातो. आणि पुन्हा आपल्यापर्यंत येऊन भिडतो. हे भूतकाळातल्या आदिबंधांचे आपल्याला हाका मारणं आणि त्याला आपण दाद देणं हे खरोखरच अद्भुत असं आहे. भूगोलाच्या सीमा ओलांडत मोठा स्पेस ही कादंबरी धारण करते. अनेक शक्यता ती पडताळून पाहते. आम्ही निव्वळ पराक्रमी होतो हे सांगण्यात अर्थ नाही, आपण सामान्य माणसंही असतो आणि आपल्यालाही धास्ती आणि जीवाचे भय वाटत असतं. आपण अनेकदा याच जीवाच्या धास्तीने अनेक प्रसंगातून पळ काढलेला असतो पण ते जगजाहीर करण्याचं धारिष्ट्य मात्र आपण करत नाही. आपल्या इतिहासामध्ये फक्त गौरवाचे सोहळेच नसतात, तर नामुष्कीचे अनेक प्रसंग आलेले असतात. आपण दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवून आणताना पराक्रम गाजवण्याच्या अविर्भावात वावरतो खरे, परंतु आपल्या कुटुंबातल्या मुली इतरांसोबत गेलेल्या आहेत, हे सांगताना आजच्या रोटी-बेटी व्यवहारातील कृत्रिम स्थीतिशीलतेचं काय? आंतरजातीय विवाहांचे भूतकालीन अदिबंध ही कांदबरी स्पष्ट करते. त्याचे शल्य आणि सोस बाळगत राहणे हे कोतेपणाचे आहे ही प्रागतिकता मांडते. आपल्या वर्तनातला  दुटप्पीपणा "सातपाटील' अनेक प्रसंगात तिरकसपणे चित्रित करते.पानिपतातील युद्ध कैदी मुक्त झाल्यावर तेथेच आपली वस्ती करतो. त्याला पोट भरण्यासाठी जशी उपजावू जमीन पाहिजे तसेच शरीर धर्मासाठी स्त्रीही हवी आहे. त्यासाठी त्याला कुणीही चालणार आहे. विधवा, परितक्त्या, बेसहारा, वेश्या साऱ्यांच्या शोधात माणसं दिसतात. एक स्त्री एकाच वेळी अनेकांशी शरीर धर्म निभावू शकते, फक्त आपला विस्तार झाला पाहिजे. पण हीच धारणा जसजशा पिढ्या बदलतात तशी ती मागे पडत गेली. मुक्त लैंगिकतेचे पुरस्कर्ते आपले पुर्वज होते ही महाभारतकालीन शिकवण विसरता येणार नाही. आजच्या आपल्या एकल संस्कृतीकडे सरकणाऱ्या अज्ञानी, अडाणी समाजाला चपराक देणारी ही कादंबरी आहे. ती भारतातल्या बहुविधतेचा गौरव करते. हेच आपल्या जगण्याचं सूत्र आहे, असं ठासून मांडते. आपला सांस्कृतिक लढा कोणत्या पृष्ठतलावर चाललेला आहे, याचं नेमकं भान लेखकाला आहे. शोषण सिद्धांत मांडणाऱ्या शोषकांच्या सनातन धर्माला मान्यता आपल्या साहित्यकृतीतून मिळणार नाही, वा नकळतपणे एकल संस्कृतीची भलामण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतांना लेखक दिसतो. आपली श्रमसंस्कृती आहे आणि त्यात असणाऱ्या उदात्त मूल्यांचे विराट दर्शन घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, हे भान लेखकाचे शेवटपर्यंत दिसतं. एखादं उपकथानक असावं अशा पद्धतीने विठ्ठल-रखुमाईची मूर्ती हे कांदबरीभर, प्रत्येक प्रकरणांमध्ये, प्रत्येक कुटुंबांमधून, तमाम पाटलांमधून पुढे सरकत राहातं... चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासारखं. यातून लेखक एका मूल्य व्यवस्थेचा जाणिवपूर्वक निवड करतो. त्यामागे लेखकाची निश्चित भूमिका आहे. विठ्ठल हा देव नसून तो आपल्या सांस्कृतिक संचिताचं प्रतिक आहे. ब्राह्मणी शोषण व्यवस्थेच्या विरोधात उभा ठाकलेला तो एकेकाळचा एल्गार, विद्रोह,आगाज होता. म्हणून शोषण व्यवस्थेला आणि त्यांच्या सिद्धांतांना न जुमानणारे ,न शरण गेलेले हे कुंटूब जसे आहे तसेच तत्कालीन मराठी समाजही होता हेच निर्देशीत केलेले आहे. आज जे काही एकलसंस्कृती निर्माणाचे प्रयोग चालले आहेत, त्या साऱ्याना छेद देणारी ,त्यांचे वाभाडे काढणारी अशी कृती "सातपाटील' करते. आपल्या कूळ कथेत विठ्ठल-रखुमाईचे स्थान अव्वलस्थानी असले पाहिजे, असा संकेत ती पानोपानी देत राहते. विठ्ठल-रखुमाई हे नुसते पारलौकिक समाधान देतात असं नाही तर रोजच्या भाकरीच्या संघर्षात तो आपल्या बाजूने ठामपणे उभा आहे,आणि तेच जगण्याचं बळ देतात, असं मानणाऱ्या पिढयांचे आपण वारस आहोत याची आठवण सारखी होत राहते.

या कादंबरीत प्रचलित अर्थाने जरी पुरुष प्रथमस्थानी दिसत असले, तरीदेखील ही कादंबरी नायिकाप्रधान आहे. नायिकेला मध्यवर्ती ठेवूनच सर्व व्यक्तीरेखा आणि प्रसंग चित्रित झालेले आहेत. यातून आपण मातृसत्ताक पद्धतीचा सांस्कृतिक पाया हाच आपल्या जगण्याचा मूलाधार आहे असं सुचित करते. मातृसत्ताक व्यवस्थेचा पाया अनेक शतकांपूर्वी घातला गेला होता याची आठवण कादंबरी करून देते. "सातपाटील'मध्ये लेखकाचे अनेक निरीक्षणे, तपशील प्रचंड प्रागतिक म्हणावी अशी आहेत. मुंशी प्रेमचंद यांनी १९३६ मध्ये लाहोर येथील प्रगतिशील लेखक संघाच्या अधिवेशनात असं म्हटले होतं की, लेखक हा मुळातच प्रगतीशील असतो. तशी भूमिका घेतल्याशिवाय त्याला आणि त्याच्या लिखाणाला मोठेपणा येत नाही. आज निर्माण झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या संवेदनाक्षम प्रकरणांवर धाडसी भाष्य करण्याचे दायित्व ही कादंबरी स्वीकारते. मग तो शहाण्णव कुळी असल्याचा असो किंवा पाटील-देशमुख कुळीचा अभिमान असो,"अक्करमाशी' , "बारमाशी', "कडूचे' अशा अनेक प्रकरणांवर ही कादंबरी भाष्य करते. आपल्या अज्ञानातून आपण काय काय दंभ आणि अहंकाराच्या झुली घेऊन आपलं नैसर्गिक जगणं असह्य, यातनामय करून बसतो. आपल्या आडनावापुढे "पाटीलकी दर्शक' विशेषण लावून आपण आपला न्यूनगंड दाखवत असतो. आपण आत्मविश्वास गमावून बसल्याचं ते निदर्शकच असतं. यातून ग्वाल्हेरचे शिंदे महाराजांसारखे राजे देखील सुटले नव्हते, इतका हा कुणबी जातीतला अंतर्गत वर्गकलह क्लेशकारक आहे. यावर भाष्य करण्याचा अधिकार पठारे यांनाच होता. सोनाराने कान टोचलेले बरे असतात आणि हे काम त्यांनी अत्यंत जबाबदारीने  केले आणि निभावले देखील आहे. सातत्याने बाहेरून होणारी आक्रमणं आणि त्याला आपल्या समाजाने दिलेला प्रतिसाद  यातून तयार होणारं एक नवं सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक असं समीकरण स्वीकारण्याचं भान  समाजाला देत पुढे वाटचाल करायची असते. ही प्रागतिकता अंतर्बाह्यपणे साहित्यिक म्हणून त्यांनी स्वीकारलेली आहे. आपले सारे दंभ झटकून स्वतःमध्ये डायजेस्ट करून घ्यावे लागतं, तरच त्यातला अस्सलपणा हा कागदावर उमटू शकतो. आपलं ते सगळं खरंच नसतं  हे तपासण्याची स्थितप्रज्ञता जाणीवपूर्वक कमावण्याची गोष्ट असते. काहींकडे ती क्षमता असूनही हेतुपुरस्कर ते ती वापरत नाहीत,याला अपवाद पठारे यांचं हे लिखाण आहे असं म्हणावं लागेल. बहुपत्नीत्व हे आजच्या समाजाला ठाऊक आहे परंतु आपल्याच समाजामध्ये बहुपतीत्वाची देखील मुभा होती. हा उदारमतवाद आपण साफ विसरलो आहोत. स्थित्यंतराच्या आणि उत्क्रांतीच्या टप्प्यांवर ही महत्त्वाची मूल्ये मागे पडल्याचे नुकसान आपण बघतो आहोत. स्त्रीला जननी,भूमी आणि सर्जक असल्याचं मूल्य कालकथित झाले असून निव्वळ भोगवस्तुरूप आले आहे. 

जातीयतेच्या अमानवी प्रथेचे वर्णन कटाक्षाने टाळत, काही जुजबी चित्रण मात्र "सातपाटील' करते. असे का? कदाचित विस्तार भयाचा विचार अशी मांडणी त्यामागे असावी. भाषाविज्ञानाच्या अनुषंगाने कादंबरीत केलेली महाराष्ट्र आणि मराठी या शब्दाची उकल धाडसाची आहे. ही उकल यापूर्वी इरावती कर्वे, श्रीधर व्यंकटेश केतकर, शंकरराव खरात, अलेक्झांडर रॉबर्टसन अशा लोकांनी केलेली आहे. कोणती उकल? "महार लोकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र'... या विचाराला पुष्टी देणारे अनेक प्रमेये येथे येतात. आपल्या सर्व जातीच्या, हितसंबंधांच्या, सोयीस्कर धारणांवर आपली ठळक भूमिका मांडण्याचं धारिष्ट्य अनेकांना जमत नाही, पण पठारे याला अपवाद ठरले आहेत. आपले थोर नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या अंगी मोठी विद्वत्ता असूनही ते स्वजातीच्या विरोधी कचखाऊपणाने वागत आले, असंच इतिहास आपल्याला सांगतो. आयुष्यभर जगलेल्या, मानत आलेल्या मूल्यांचा जयजयकार करणे, यापेक्षा त्या मूल्यांची अत्यंत  मनस्वीपणे  चिकित्सेला  सज्ज होणारी भूमिका लेखक याठिकाणी घेतात. भालचंद्र नेमाडे यांच्या "हिंदू ' या कादंबरीत  आणि "सातपाटील कुलवृत्तान्त'  या दोन्ही कादंबरीत हाच तो गुणात्मक फरक आहे. "हिंदू'  ही मध्यममार्गी भूमिका  घेत  बोटचेपी होते तर "सात पाटील कुलवृत्तांत' मात्र प्रगतिशील भूमिका अधोरेखित करते. खरं म्हणजे  लेखक अनेक मार्गाने आपले आत्मचरित्रच वेगवेगळ्या अंगाने मांडून पाहत असतो, असेही यातून दिसते. लेखक अनेक दिवसानंतर जेव्हा आपल्या  मूळ गावी साल्पी येथे जातो, त्यावेळेस ग्लोबलायझेशन आणि जागतिकीकरणामुळे खेड्यापाड्यांमध्ये झालेला जो बदल आहे, त्याचे बारकावे आणि तपशील टिपताना संवेदनशीलतेने टिपतो. जागतिकीकरणामुळे उध्वस्त झालेले खेडी आणि होणाऱ्या विकासाला मानवी चेहरा नाही असं अत्यंत ताकदीने चित्रित करतो. त्यावेळेस ही कादंबरी थेट आजच्या समकालीन प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणारी ठरते.या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांची भूमिका मराठी वांड्मयाच्या इतिहासात अत्यंत ऐतिहासिक आणि मोलाची ठरेल असे वाटते. "सात पाटील कुलवृत्तांत' या कादंबरीचे खुल्या मनाने स्वागत करण्यासाठी वाचक म्हणून प्रागतिक होण्याची आपणही तयारी ठेवणे आवश्यक आहे. ही मराठी समाजातली अत्यंत आनंददायक अशी समाजशास्त्रीय घटना होय असे मी मानतो.

लेखकाचा संपर्क - ९४२३५४०३६६