आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakesh Wankhede Rasik Article About Trend Setter Of Indian Literature

भारतीय वाङ‌्मयाचा "ट्रेंड सेटर'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनच्या एका अधिवेशनात सहभागी झालेले इस्मत चुगतई, अली सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, हबीब तन्वीर, राजिंदरसिंग बेदी हे ख्यातनाम लेखक...)

राकेश वानखेडे  

प्रगतिशील लेखक संघाचे अमरावती येथे आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. ज्या काळात बुद्धिजीवींना काबूत कसे ठेवावे याचे मनसुबे आणि कायदे शासन संस्था हिरिरीने करते आहे, त्या काळात शेकडो लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, ब्लॉगर, छायाचित्रकार, साहित्यिक कार्यकर्ते एका छताखाली येऊन मंथन करतात, याला गुणात्मक मूल्य आहे. 
दीपस्तंभ म्हणून प्रगतिशील लेखक संघाचा आजवरचा पंचाऐंशी वर्षांचा इतिहास राहिलेला आहे. अनेक चढ-उतार “प्रलेसं’ने पाहिले आहेत. महायुद्ध अनुभवले, क्रूरकर्मा हुकूमशहा पाहिले, फाळणीचे चटके सहन केले. आज पुन्हा अशाच विलक्षण क्रायसिसमधून भारतीय समाज जातो आहे. अशा वेळी  प्रगतिशील आंदोलन ठप्प राहणे शक्य नाही. आपणच आपला इतिहास नीटपणे समजून घेत, लोकांपुढे ठेवण्याचा या अधिवेशनामागील उद्देश आहे.फाळणीपूर्व भारतात प्रगतिशील भूमिका घेणारे, वसाहतवादविरोधी लेखक होते. डाव्या विचारांकडे झुकणारे भारताच्या मागासलेपणाची कारणे वस्तुस्थितीला धरून मांडत होते. त्यांनी त्या वेळी घेतलेली व्यापक वाङ‌्मयीन भूमिका आजच्या भारतीय वाङ‌्मयाचा "ट्रेंड सेटर' मानली जाते. हा इतिहास आजच्या लिहिणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावा हा अधिवेशनाचा उद्देश आहे.
१९३३ मध्ये अहमद आली आणि मोहम्मद जफर यांनी अलाहाबाद येथे प्रगतिशील लेखक संघाची संकल्पना मांडली. पुढे १९३५ मध्ये लंडन येथे सज्जाद जहीर यांनी "युरोपीय प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन' ची कार्यप्रणाली पाहून लंडन येथे "भारतीय प्रगतिशील लेखक संघाची' स्थापना केली. १९३६ मध्ये कलकत्ता आणि लखनऊ येथे प्रलेसंच्या अधिवेशनात सय्यद फक्रुद्दीन बेली यांच्या निमंत्रणावरून हमीद अख्तर, फैज अहमद फैज, इश्मत चुगताई, सआदत हसन मंटो आणि मुंशी प्रेमचंद सहभागी झाले होते. लखनऊच्या पाहिल्या अधिवेशनाचे मुंशी प्रेमचंद अध्यक्ष, तर रवींद्रनाथ टागोर हे उद्घाटक होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुंशी प्रेमचंद यांनी भारतीय वाङ‌्मयाला प्रभावित करणारा नवा दृष्टिकोन मांडला. त्या दृष्टिकोनाला भारतीय लिटरेचरचा ‘ट्रेंड सेटर' मानले गेले.  फाळणी झाल्यावर पाकिस्तानात गेलेल्या, महत्त्वाच्या उर्दू लेखकांनी (मंटोसह) पाकिस्तानी प्रगतिशील लेखक संघाची स्थापना केली. ज्याला ‘अंजुमन तरक्की पसंत मोहम्मफिन' म्हटले जाते. भारतात मुल्कराज आनंद, डॉक्टर जोशी प्रसाद, प्रमोद राजदान सेनगुप्ता हे सारे लेखक एकाच वेळी लिहीत होते आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीशी लढतदेखील होते. 

        
याच काळात भारतात सिनेमा, नाटकाची चळवळ भरभराटीस आली. त्यातूनच १९४५ साली प्रलेसंची भगिनी म्हणून "इप्टा' ची स्थापना झाली. "इप्टा' ने भारतीय समाजमन घडवले. अनेक लोक पुढे आले, ज्यात जाँ निसार अख्तर, कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, ए. के. हंगल, बलराज साहनी, अमृता प्रीतम, नदीम कुरेशी, अली सरदार जाफरी, शबाना आझमीपासून ते आजचे अंजन श्रीवास्तवपर्यंत अनेकांची नावं सांगता येतील. महाराष्ट्रात १९४५ मध्ये मुंबईत प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतले गेले. अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, अमर शेख अशी नावे त्या वेळी नव्याने पुढे आली. मुक्तिबोध  बंधू, नारायण सुर्वे हे नवे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले होते.
“प्रलेसं’मध्ये सृजनाचे नवनवे प्रयोग, विविध साहित्य प्रकाराची ओळख करून देणाऱ्या  कार्यशाळांचे आयोजन केले जाते. नवलेखकांना गंडा, ताईत बांधण्याचा, नवे मठाधिपती  निर्माणाचा प्रयत्न “प्रलेसं’ने कधीही  केला नाही. प्रलेसं व्यक्तिपूजा आणि सेलिब्रिटी स्टेटसच्या विरोधी होता आणि आहे. “प्रलेसं’भोवती कधीही गर्दी नव्हती कारण ते लाभ वाटपाचे केंद्र झाले नाही. “प्रलेसं’ने 'लेखकराव' ही तयार केले नाही. “डीकास्ट' लोकांचे येथे स्वागत होते. चिकित्सेला सज्ज असणे “प्रलेसं’मध्ये नेहमीच महत्त्वाचे मानले गेले. या चिकित्सेच्या कक्षेतून कुणीही वगळले जाणार नाही याची सदैव जाणीव “प्रलेसं’ने ठेवलेली आहे. स्वधर्म,स्वदेश, स्व-संस्कृती, भूसलगता, भाषा-प्रांत यांची  चिकित्सा करण्याचे धाडस असेल तर “प्रलेसं’ अनेकांसाठी द्रुतगती मार्ग सिद्ध झाला आहे. “स्व' लादेखील या चिकित्सेपासून दूर ठेवू नये असा येथे कटाक्ष असतो. स्वतः वर आसूड ओढत,आत्मटीकेचं हत्यार उपसत, दंभ झटकण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक घडवत, जमिनी सत्याशी जोडलेले अनेक लेखक येथे घडवले गेले आहेत.
प्रगतिशील लेखक संघ ही कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनेशी संलग्न, संबंधित नाही. मात्र आपली एक ठाम राजकीय भूमिका ती राखून आहे. पुरोगामी म्हणवून घेणे ज्या काळात नामुष्कीचे झाले आहे, त्या काळात नुसतंच तग धरून राहणे नव्हे तर नैसर्गिक मित्रांची गोळाबेरीज करत, त्यांना कृतिप्रवण करणे “प्रलेसं’चे काम आहे. या देशाची मध्यवर्ती धारा असणारी 'गंगाजमनी तहजीब ' हीच नैसर्गिक व भारतीय मातीतली आहे, अशी “प्रलेसं’ची भूमिका आहे. अतार्किक, असामाजिक, विषमतापूर्ण धारणांचा प्रतिवाद करणे येथे शिरोधार्य मानले जाते. जल, जंगल,जमीन, सामाजिक न्याय यासाठी टाहो फोडणाऱ्या उपेक्षितांच्या सोबत “प्रलेसं’ चालत आला आहे. आम्ही शोषकांच्या समर्थनार्थ आमच्या साहित्यकृतींमध्ये  “ब्र' ही लिहिणार, वापरणार नाही असा पण असलेला हरेक लेखक-कवी आमचा साथी आहे. त्यासाठी या संस्थेशी जुळलेच पाहिजे हा “प्रलेसं’चा दंडक नाही. समाजजीवनात उठणाऱ्या वेदनांचा ताकदीने भंडाफोड करणे, हाच प्रगतिशील लेखकांचा अघोषित आणि घोषित असा जाहीरनामा होय. प्रलेसंचे प्रतिनिधी वर्गदास्य, स्त्रीदास्य यांनी पिचून निघालेल्या घटकांचे प्रवक्ते असणे गरजेचे असते. 
हा सगळाच कुणाला रोमँटिसिझम वा युटोपियादेखील वाटू शकेल. किंबहुना ८५ वर्षांपूर्वी तो येथील अभिजनांना तसाच वाटला होता. परंतु प्रगतिशील घटक थांबले नाहीत. एकल संस्कृती निर्माणाच्या प्रयोगांना आपल्या साहित्यकृतीतून हातभार लावण्यापेक्षा हा युटोपिया, हा रोमँटिसिझम परवडला. कारण याला  मानवी चेहरा आहे. लोकप्रिय आणि शब्दबंबाळ साहित्याच्या प्रभावापासून श्रमजीवी वर्गातून आलेल्या लेखक-कवींना मुक्त करण्याचे काम प्रलेसंने केले आहे. आपल्या जीवित साफल्याच्या भूमिकेबाबत लेखकांना सजग करणे हे “प्रलेसं’चे धोरण राहिले आहे. लेखकांच्या अंगी सांस्कृतिक सजगता नसेल तर 'सी ग्रेड'  साहित्य निर्माण होते. आजवर मराठीत 'सी ग्रेड' साहित्याचं पुष्कळ चांगभलं झालं. प्रश्न आता असा आहे की तेच गढूळ पाणी वाहणारे आपणही पाणके व्हायचं की नवनिर्माणाच्या शक्यता तपासायच्या? सती प्रथेचे समर्थन करणारी  “स्वामी' सारखी कादंबरी कशी काय मराठीमध्ये प्रचंड खपाची असू शकते? ती आहे, कारण तिच्या वाटेत खेटर घेऊन उभा ठाकणारा पुरोगामी फोर्स गतिरोध करायला तेव्हा प्रखर नव्हता. “स्वामी' कादंबरी ही इथल्या सांस्कृतिक दहशतवादाचं उदाहरण आहे. 'बॅरिस्टर' सारखं टुकार नाटक जे “रेनेसान्स'च्या (प्रबोधन) चळवळीची खिल्ली उडवतं, ते मराठीतलं चांगलं नाटक कसं काय म्हटलं जाऊ शकतं?असा प्रश्न आहे. खरंतर जे- जे लोकप्रिय आहे त्यापुढे प्रश्नचिन्ह घालण्याची क्षमता “प्रलेसं’ने देशभर अनेकदा सिद्ध केली आहे. हे महाराष्ट्रात का झाले नाही? महाराष्ट्र तर पुरोगामित्वाचा ठेकेदार होता. जगभर पुरोगामी लेखकांना जो मान,सन्मान आणि कणा असतो तसा महाराष्ट्रात दुर्दैवाने दिसलेला नाही. “प्रलेसं’चा इतिहास देदीप्यमान असला तरी, महाराष्ट्र याला अपवाद आहे. महाराष्ट्रात तो कधीच जाणीवपूर्वक उभा केला गेला नाही. याची कारणे अनेक आहेत. उच्चभ्रू वर्गाचे ब्राह्मणी मार्क्सवाद मांडणे आणि त्याच वेळी दलित समुदायाचे आंबेडकरांना टाळून पुरोगामी होणे या साऱ्यांच्या विरोधाभासातून हे घडले आहे.
आज तरी आपण 'सी ग्रेड' वाल्यांना तुम्ही 'सी ग्रेड' आहात, तुम्ही मुख्य धारेचे कसे काय असू शकता? असे म्हणण्याचे धारिष्ट करणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे. मराठीमध्ये सकस लिहिणाऱ्या साहित्याला आणि साहित्यिकांना डावलण्याची परंपरा आहे. “सी ग्रेड' समर्थक समीक्षकांनी दलित साहित्य आणि त्यातून उभा ठाकलेला पर्याय सांस्कृतिक दबंगगिरी करत मोडून काढला. झंझावातासारखा दलित साहित्याचा आलेला प्रवाह काही दिवस लुप्त झाला असेल परंतु मृत  झालेला नव्हता, आज तो पुन्हा“प्रलेसं’ंच्या रूपाने असे कायांतर करू पाहतो आहे. पुरोगामी लेखकांचे आंदोलन जातीअंताचा नव्या पायरीवर येऊन ठेपले आहे. आज त्याच्या जोडीला जातीअंतासोबतच वर्गअंताच्याही घोषणा आहेत.खरं म्हणजे सकस कोणास म्हणावे हाही प्रश्न “सी ग्रेड' वाल्यांनी अनुत्तरित ठेवला आहे.
जीवनवादी काही लिहू पाहणाऱ्यांना आजचे आणि कालचे सारे समीक्षक एकमताने बहिष्कृत करीत आले आहेत. या स्वयंघोषित,धूर्त, लबाडांना आज तरी सक्षम साहित्यकृतींची निर्मिती करुन, पायबंद घालणार आहोत की नाही? हा खरा प्रश्न आहे. अभिजनांच्या साहित्याने वाचकांचा प्रचंड भ्रमनिरास केला आहे. त्यांच्या मध्यमवर्गीय,संकुचित भावविश्व, आकलनाच्या थिटेेपणामुळे मराठी वाचक साहित्यापासून प्रचंड दूर गेला आहे. म्हणून “प्रलेसं’च्या पुढे वाचन संस्कृती निर्माणाचंदेखील महत्त्वाचे आव्हान आहे. लेखकांनी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडू नये, असा कांगावा नेहमीच केला जातो. खरं म्हणजे आमच्याच काठीखाली  घुमत राहावे  असा त्यात  मथितार्थ असतो. संघटन करण्याच्या भानगडीत पडू नये, असे सांगून ते आपला बुद्धिभेद करत असतात. श्रमजीवी घटकांचे मध्यमवर्गीकरण करणे यालाच म्हणतात. त्यादृष्टीने लावलेल्या सापळ्यात अनेक नवलेखक अलगद सापडतात आणि नंदीबैल होतात. खरं म्हणजे व्यवस्थेला असेच बैल हवे असतात, जे त्यांनी निर्माण केलेल्या 'सांस्कृतिक पोळ्याला' गरके मारतील.  स्वयंघोषित, सांस्कृतिक दहशतवादी अड्डे  यांना भीक न घालता पुरुन उरणे आणि आपला मार्ग प्रशस्त करणे महत्त्वाचे आहे... असे सांगणारे विचारमंच संपल्याच्या काळात अमरावती येथे हे अधिवेशन होते आहे. ज्या काळात बुद्धिजीवींना काबूत कसे ठेवावे याचे मनसुबे आणि कायदे शासन संस्था हिरिरीने करते आहे, त्या काळात शेकडो लेखक, कवी, पत्रकार, चित्रकार, ब्लॉगर, छायाचित्रकार, साहित्यिक कार्यकर्ते एका छताखाली येऊन मंथन करतात, याला गुणात्मक मूल्य आहे. 

(लेखक, कादंबरीकार तथा प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र सचिव आहेत. संपर्क - ९४२३५४०३६६ )